अलिबाग-मुरूडचे आमदार महेंद्र दळवी यांनी मुरूडच्या महावितरण अधिकाऱ्याला जीवे मारण्याची धमकी दिली आहे. या अधिकाऱ्याच्या वरिष्ठांनाही फोन करून त्या अधिकाऱ्याची बदली करा अन्यथा त्याला ठोकून काढू, अशा शब्दांत दळवी यांनी धमकी दिल्याचं प्रकरण समोर आलं आहे. दळवी यांनी संबंधित अधिकारी आणि त्याच्या वरिष्ठांशी केलेल्या संभाषणाची ऑडिओ क्लिप व्हायरल होत आहे. ही ऑडिओ क्लिप व्हायरल झाल्यानंतर आमदार दळवी यांनी याप्रकरणी स्पष्टीकरणदेखील दिलं आहे. महेंद्र दळवी म्हणाले, त्या अधिकाऱ्याची लोकप्रतिनिधींशी बोलण्याची पद्धत योग्य नव्हती.
५ जानेवारीपर्यंत वीजबिलांची वसुली करू नका अन्यथा जीवे मारू, अशा शब्दांत महेंद्र दळवी यांनी मुरूडमधील महावितरणचे अधिकारी राठोड यांना धमकी दिली आहे. या दोघांच्या फोनवरील संभाषणाची ऑडिओ क्लिप समोर आली आहे. यात महेंद्र दळवी त्या अधिकाऱ्याला धमकावत आहेत की, “महिना अखेरपर्यंत वीजबिलांची वसुली करू नको, अन्यथा मी माझ्या कार्यकर्त्यांना आदेश देऊन तुला फटके द्यायला सांगेन.” दळवी यांनी राठोड यांचे वरिष्ठ अधिकारी मुलाणी यांच्याशीदेखील बातचीत केली. तसेच मुलानी यांना सांगितलं की, “तुम्ही त्याची बदली करा, अन्यथा मी माझ्या कार्यकर्त्यांना सांगून त्याला साफ करायला सांगेन. त्याला सुधारा नाहीतर त्याचा मर्डर (खून) अटळ आहे. मी त्याचे कपडे उतरवेन. माझी फक्त इतकीच विनंती आहे की, महिनाअखेरपर्यंत बिलांची वसुली थांबवा.”
दरम्यान,आमदार दळवी यांनी या धमकीप्रकणी स्पष्टीकरण दिलं आहे. महेंद्र दळवी यांनी काही वेळापूर्वी टीव्ही ९ मराठीशी फोनवरून संवाद साधला. यावेळी आमदार दळवी म्हणाले, “आमच्या मुरूड तालुक्यात हा राठोड नावाचा अधिकारी आहे. मी त्याच्याकडे विनंती केली होती की, या महिन्याच्या अखेरीस मुरूड तालुक्यात देशभरातून पर्यटक येतात. ३१ डिसेंबरनिमित्त मुरूडमध्ये पर्यटकांची रेलचेल असते. मतदासंघातील एका व्यक्तीचं एक हजार रुपयांचं वीजबिल थकित आहे. मी राठोड यांना म्हटलं की, ५ जानेवारीनंतर तुम्ही ही वसुली करा, कारण सध्या लोकांकडे पैसे नाहीत. लोकांना ५ जानेवारीपर्यंतचा अवधी द्या. मी त्यांच्याकडे १० वेळा विनंती केली.”
हे ही वाचा >> मनोज जरांगेंचं २० जानेवारीपासून मुंबईत बेमुदत उपोषण, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले…
आमदार महेंद्र दळवी म्हणाले, हा अधिकारी गेल्या काही दिवसांपासून लोकांना दमदाटी करतोय. त्यांना सांगतोय ‘मी असा वागलो तर माझी बदली होईल.’ त्यामुळे मी त्याच्या वरिष्ठांशी बोललो आणि त्याची बदली करायला सांगितलं. त्याला लोकप्रतिनिधींशी कसं बोलायचं ते कळत नाही, त्याचं वागणं, बोलणं योग्य नव्हतं. खरंतर त्याला बदली हवी आहे, म्हणून तो असा वागतोय. मी माझ्या धमकीचं समर्थन करत नाही. परंतु, त्याचं बोलणंदेखील योग्य नव्हतं.