राज्यात विधानसभेची निवडणूक लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर सर्वच राजकीय पक्ष तयारीला लागले आहेत. एकीकडे महायुतीमधील नेत्यांच्या बैठका तर दुसरीकडे महाविकास आघाडीमधील नेत्यांच्या बैठका सुरू आहेत. जागा वाटपाबद्दल नेत्यांमध्ये खलबतं सुरू आहेत. अशातच शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी केलेल्या एका विधानानंतर महाविकास आघाडीत धुसफूस सुरु झाल्याची टीका सत्ताधाऱ्यांकडून होऊ लागली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

‘विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित केला पाहिजे’, असं मत संजय राऊत यांनी व्यक्त केलं. यावरून आता महाविकास आघाडीमधील नेत्यांकडून प्रतिक्रिया येत आहेत. यातच आता शिवसेना शिंदे गटाचे नेते संजय शिरसाट यांनी हल्लाबोल केला आहे. “महाविकास आघाडीत बिघाडी सुरु झाली असून त्यात संजय राऊतांनी काडी टाकाण्यास सुरुवात केली”, असा टोला संजय शिरसाट यांनी लगावला आहे.

संजय शिरसाट काय म्हणाले?

आज उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी विधानभवनात एका लिप्टमधून प्रवास केला. यावर बोलताना संजय शिरसाट म्हणाले, “उद्धव ठाकरे आणि देवेंद्र फडणवीस यांनी एका लिप्टमधून प्रवास केला. याचा अर्थ समजून घ्या की आमचे वैयक्तिक भांडण नाही. उद्धव ठाकरे यांना संजय राऊत यांच्यासारखे काहीजण मिसगाईड करतात. राजकीय भांडण हे वेगळं असतं. मात्र, प्रत्येकाचे वैयक्तिक संबंध असतात. बाळासाहेब ठाकरे नेहमी म्हणायचे की मनभेद कधीही नसावे. मनभेद नसावे याचं उदाहरण आज आपण पाहिलं. महाराष्ट्राची संस्कृती जपण्याचे काम नेत्यांनी केलं पाहिजे. त्यामुळे या भेटीला आम्ही वेगळं काहीही समजत नाही. त्यांची भेट झाली आम्हाला समाधान आहे”, असं संजय शिरसाट यांनी म्हटलं.

हेही वाचा : महायुतीत जुंपली; “आम्हाला हलक्यात घेऊ नका”, राष्ट्रवादीच्या आमदाराचा इशारा, शिंदेंच्या आमदारानेही सुनावलं

महाविकास आघाडीवर टीका

विधानसभा निवडणुकीसाठी महाविकास आघाडीने मुख्यमंत्रीपदाचा चेहरा घोषित करण्यासंदर्भात संजय राऊत यांनी केलेल्या विधानावर बोलताना संजय शिरसाट यांनी म्हटलं, “संजय राऊत यांना मुख्यमंत्री पदासाठी कोणाचा चेहरा पाहिजे? हे त्यांनी ठरवले पाहिजे. त्यांना मुख्यमंत्री पदासाठी उद्धव ठाकरे यांचा चेहरा पाहिजे असेल तर मला वाटतं काँग्रेस हे मान्य करणार नाही. याचं कारण असं आहे की काही दिवसांपूर्वी महाविकास आघाडीच्या वज्रमूठ सभा झाल्या. त्या सभांमध्ये खुर्च्यामधील बदल केलेलाही काँग्रेसला मान्य नव्हता. त्यामुळे ते उद्धव ठाकरेंच्या मुख्यमंत्री पदाच्या चेहऱ्यावर निवडणुका लढतील याची शक्यता नाही. एकवेळेला महाविकास आघाडी तुटेल पण अशा पद्धतीचा चेहरा समोर येणार नाही. हे सत्य आहे. यावर काँग्रेस नेत्याची प्रतिक्रिया विचारली तर ते काहीच बोलणार नाहीत. कारण आता लोकसभेनंतर ते मोठ्या भावांच्या भूमिकेत आहेत. तसेच त्यांना स्वतंत्र लढण्याची इच्छा असल्यामुळे ते महाविकास आघाडीत राहतील की नाही हा प्रश्न आहे”, असा मोठा दावा संजय शिरसाट यांनी आज माध्यमांशी बोलताना केला.

शिरसाट पुढे म्हणाले, “महाविकास आघाडीमध्ये बिघाडीला सुरूवात झालेली आहे. त्यामध्ये संजय राऊतांनी काडी टाकली आहे. आता ते कुठपर्यंत जाईल याचा काही नेम नाही. उद्धव ठाकरे यांनी काय भूमिका घ्यावी हा त्यांचा प्रश्न आहे. मात्र, महाविकास आघाडी टिकणार नसल्याचं दिसत आहे. याची सुरुवात आजपासून झाली आहे”, अशी खोचक टीका संजय शिरसाट यांनी केली.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena shinde group leader sanjay shirsat criticizes to mahavikas aghadi and sanjay raut thackeray group gkt
Show comments