Rahul Shewale : महायुती सरकारने पालकमंत्री पदाची यादी जाहीर केल्यानंतर महायुतीत धुसफूस सुरु झाल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. याचं कारण म्हणजे महायुतीमधील काही मंत्र्यांना पालकमंत्री पदाच्या यादीतून डावलण्यात आलं. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे नेते तथा मंत्री भरत गोगावले आणि मंत्री दादा भुसे यांचा समावेश आहे. भरत गोगावले यांनी आपली नाराजीही बोलून दाखवली. यानंतर अखेर रायगड आणि नाशिकच्या पालकमंत्र्यांच्या नियुक्तीला स्थगिती देण्याचा निर्णय सरकारने घेतला. यातच उदय सामंत यांच्याबाबत काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि शिवसेनेचे (ठाकरे) खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका दाव्यामुळे चर्चांना उधाण आलं आहे.
“भाजपा आता एकनाथ शिंदे यांना बाजूला करेल आणि शिवसेनेत नवा ‘उदय’ होईल”, असं विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांनी म्हटलं होतं. त्यांच्या या विधानानंतर राजकारणात उलटसूलट चर्चा रंगली. यानंतर आता शिंदे गटाचे नेते तथा माजी खासदार राहुल शेवाळे यांनी एक मोठं विधान केलं आहे. “राज्यात २३ जानेवारीला मोठा राजकीय भूकंप होणार आहे”, असा दावा राहुल शेवाळे यांनी केला आहे. तसेच विजय वडेट्टीवार आणि संजय राऊत यांच्या विधानालाही राहुल शेवाळे यांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
राहुल शेवाळे नेमकं काय म्हणाले?
“येत्या २३ जानेवारीला एक मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्या पक्षाचं अस्तित्व टिकवण्यासाठी आणि आपल्या पक्षातील आमदारांना टिकवण्यासाठी अशा बातम्या काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार आणि खासदार संजय राऊत पसरवत आहेत. मात्र, काँग्रेसचे काही आमदार आणि ठाकरे गटाचे काही आमदार शिवसेना शिंदे गटात प्रवेश करण्यासाठी इच्छुक आहेत. त्यांची संख्या १० ते १५ अशी आहे. त्यामुळे त्यांच्या पक्षात कुठेतरी फूट पडू शकते, दुसऱ्याच्या ‘उदया’पेक्षा स्वत:च्या अस्ताची काळजी त्यांनी घेतली पाहिजे”, असं राहुल शेवाळे यांनी संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या विधानासंदर्भात बोलताना म्हटलं आहे.
विजय वडेट्टीवार काय म्हणाले?
“मराठीमध्ये एक म्हण आहे,‘तुझं माझं जमेना आणि तुझ्यावाचून करमेना’ अशी काहीशी स्थिती महायुतीमध्ये पाहायला मिळत आहे. नाराजी दाखवून पुन्हा काहीतरी पदरात पडेल असा प्रयत्न दिसत आहे. एकनाथ शिंदे यांची स्थिती इतकी बिकट झाली आहे की त्यावर मी न बोललेलं बरं. त्यावर मी एखादा शब्द वापरला तर ते चुकीचं ठरेल. सध्याची महायुतीमधील स्थिती पाहता एकनाथ शिंदे यांची गरज संपली आहे का? असा प्रश्न उपस्थित होत आहे. एकनाथ शिंदे स्वतःहून बाजूला व्हावेत म्हणून त्यांच्या मित्रपक्षांकडून वेगवेगळे प्रयत्न होत आहेत का अशी भीती मला वाटत आहे. मी एक वक्तव्य करत आहे. ज्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांना संपवून एकनाथ शिंदे यांना पुढे आणलं. त्याचप्रमाणे आता एकनाथ शिंदे यांना संपवून उद्या एक नवीन ‘उदय’ पुढे आणला जाईल. तो ‘उदय’ कुठला असेल ते मी सांगत नाही. मात्र त्याला पुढे आणण्याचा प्रयत्न होईल अशी स्थिती आपल्याला पाहायला मिळेल.”
उदय सामंतांनी काय स्पष्टीकरण दिलं?
खासदार संजय राऊत आणि विजय वडेट्टीवार यांच्या विधानानंतर उदय सामंत यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले की “शिवसेना (ठाकरे) पक्षाचे नेते संजय राऊत यांनी माझ्याबद्दल केलेलं वक्तव्य मी नुकतंच ऐकलं. त्यांचे वक्तव्य हा एक राजकीय बालिशपणा आहे. माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जो उठाव केला, त्यात मी सामील होतो. त्यामुळेच मला दोनदा राज्याचे उद्योग मंत्रिपद मिळाले. याची मला पूर्ण जाणीव आहे. मला राजकीय जीवनात घडवण्यासाठी शिंदे यांनी केलेले प्रयत्न मी कधीही विसरू शकत नाही.”