शिवसेनेत पडलेल्या फुटीच्या पार्श्वभूमीवर राज्यात आरोप-प्रत्यारोप आणि दावे-प्रतिदाव्यांचं राजकारण रंगू लागलं आहे. ज्येष्ठ नेते रामदास कदम यांनी आज एका वृत्तवाहिनीशी बोलताना उद्धव ठाकरेंवर टीका करतानाच शिवसेना फोडल्याचा गंभीर आरोप शरद पवार आणि अजित पवारांवर केला. या आरोपांची सध्या जोरदार चर्चा सुरू असतानाच आता शिवसेना खासदार आणि प्रवक्ते संजय राऊत यांनी केलेल्या सूचक ट्वीटची चर्चा सुरू झाली आहे. याआधी देखील संजय राऊतानी शायरीच्या माध्यमातून सूचक शब्दांत केलेल्या ट्वीटची अशीच चर्चा रंगली होती.
काय आहे ट्वीटमध्ये?
संजय राऊतांनी ट्वीटमध्ये सूचक शब्दांत भावना व्यक्त केल्या आहेत. रामदास कदम यांनी केलेल्या टीकेच्या पार्श्वभूमीवर या ट्वीटची चर्चा केली जात आहे. या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबतचा शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा एक जुना फोटो शेअर केला आहे. या फोटोसोबत त्यांनी एक शेर ट्वीट केला आहे.
“पीठ से निकले खंजरों को गिना जब, ठीक उततने ही थे, जितनों को गले लगाया था…जय महाराष्ट्र”, असं या ट्वीटमध्ये संजय राऊतांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले रामदास आठवले?
आज दिवसभर रामदास आठवले यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार, विधानसभा विरोधी पक्षनेते अजित पवार यांच्यावर केलेल्या आरोपांची चर्चा सुरू होती. “बाळासाहेब आजही माझ्यासमोर दिसत आहेत. ही वेळ आमच्यासारख्यांवर का यावी? याचा विचार उद्धव ठाकरेंनी करायला हवा. किमान त्यांनी काल मला फोन करून सांगायला हवं होतं की या इथे आपण बोलुयात. कुणाची हकालपट्टी करताय? आमच्या मेहनतीवर तुम्ही तिथे खुर्चीवर बसला आहात. आम्ही सगळं उभं केलंय”, असं कदम यावेळी म्हणाले आहेत. तसेच, शरद पवार आणि अजित पवारांनी शिवसेना फोडली, असा आरोप देखील रामदास कदम यांनी केला आहे.