गोवा विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर करण्यात आली आहे. गोव्यात आम आदमी पक्ष, तृणमूल काँग्रेससोबत शिवसेनादेखील उतरत असल्याने मोठी रंगत पहायला मिळण्याची शक्यता आहे. दरम्यान पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्या कार्यशैलीचं नेहमी कौतुक करणाऱ्या शिवसेना खासदार संजय राऊत यांनी गोव्यातील राजकारणावरुन त्यांच्यावर टीका केली आहे. सामनामधील रोखठोकमधून संजय राऊत यांनी ममता बॅनर्जी यांना सुनावलं असून हे त्यांच्या प्रतिमेस शोभणारं नाही अशा शब्दांत टीका केली आहे.

“गोव्यात तृणमूलची हवा करण्यासाठी कोटय़वधी रुपयांची उधळण”

“गोव्यात भारतीय जनता पक्षाच्या प्रचारासाठी राष्ट्रीय नेत्यांची, केंद्रीय मंत्र्यांची रांग लागली आहे. मनोहर पर्रीकरांशिवाय भाजपा निवडणुकांना सामोरे जात आहे; पण कोणत्या मुद्दय़ांवर भाजपा निवडणुका लढणार? गेल्या दहा वर्षांपासून गोव्यात भाजपाची सत्ता आहे. भाजपला येथे बहुमत कधीच मिळाले नाही. निवडणुका संपल्यावर इतर पक्षांतील आमदारांना सरळ विकत घ्यायचे व बहुमत करायचे हे गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. या वेळीही भाजपास बहुमत मिळणार नाही, असे छातीठोकपणे सांगणारे लोक जागोजाग भेटले. गोव्यात तृणमूल काँग्रेस येण्याचा सर्वात जास्त फायदा भारतीय जनता पक्षालाच होईल. त्यामुळेच गोव्यात तृणमूलची हवा करण्यासाठी कोटय़वधी रुपयांची उधळण सुरू आहे. या पैशांचे धनी तृणमूल नसून दुसरेच कोणी तरी असावेत, असेही सांगणारे अनेक जण भेटले,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

Amit Shah Malkapur, Chainsukh sancheti campaign,
मविआ म्हणजे विकास विरोधी आघाडी, गृहमंत्री अमित शहांचे टीकास्त्र; लाडक्या बहिणींना २१०० रुपये देणार
sneha chavan marathi actress got married for second time
लोकप्रिय मराठी अभिनेत्री दुसऱ्यांदा अडकली लग्नबंधनात; साधेपणाने पार…
maharashtra assembly election 2024 issue of bullying is effective in campaigning in three constituencies of Marathwada
मराठावाड्यातील तीन मतदारसंघांत गुंडगिरीचा मुद्दा प्रचारात प्रभावी
loksatta readers feedback
लोकमानस: धोरणांचा प्रचार झालाच नाही
Devendra Fadnavis , Ravi Rana, Mahavikas Aghadi,
विरोधकांच्या डोक्‍याचे नट कसण्‍यासाठी मी राणांचा पाना… फडणवीसांकडून जोरदार….
Chhagan Bhujbal on Rajdeep Sardesai book
Chhagan Bhujbal: ‘ईडीपासून मुक्तीसाठी भाजपाशी हातमिळवणी’, पुस्तकातील ‘त्या’ दाव्यावर छगन भुजबळांचे मोठे विधान; म्हणाले…
ajit pawar sharad pawar sadabhau khot
“त्या विधानानंतर मी सदाभाऊ खोतांना फोन केला आणि…”, अजित पवारांनी केली कानउघाडणी; म्हणाले…
Assembly Election 2024 Sillod Constituency Challenging Abdul Sattar print politics news
लक्षवेधी लढत: सिल्लोड: सत्तार यांच्यासमोर आव्हानांचा डोंगर?

