तृणमूल काँग्रेसच्या प्रमुख आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी सध्या दोन दिवसांच्या मुंबई भेटीवर आहेत. ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी शहरात दाखल होताच ‘जय मराठा, जय बांगला’चा नारा देत शिवसेनेशी राजकीय सहकार्याचे मंगळवारी संकेत दिले. पर्यटनमंत्री आदित्य ठाकरे यांनी ममतादीदींची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे प्रकृतीच्या कारणास्तव ममता बॅनर्जींना भेटू शकले नाहीत. दरम्यान यावेळी चर्चेदरम्यान त्यांनी उद्धव उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि राष्ट्रीय राजकारणत सक्रीय व्हावेत यासाठी सिद्धिविनायकाकडे प्रार्थना केल्याचं सांगितलं. शिवसेना खासदार संजय राऊत यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना ही माहिती दिली.
“बंगालची वाघीण ममता बॅनर्जी महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आहेत. मुंबईत शासकीय कामासाठी दौरा असला तरी आल्यावर त्या ठाकरे कुटुंबीयांची भेट घेतात. आदित्य ठाकरे यांनी त्यांचं स्वागत केलं. त्यांना उद्धव ठाकरेंना भेटायचं होतं, पण अजूनही त्यांना बायो बबलमध्ये ठेवण्यात आलं असल्याने भेट टाळली. आदित्य ठाकरेंनी त्यांचे आशीर्वाद घेतले. भेटवस्तू देण्यात आल्या. राजकीय चर्चा पार पडली,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
“ममता बॅनर्जी यांनी सिद्धिविनायक मंदिरात जाऊन दर्शन घेतलं. उद्धव ठाकरे लवकरात लवकर बरे व्हावेत आणि राष्ट्रीय राजकारणत सक्रीय व्हावेत यासाठी प्रार्थना केल्याचं त्यांनी सांगितलं,” अशी माहिती संजय राऊत यांनी दिली.
ममतादीदींचा ‘जय मराठा, जय बांगला’चा नारा ; राजकीय मैत्री वाढविणारी भेट, आदित्य ठाकरे यांचा दावा
दरम्यान यावेळी राजकीय चर्चादेखील पार पडल्याचं संजय राऊत यांनी सांगितलं. ते म्हणाले की, “महाराष्ट्रात ज्याप्रकारे भाजपा ईडी, सीबीय, इन्कम टॅक्स यांच्या माध्यमातून दहशतवाद निर्माण करत आहेत, सरकार अस्थिर करण्याचा प्रयत्न करत आहेत अशाच प्रकारचं महान कार्य हे भाजपाचे कार्यकर्ते पश्चिम बंगालमध्ये करत असल्याचं त्यांनी सांगितलं. आम्ही त्यांना पुरुन उरलो आहोत आणि उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रसुद्धा या सरकारी दहशतवाद्यांचा सामना करेल अशी खात्री असल्याचं त्यांनी सांगितलं”.
दोन्ही राज्य एकत्रपणे असत्याशी लढून विजयी होतील असा विश्वास त्यांनी व्यक्त केल्याचंही संजय राऊत यांन सांगितलं. ममता बॅनर्जींनी यावेळी बाळासाहेबांची आवर्जून आठवण काढली. तसंच उद्धव ठाकरे त्यांचं काम पुढे नेत आहेत याबद्दल आनंद व्यक्त केल्याचं ते म्हणाले.
“वाघिणीसारखं ममता बंगालमध्ये लढल्या आणि सगळ्या लांडग्यांना पळवून लावलं. शद पवार आणि ममता यांची भेट देशाच्या राजकारणच्या दृष्टीने महत्त्वाची आहे. राजकीयदृष्ट्या शरद पवारांच्या उंचीचा एकही नेता या देशात नाही. त्यांचा अनुभव दांडगा आहे. या भेटीचे आम्ही स्वागत करतो,” असं संजय राऊत म्हणाले.
काँग्रेस आणि ममता बॅनर्जी यांच्यातील वादासंबंधी विचारण्यात आलं असता संजय राऊत म्हणाले की, “पश्चिम बंगालमध्ये डावे आणि काँग्रेस पक्ष राहिले नाहीत. भाजपाच्या बँडबाजाची हवा काढून टाकली आणि मोठा विजय मिळवला. बरेचसे लोक पुन्हा ममतादीदींकडे आले आहेत. ममता बॅनर्जी आणि काँग्रेसमधील वाद अंतर्गत आहे. पण समर्थ आघाडी उभी करायची असेल तर सगळ्यांना एकत्र घेऊनच जावे लागेल असं शरद पवारांचं मत आहे,” असं संजय राऊतांनी सांगितलं.