केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर करून भाजपाकडून विरोधी पक्षांच्या नेत्यांवर करावाया करण्यात येत असल्याची वारंवार टीका केली जात आहे. विशेषत: महाराष्ट्र आणि पश्चिम बंगाल या बिगर भाजपा सरकारमधील नेते आणि मंत्र्यांवर ईडी-सीबीआयकडून धाडी टाकल्या जात आहेत. या पार्श्वभूमीवर अनिल देशमुखांप्रमाणेच नवाब मलिक यांचा देखील राजीनामा घेण्याची मागणी भाजपाकडून केली जात असताना संजय राऊतांनी त्यावर खोचक शब्दांत भूमिका मांडली आहे. तसेच, ईडी-सीबीआयवर देखील त्यांनी निशाणा साधला आहे.
शिवसेनेच्या शिवसंवाद यात्रेच्या निमित्ताने संजय राऊत सध्या नागपूर दौऱ्यावर असून इथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी विविध मुद्द्यांवर आपली भूमिका मांडली. यावेळी पत्रकारांनी नवाब मलिक यांच्या नाजीनाम्याच्या मागणीविषयी विचारणा केली असता राऊतंनी भाजपा आणि ईडीवर देखील निशाणा साधला.
“देशमुखांच्या राजीनाम्याचा निर्णय घाईत”
“आम्ही राजीनामा का घ्यावा? तुम्ही चुकीच्या आरोपांवर आमच्या मंत्र्यांना फसवत आहात. अनिल देशमुखांचा राजीनामा घेणं ही चूक होती. नव्हता घ्ययाला पाहिजे. तो निर्णय घाईघाईनं झाला असं मला वाटतं. त्यांच्याबाबत काय पुरावे आहेत हे आम्ही पाहिलं आहे. ज्या कारणासाठी केंद्रीय तपास यंत्रणांनी त्यांच्यावर धाडी घातल्या, तेही आम्ही पाहिलं आहे”, असं संजय राऊत म्हणाले आहेत.
“आता महाराष्ट्र पोलीसही काम करतायत”
दरम्यान, महाराष्ट्र पोलीसही आता काम करत असल्याचं संजय राऊतांनी सांगितलं. “नवाब मलिक नेहमीच कॅबिनेटमध्ये राहतील. भाजपाचा भ्रम होता की पूर्ण कॅबिनेट खाली करतील. ठीक आहे. आम्ही बघू. जशा तुमच्याकडे केंद्रीय तपास यंत्रणा आहेत, तसे महाराष्ट्रातील पोलीसही आता काम करत आहेत. आता कळेल की कॅबिनेट जेलमध्ये जातंय की अजून कुणी”, अशा शब्दांत राऊतांनी भाजपाला इशारा दिला आहे.
“माझं तुम्हाला खुलं आव्हान आहे, माझ्यासारखं…”; गोपीचंद पडळकरांनी संजय राऊतांना दिलं चॅलेंज
७ वर्षांत फक्त १९ गुन्हे सिद्ध
दरम्यान, यावेळी ईडीवर टीका करताना संजय राऊतांनी आकडेवारी सादर केली. “ईडीने गेल्या ७ वर्षांत केलेल्या कारवाया आणि टाकलेल्या धाडींपैकी फक्त १९ लोकांवर आरोप सिद्ध झाले आहेत”, असं राऊत म्हणाले.