“मला वाटलं मोदी मंत्रिमंडळातील हा कार्यक्षम मंत्री…,” गडकरी भेटीनंतर संजय राऊत रोखठोकच बोलले

“स्वतःच्या प्रतिमेवर निवडून येणारे सर्व लोक तृणमूल काँग्रेसने जाळय़ात ओढले”

“दोन फुलांचा काळ, गोव्यात नवी सकाळ’ अशा आशयाच्या शेकडो होर्डिंग्जनी गोव्यात जागोजाग लक्ष वेधून घेतले. काँग्रेस पक्षाचे अनेक आमदार व प्रमुख नेते कोलकाता निवासी तृणमूल काँग्रेसमध्ये गेले. गोवा काँग्रेसचे वर्किंग प्रेसिडेंट अलेक्सो रेजिनाल्डो यांनीही काँग्रेसचा त्याग करून अचानक तृणमूलचे फूल शर्टच्या खिशाला खोवले तेव्हा अनेकांना धक्का बसला. रेजिनाल्डो हे गोव्यातील एक स्वच्छ प्रतिमेचे लोकप्रिय नेते. अत्यंत प्रामाणिक. लोकांच्या प्रश्नांवर लढणारा नेता अशी त्यांची ख्याती. गोव्याचे गढूळ वातावरण, भ्रष्ट राजकारण सुधारण्याची कुवत त्यांच्यात होती. ते काँग्रेस पक्षात राहिले असते तर बिघडले नसते, पण जे स्वतःच्या प्रतिमेवर निवडून येतील असे सर्व लोक तृणमूल काँग्रेसने जाळय़ात ओढले,” असा आरोप संजय राऊतांनी केला आहे.

“भाजपाशी लढणाऱ्या ममता बॅनर्जीही काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात”

“चर्चिल आलेमाव यांचा मूळ पक्ष कोणता? हे त्यांनाही आठवत नसेल. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात ते होते. आता तेही तृणमूलमध्ये गेले. अशा काही अस्थिर लोकांना घेऊन ममता बॅनर्जी यांना गोव्यातील नव्या सकाळचे स्वप्न पडले आहे. हे त्यांच्या प्रतिमेस शोभणारे नाही. गोव्यात काँग्रेसचे अस्तित्व शिल्लक ठेवायचे नाही ही भूमिका पंतप्रधान मोदी किंवा भारतीय जनता पक्षाची असू शकते, पण भाजपाशी लढणाऱ्या ममता बॅनर्जीही त्याच काँग्रेसविरोधी भूमिकेस पाठबळ देतात. याचा फायदा शेवटी कोणाला होणार?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.

“तृणमूल, आपसारखे पक्ष बाहेरून येऊन गोव्याला धडे देत आहेत”

“काँग्रेस पक्षाकडे मागच्या निवडणुकीनंतर 17 आमदार होते. ते आता 2 राहिले. बाकी सगळे पळून गेले. कारण गोव्यात काँग्रेसचे सक्षम नेतृत्व नाही. राष्ट्रीय भूमिका घेऊन गोव्यात निवडणुका लढवल्या जात नाहीत. दिल्लीच्या राजकारणाशी गोव्याचे नाते कधीच नव्हते. मनोहर पर्रीकर संरक्षणमंत्री म्हणून गेले, पण मनाने गोव्याच्या समुद्रकिनाऱ्यावर घुटमळत राहिले. त्यामुळे तृणमूल, आपसारखे पक्ष बाहेरून येऊन गोव्याला धडे देत आहेत. ‘आप’चे लोक आता गोव्यात स्थानिकांना 80 टक्के नोकऱ्या राखीव ठेवण्याचा प्रचार करीत आहेत,” असं संजय राऊत म्हणाले आहेत.

