मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राज्यात त्यांना समर्थन देणाऱ्यांची शिवसेनेतून नेते तसेच पदाधिकाऱ्यांची हकालपट्टी करण्यात येत आहे. पक्षविरोधी कारवाया करणाऱ्यांविरोधात शिवसेनेने कडक पावले उचलली आहे. त्यानंतर आता माजी आमदार विजय शिवतारे यांची शिवसेनेतून हकालपट्टी करण्यात आली आहे. याबाबत बोलताना शिवसेना खासदार संजय राऊत यांनी ज्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे ते शिवसेना भाजपा युती असताना पराभूत झाले होते असे म्हटले आहे. संजय राऊत हे दिल्लीत माध्यमांशी बोलत होते.
“बेईमान शेवटपर्यंत सांगतो की मी बेईमान नाही. तुम्ही शिवसेनेचा वापर करून माधुकरी मागू नका. तुम्ही तुमचा स्वतंत्र संसार मांडा. बाळासाहेब ठाकरेंची जी खरी शिवसेना आहे त्याच्या पंखाखाली तुम्ही अजून का जगत आहात. तुम्हाला स्वाभिमान असेल तर स्वतःचे स्थान निर्माण करा. ज्यांची हकालपट्टी करण्यात आली आहे ते शिवसेना भाजपा युती असताना पराभूत झाले होते,” असे संजय राऊत म्हणाले.
एकही आमदार पडणार नाही. त्याची जबाबदारी मी घेतली आहे. यातील एकही माणूस पराभूत झाला तर मी राजकारण सोडून निघून जाईन, असे एकनाथ शिंदे यांनी म्हटले आहे. याबाबत बोलताना संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
पाहा व्हिडीओ –
“बंडखोरांच्या नेत्यांना असे बोलावे लागते. त्यांच्या वक्तव्याशी आम्हाला आक्षेप नाही. महाराष्ट्राच्या जनतेच्या मनात काय खळबळ माजली आहे ते आम्हाला माहिती आहे. गेल्या ५६ वर्षात ज्यांनी शिवसेना सोडली ते राजकारणातून हद्दपार झाले. हा इतिहास आहे. त्यामुळे इतिहास बदलण्याची ताकद या गटात नाही,” असेही संजय राऊत म्हणाले.
एक दुजे के लिए प्रमाणे या सरकारचा राजकीय अंत होईल
“हे सरकारच बेकायेदीशर आहे. इतके दिवस होऊन सुद्धा मंत्रीमंडळ शपथविधी होऊ शकत नाही. उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री एक दुजे के लिए आहेत. हा नविन सिनेमा महाराष्ट्रात सुरु झाला आहे. या सिनेमाचा शेवट काय झाला होता हे आपण पाहिले असेल. सध्या सुरु असलेल्या सिनेमाचाही राजकीय अंतसुद्धा त्याच पद्धतीने होईल. या सर्वांनी राजकीय आत्महत्या केली आहे,” असेही संजय राऊत म्हणाले.