लोकसभा निवडणुकीत बहुमत मिळवल्यानंतर भाजपाप्रणित एनडीएने सत्तास्थापन केली असून एनडीएचे प्रमुख नरेंद्र मोदी यांनी रविवारी (९ जून) तिसऱ्यांदा पंतप्रधानपदाची शपथ घेतली. त्यांच्याबरोबर एनडीएतील ७२ खासदारांनी केंद्रीय मंत्रिपदाची (कॅबिनेट अथवा राज्यमंत्री) शपथ घेतली. मात्र या मंत्रिमंडळ विस्तारात भाजपाने महाराष्ट्रावर अन्याय केल्याची टीका होऊ लागली आहे. ४८ खासदार असलेल्या बलाढ्य अशा महाराष्ट्राला केवळ दोनच कॅबिनेट मंत्रिपदं मिळाली आहेत. तर उत्तर प्रदेश, बिहार आणि गुजरातला झुकतं माप देण्यात आलं आहे. त्याचबरोबर भाजपाने महाराष्ट्रातील त्यांच्या मित्रपक्षांवर अन्याय केल्याची टीका होत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा शपथविधी आणि मंत्रिमंडळ विस्तारानंतर शिवसेनेच्या शिंदे गटात नाराजी असल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. शिवसेनेचे नवनिर्वाचित खासदार श्रीरंग बारणे (मावळ लोकसभा) यांनी भाजपाविरोधातील खदखद व्यक्त केली आहे. तसेच भारतीय जनता पार्टीने साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांना मंत्रिपद द्यायला हवं होतं, असंही बारणे यांनी म्हटलं आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाने दोन खासदार असलेल्या एच. डी. कुमारस्वामी यांच्या जनता दल सेक्युलर या पक्षाला दोन कॅबिनेट मंत्रिपदं, तर केवळ एक खासदार असलेल्या जीतन राम मांझी यांच्या हिंदुस्तान आवाम मोर्चाला एक कॅबिनेट मंत्रिपद दिलंय. अपना दल या पक्षाच्या प्रमुख आणि एकमेव खासदार अनुप्रिया पटेल यांना देखील राज्यमंत्री केलं आहे. पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षालाही कॅबिनेट मंत्रिपद देण्यात आलं आहे. परंतु, सात खासदार निवडून आलेल्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केवळ एक राज्यमंत्रिपद देऊन त्यांची बोळवण करण्यात आली आहे. तर, एक खासदार निवडून आलेल्या अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला मंत्रिपद दिलेलं नाही. यावरून विरोधकांच्या टीकेनंतर शिवसेनेच्या शिंदे गटानेही खदखद व्यक्त केली आहे.

श्रीरंग बारणे म्हणाले, केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार होत असताना एनडीएने न्यायिक भूमिका घ्यायला हवी होती. त्यांनी अजित पवारांच्या पक्षालाही मंत्रिमंडळात समाविष्ट करून घ्यायला हवं होतं. ही आमच्यासह महाराष्ट्रातील जनतेची अपेक्षा होती. अजित पवार यांनी मधल्या काळात आपल्या कुटुंबाशी वाईटपणा घेतला. ही गोष्ट आपण नाकारून चालणार नाही. तसेच ते भाजपा आणि एनडीएचे घटक पक्ष म्हणून काम करत आहेत. त्यामुळे अजित पवारांना न्याय मिळावा ही सर्वांची अपेक्षा आहे. दुसऱ्या बाजूला, भाजपाने कोणाला मंत्री करावं हा त्यांचा अंतर्गत विषय आहे. परंतु, छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला न्याय मिळावा ही राज्यातील जनतेची भूमिका आहे. उदयनराजे भोसले हे तिसऱ्यांदा खासदार झाले आहेत आणि ते वरिष्ठ देखील आहेत त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांच्या गादीला मान मिळाला असता तर राज्यातील जनतेला अभिमान वाटला असता.

हे ही वाचा >> केरळमधील भाजपाचे एकमेव खासदार सुरेश गोपींना मंत्रिपद सोडायचंय; शपथविधीनंतर काही तासांत काय घडलं?

मावळचे खासदार श्रीरंग बारणे म्हणाले, शिवसेनेचे सात खासदार निवडून आले आहेत. तर भाजपाने राज्यात २८ जागा लढवून त्यापैकी त्यांना केवळ ९ जागा जिंकता आल्या. आम्ही १५ पैकी ७ जागा जिंकल्या आहेत. त्यामुळे आमची अपेक्षा होती की शिवसेनेला एक कॅबिनेट मंत्रिपद आणि एक राज्यमंत्रिपद मिळेल. तसेच शिवसेना हा भाजपाचा अतिशय जुना साथीदार आहे त्यामुळे भाजपाने शिवसेनेला केंद्रात कॅबिनेट मंत्रिपद द्यायला हवं होतं, अशी आमची पेक्षा होती. भाजपाने पाच खासदार असलेल्या चिराग पासवान यांच्या पक्षाला कॅबिनेट मंत्रिपद दिलं आणि आम्हाला एक राज्यमंत्रिपद दिलं. त्यामुळे कुठेतरी आमच्याबरोबर दुजाभाव होतोय असं दिसतंय.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena shinde faction angry at bjp over narendra modi 3rd cabinet asc