“तृणमूल काँग्रेस व ‘आप’सारख्या पक्षांनी काँग्रेसच्या वाटेत काटे पेरून भाजपाला मदत केली”

“गोव्यातली निवडणूक भाजपसाठी सोपी नाही, पण तृणमूल काँग्रेस व ‘आप’सारख्या पक्षांनी काँग्रेसच्या वाटेत काटे पेरून भाजपाला मदत केली आहे. तृणमूल आणि आपसारख्या पक्षांनी गोव्याच्या मतदारांना फक्त सोन्याने मढवायचेच बाकी ठेवले. अशा आश्वासनांची खैरात उडवली आहे. गृहलक्ष्मी योजनेअंतर्गत गोव्यातील महिलांना 5,000 रुपये महिन्याला देऊ, असे तृणमूलने सांगितले. यावर आधी प. बंगालातील महिलांना 5,000 रुपयांची ही योजना द्या व गोव्यात या असे भाजपाने तडकावले. ‘आप’ने तर सगळेच मोफत द्यायचे ठरवले. श्री. अरविंद केजरीवाल गोव्यात आले. मोठय़ा सभा घेतल्या. दिल्लीत पोहोचेपर्यंत त्यांना कोरोनाने गाठले. आप आणि तृणमूलचे लक्ष ख्रिश्चन मतांवर आहे. पण ख्रिश्चनांची मते काँग्रेसच्या पारडय़ात पडतील. गोव्यातले राजकारण आज सोपे राहिलेले नाही. प्रत्येकाने गोव्याची राजकीय प्रयोगशाळा केली आहे. मनोहर पर्रीकर हे गोव्याचे मोठे नेते. त्यांच्या मागेही गोवा पूर्णपणे उभा राहिला नाही. तडजोडी करूनच त्यांना सत्ता स्थापन करावी लागली. आता मनोहर पर्रीकरांचा मुलगा उत्पल पर्रीकर गोव्याच्या राजकारणात उतरला. त्याला उमेदवारी द्यायला भाजपा तयार नाही. उत्पल तरीही निवडणूक लढेल. तेव्हा भाजप पोस्टरवर मनोहर पर्रीकरांचे छायाचित्र कसे वापरणार? त्यामुळे उत्पल पर्रीकर यांना उमेदवारी देण्याशिवाय भाजपास पर्याय नाही. गोव्याच्या राजकारणात पैशांचा खळखळाट सुरूच आहे. सगळेच भ्रष्ट, व्यभिचारी बनले. देवळांत आणि चर्चमध्ये फक्त घंटा वाजतात. त्या घंटांचे मांगल्यच संपले आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

गडकरी भेटीवरुन भाजपावर टीका

“नवीन वर्षाचा जल्लोष संपल्यावर गोव्यात उतरलो, पण गोवा त्याच आनंदाच्या, उत्साहाच्या लाटेवर उसळताना दिसले. संपूर्ण देश जणू गोव्यात अवतरला होता. सर्व बंधने झुगारून, कोरोना, ओमायक्रोन व्हायरसचा विचार न करता गोव्यात आनंदाची लाट उसळली. नव वर्षाचा जल्लोष संपला तरी त्या लाटेचे हेलकावे जाणवत होते. गोव्यात आता निवडणुकीचे वातावरण तापले आहे. विमानतळावरील खास कक्षात नितीन गडकरींची भेट झाली. मला वाटले, मोदी मंत्रिमंडळातील हा कार्यक्षम मंत्री शासकीय कामांसाठी गोव्यात उतरला, पण तेसुद्धा राजकीय कारणांसाठीच आलेले दिसले. गडकरी म्हणाले, ‘गोव्यात निवडणूक कार्यालयाचे उद्घाटन करण्यासाठी आलोय,” असं संजय राऊतांनी सांगितलं आहे.

“गोव्याचे राजकीय वातावरण बिघडले आहे”

“गोव्यातील भाजपाचे आमदार व संभाव्य उमेदवार हे एकजात हिस्ट्री-शिटर्स आहेत. अफू-चरसचा व्यापार करणारे लोक उघडपणे भाजपात प्रवेश करतात व मुख्यमंत्री सावंत त्यांचे स्वागत करतात असे चित्र रोज दिसते. प्रत्येक जण सौदेबाजी करीत आहे. गोव्यात एका बाजूला मंदिरे तर दुसऱ्या बाजूला भव्य चर्च आहेत. दोन्ही प्रार्थनास्थळांत घंटानादाचे महत्त्व आहे. या घंटा आता धोक्याच्या ठरू नयेत इतके गोव्याचे राजकीय वातावरण बिघडले आहे,” अशी टीका संजय राऊतांनी केली आहे.

