लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रामध्ये महायुतीला फक्त १७ जागा मिळवण्यास यश आलं आहे. तर महाविकास आघाडीला ३० जागा मिळाल्या आहेत. महाराष्ट्रात महायुतीला आलेल्या अपयशानंतर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देण्यासंदर्भात सूचक विधान केले होते. त्याबाबत त्यांनी दिल्लीत वरिष्ठांच्या भेटीगाठीही घेतल्या आहेत. यावर आता विविध नेते प्रतिक्रिया देत आहेत. तसेच लोकसभा निवडणुकीत महायुतीला कमी जागा मिळाल्यानंतर आता शिवसेना शिंदे गटातील काही काही आमदार हे उद्धव ठाकरे यांच्या संपर्कात असल्याची चर्चा आहे. यावर शिवसेना शिंदे गटाचे नेते गुलाबराव पाटील यांनी भाष्य केलं असून ठाकरे गटावर हल्लाबोल केला आहे.

गुलाबराव पाटील काय म्हणाले?

“तिकडे कोण गेलं त्यांची नावं सांगा. अशा प्रकारचे दावे गेल्या अडीच वर्षांपासून मी ऐकत आलो आहे. माझा अशा प्रकारच्या दाव्यावर विश्वास नाही, अशी प्रतिक्रिया गुलाबराव पाटील यांनी दिली. देवेंद्र फडणवीस यांच्या राजीनाम्याच्या चर्चांवर बोलताना गुलाबराव पाटील म्हणाले, “दोन-तीन दिवसांपासून चर्चा सुरु आहेत. मात्र, लोकसभेच्या निवडणुकीत महायुतीला अपयश फक्त महाराष्ट्रातच आलं नाही. तर आणखी काही राज्यात देखील आलेलं आहे. अशी दोन तीन राज्य आहेत. आपल्याला अपयश आलं असलं तरी त्यावर राजीनामा देणं हा पर्याय नाही”, असं मत गुलाबराव पाटील यांनी व्यक्त केलं.

हेही वाचा : ईडीने जप्त केलेली १८० कोटींची मालमत्ता प्रफुल्ल पटेलांना परत मिळणार; ‘वॉशिंग मशीनची कमाल’, राऊतांचा आरोप

ते पुढं म्हणाले, “राजीनामा देणं हा पर्याय नसून त्यामध्ये दुरुस्ती करणं हा पर्याय आहे. पण शेवटी तो त्यांच्या पक्षाचा प्रश्न आहे. मला वाटतं त्यावर काही तोडगा निघेल. आता आमचे ७ खासदार या निवडणुकीत निवडून आले. एक जागा आमची थोड्याफार मताने पडली. अन्यथा आमचे ८ खासदार झाले असते”, असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं.

आमदार ठाकरे गटाच्या संपर्कात असल्याच्या चर्चांवर बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं, “आता गर्दीमध्ये साप सोडण्याचा काही लोकांचा धंदा आहे. त्यांनी तो साप सोडलेला आहे. मात्र, साप कसा पकडायचा हे आम्हाला माहिती आहे”, असं सूचक विधान गुलाबराव पाटील यांनी केलं. त्यांच्या या विधानाचा रोख कुणाकडे आहे, यावर आता तर्कवितर्क लावण्यात येत आहेत.