केंद्रीय निवडणूक आयोगाने राज्यसभेच्या महाराष्ट्रासह १५ राज्यांतील ५६ जागांसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर केला आहे. येत्या २७ फेब्रुवारी रोजी ही निवडणूक होणार आहे. उमेदवारांना १५ फेब्रुवारीपर्यंत उमेदवारी अर्ज भरता येईल. दरम्यान, काँग्रेसच्या माजी अध्यक्षा सोनिया गांधी यांनी नुकताच राजस्थानमधून राज्यसभेचा उमेदवारी अर्ज दाखल केला आहे. त्याचबरोबर सर्वच पक्षांनी राज्यसभेसाठी उमेदवारांची नावं जाहीर करण्यास सुरुवात केली आहे. काही वेळापूर्वी भारतीय जनता पार्टीने महाराष्ट्रातील तीन राज्यसभा उमेदवारांची नावं जाहीर केली आहेत.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

भाजपाने महाराष्ट्रातून अशोक चव्हाण, मेधा कुलकर्णी आणि डॉ. अजित गोपछडे यांना उमेदवारी जाहीर केली आहे. तर, ज्या दोन नेत्यांच्या नावांची गेल्या काही दिवसांपासून चर्चा होती त्या पंकजा मुंडे आणि नारायण राणे यांना भाजपाने उमेदवारी दिलेली नाही. माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी कालच (मंगळवार, १३ फेब्रुवारी) भाजपात प्रवेश केला आणि आज त्यांना राज्यसभेचं गिफ्ट मिळालं आहे. त्यांच्याबरोबर कोथरूडच्या माजी आमदार मेधा कुलकर्णी यांनाही उमेदवारी दिली आहे. कुलकर्णी यांना भाजपाने २०१९ मध्ये विधानसभेसाठी उमेदवारी नाकारली होती. त्यांना यावेळी राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय भाजपाने घेतला आहे. मेधा कुलकर्णी यांना उमेदवारी देऊन भाजपाने त्यांचं एकप्रकारे पुनर्वसन केलं आहे.

दरम्यान, भाजपापाठोपाठ शिवसेनेच्या शिंदे गटानेही त्यांचा राज्यसभेचा उमेदवार जाहीर केला आहे. गेल्या महिन्यात काँग्रेसमधून शिवसेनेत आलेल्या माजी खासदार मिलिंद देवरा यांना शिंदे गटाने राज्यसभेची उमेदवारी दिली आहे. देवरा यांना शिंदे गट दक्षिण मुंबईतून लोकसभेची उमेदवारी देणार असल्याची चर्चा होती. परंतु, शिंदे गटाने त्यांना राज्यसभेवर पाठवण्याचा निर्णय घेतला आहे. टाईम्स ऑफ इंडियाने याबाबतचं वृत्त प्रसिद्ध केलं आहे.

हे ही वाचा >> शरद पवार गट काँग्रेसमध्ये विलीन होणार? पुण्यातील बैठकीत नेमकं काय ठरलं? नेते म्हणतात…

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा गुजरातमधून राज्यसभेवर

भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे. पी. नड्डा यांना गुजरातमधून राज्यसभेवर संधी देण्यात आली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena shinde faction approves named milind deora as rajya sabha candidate asc