“गोव्यात आज एकही राजकीय पक्ष मूळच्या भूमिपुत्रांचा राहिलेला नाही”

“गोव्याच्या निवडणुकीत आता भूमिपुत्रांना प्राधान्य देण्यावर धुमशान सुरू आहे. पण गोव्यात आज एकही राजकीय पक्ष मूळच्या भूमिपुत्रांचा राहिलेला नाही. मुख्यमंत्री सावंतांनी आता सांगितले, पुढील पाच वर्षांत गोव्यात 30,000 नोकऱ्या उपलब्ध करून देऊ. ही सरळ थापेबाजी आहे. गेली 10 वर्षे भाजपचे राज्य आहे व बेरोजगारी प्रचंड वाढली. पैसे खाऊन सरकारी नोकऱ्या विकणारे त्यांच्याच सरकारात बसले आहेत. महाराष्ट्रवादी गोमंतक पक्षाने स्वतःचे स्वत्व आणि अस्तित्व संपविले आहे. ढवळीकर कुटुंबापुरताच तो पक्ष आता उरला आहे. गोव्याच्या भूमिपुत्रांच्या रोजगाराच्या प्रश्नावर कोणी आवाज उठवीत नाही. कारण गोव्यात बाहेरून आलेले सर्व उद्योगपती, त्यात कॅसिनो जुगारी, बोटींचे मालक जास्त, हेच लोक गोव्याचे राजकीय अर्थकारण चालवीत आहेत. गोव्यात ‘मायनिंग’वर बंदी. त्यामुळे लाखो लोकांनी रोजगार गमावला. गोव्यातील काँग्रेस, भाजप व मगो पक्षाचे लोक यावर बोलत नाहीत. गोव्यातले सगळय़ाच पक्षांचे आमदार व पुढारी आज मालामाल आहेत. पक्षांतरे करून त्यांनी माया जमवली. मते विकत घेऊन निवडून येण्याचा फॉर्म्युला सगळय़ात जास्त गोव्यात चालतो. मते विकत घेऊन निवडून यायचे व निवडून आल्यावर निवडणुकीत गुंतवलेले भांडवल मिळेल त्या मार्गाने वसूल करायचे. हा बेशरमपणा गोव्यासारख्या राज्यातला शिष्टाचार बनला आहे. काँग्रेसच्या तिकिटांवर निवडून आलेले 10 आमदार घाऊक पद्धतीने भाजपमध्ये गेले. आता त्यांचे महत्त्व संपले. भाजपमध्ये उमेदवाऱ्या मिळणार नाहीत हे लक्षात येताच त्यातले बरेचशे आमदार तिकिटांसाठी पुन्हा काँग्रेसच्या दारात उभे राहिले. ‘‘जे काँग्रेस सोडून गेले अशा बेइमान लोकांना पुन्हा उमेदवारी देणे नाही, हा काँग्रेसचा धोरणात्मक निर्णय आहे,’’ असे गोवा काँग्रेसचे अध्यक्ष गिरीश चोडणकर मला म्हणाले. हे दिलासादायक आहे. ज्यांनी पक्षांतरे केली त्यांचा पराभव झाल्याशिवाय गोव्याची राजकीय हवा स्वच्छ होणार नाही.” अशी माहिती संजय राऊतांनी दिली आहे.

“देशाच्या राजकारणाचा कसा चुथडा झाला आहे ते पाहायचे असेल तर गोव्याकडे पाहावे. देवांचे गाव. भाऊसाहेब बांदोडकरांपासून बा. भ. बोरकरांपर्यंत लोकांचे पापभिरू राज्य. त्या गोव्यात आज काय सुरू आहे?,” अशी विचारणा संजय राऊतांनी केली आहे.