गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्र काँग्रेसमधला वाद चव्हाट्यावर आल्याचं पाहायला मिळत आहे. बाळासाहेब थोरात यांनी नाना पटोलेंसोबत काम करणं कठीण झालंय, असं म्हणत विधिमंडळ पक्षनेतेपदाचा राजीनामा दिला. या पार्श्वभूमीवर काँग्रेसमध्ये सारंकाही आलबेल नसल्याचंच दिसून येत आहे. त्यात सत्यजीत तांबेंच्या बंडखोरीमुळे काँग्रेसची चिंता वाढण्याची लक्षणं दिसत असतानात थोरातांनी राजीनामा देत बंडाचा झेंडा उगारल्यामुळे पक्षाची पंचाईत झाली आहे. या सर्व पार्श्वभूमीवर आता महाविकास आघाडीतील ठाकरे गटानंच काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत. थोरातांच्या आरोपांत तथ्य असल्याचा मुद्दा उपस्थित करत ठाकरे गटानं काँग्रेसला सावरून घेण्याचा सल्ला दिला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘…याचा अर्थ थोरात आरपारच्या लढाईसाठी सिद्ध’

सामनातील अग्रलेखाच्या माध्यमातून ठाकरे गटानं महाराष्ट्र काँग्रेसमधील अंगर्गत घडामोडींवर नाराजी व्यक्त केली आहे. ‘थोरातांच्या संयमाचा बांध फुटल्यामुळे हे घडले काय? याचा विचार आता त्यांच्या हायकमांडने केला पाहिजे. थोरात हे गेल्या काही दिवसांपासून आजारी आहेत. त्यांचा खांदा एका अपघातामुळे निखळला आहे व हात गळ्यात बांधला आहे. तरी ते एकहाती मैदानात उतरून लढण्याच्या मनःस्थितीत आहेत. याचा अर्थ ते खूप दुखावले आहेत व आरपारच्या लढाईस सिद्ध आहेत’, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

‘सत्यजीत तांबे हे काँग्रेसचे युवा नेते व थोरातांचे ‘भाचे’ आहेत. तांबे-थोरात कुटुंबाचे संगमनेरमध्ये वर्चस्व आहे. तांबे प्रकरणात आपल्याला विश्वासात घेतले नाही व ज्येष्ठता असूनही अपमानित केले, असा संताप बाळासाहेब थोरातांचा आहे व त्यात तथ्य असू शकते. थोरात यांच्यासारख्या नेत्यांचा सन्मान नाही राखायचा, तर कोणाचा राखायचा?’ असा सवालही अग्रलेखात उपस्थित करण्यात आला आहे.

‘वाडा पडला तरी अहंकाराचा झेंडा फडकत ठेवायचा हेच धोरण’

‘थोरांताच्या धमन्यांत काँग्रेस विचारांचेच रक्त आहे, पण आज ते संतापले आहेत. सत्यजीत तांबे हे पदवीधर मतदारसंघात निवडून आले व म्हणाले, मी कोणत्याच पक्षात जाणार नाही. काँग्रेसकडे शहाणपण असते तर विधान परिषद निवडणुकीतील सत्यजीत तांबे यांच्या विजयानंतर त्यांनी थोरातांशी चर्चा करून या प्रकरणावर सन्माननीय पडदा टाकला असता. पण वाडा पडला तरी अहंकाराचा झेंडा फडकत ठेवायचा हे धोरण दिसते. राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेच्या यशानंतर काँग्रेसला अनेक राज्यांत संजीवनी मिळताना दिसत आहे. पण महाराष्ट्र काँग्रेसमध्ये आज जे घडतेय ते याच्या अगदी विपरीत आहे आणि त्यामुळे त्या पक्षाचेच नुकसान होऊ शकते’, अशी भीती अग्रलेखात व्यक्त करण्यात आली आहे.

शिंदे गटाच्या बंडाचा सुगावा अजित पवार यांना कसा लागला? स्वतः अजित पवार यांनीच सांगितला २० जून २०२२ रोजीचा घटनाक्रम

‘पटोलेंनी अशा ‘घराण्यां’शी पंगा घेऊन…’

‘पटोले हे मेहनती आहेत व भारतीय जनता पक्षात बंड करून ते काँग्रेस पक्षात आले. ते पक्षवाढीसाठी कष्ट घेतात, पण संकटकाळात ज्यांनी महाराष्ट्रात काँग्रेस पक्षाचे अस्तित्व टिकवून ठेवले अशा ‘घराण्यां’शी नाहक पंगा घेऊन राज्यात त्यांचा पक्ष कसा वाढणार? पटोले यांनी वाद न वाढवता पक्ष पुढे नेला तर २०२४ साली महाविकास आघाडीस नक्कीच फायदा होईल. नाहीतर २०२४ आधी कमळाबाईवरील भुंगे काँग्रेसच्या उरलेल्या मधाच्या पोळय़ावर बसतील. सत्यजीत तांबे यांच्यावर आमचे लक्ष आहे, असे एक विधान देवेंद्र फडणवीस यांनी केलेच आहे’, अशा शब्दांत अग्रलेखातून काँग्रेसला सतर्क करण्यात आलं आहे.

“पहाटेच्या शपथविधीवर का बोलायचं नाही?” अजित पवारांनी दिलं उत्तर, म्हणाले….

भाजपाला टोला

दरम्यान, अग्रलेखातून ठाकरे गटाने भाजपालाही टोला लगावला आहे. ‘भारतीय जनता पक्षाने कार्यकर्ते घडविण्यासाठी रामभाऊ म्हाळगी संस्थेची स्थापना केली, पण भाजप इतरांनी घडवलेले व बनवलेले कार्यकर्ते उचलूनच स्वतःच्या इमारतीचे इमले रचत आहे. नगर जिल्हय़ात त्यांनी आधी विखे-पाटलांना ‘मेकअप’ करून भाजपमध्ये आणले व आता त्यांचा सत्यजीत तांबेंवर डोळा आहे. त्यात बाळासाहेब थोरातांसारख्या नेत्याने बंडाचे दंड थोपटल्याने भाजपच्या मनी उकळ्याच फुटल्या असतील. म्हणून थोरातप्रकरणी काँग्रेसने सावध राहायला हवे’, असं अग्रलेखात म्हटलं आहे.