Shahaji Bapu Patil On Maharashtra Assembly Election 2024 : महायुतीला विधानसभेच्या निवडणुकीत बहुमत मिळालं तर महाविकास आघाडीला मोठा धक्का बसला. महायुतीला बहुमत मिळाल्यानंतर राज्यात महायुतीचं सरकार लवकरच स्थापन होणार आहे. सध्या सरकार स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. या विधानसभेच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाल्याचं पाहायला मिळालं. आता यामध्ये शिवसेना (शिंदे) पक्षाचे शहाजी बापू पाटील यांचाही पराभव झाला.
सांगोला विधानसभा मतदारसंघातून बाबासाहेब देशमुख यांनी मोठ्या मताधिक्यांनी विजय मिळवत त्यांनी शहाजी बापू पाटील यांचा पराभव केला. मात्र, या पराभवानंतर शहाजी बापू पाटील यांनी पराभवाचं चिंतन बैठक घेत आपल्या कार्यकर्त्यांशी संवाद साधला आहे. यावेळी शहाजी बापू पाटील यांनी थेट राजकारणातून निवृत्ती घेण्याच्यासंदर्भात विधान केलं. त्यांच्या या विधानानंतर राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा रंगल्या आहेत.
शहाजी बापू पाटील काय म्हणाले?
“सांगोला (Sangola) तालुका सुखी होत नाही तोपर्यंत मी काम करत राहणार आहे. माझा शेवटचा श्वास असेपर्यंत मी काम करत राहणार आहे. मी हॉस्पिटलमध्ये होतो तेव्हा मृत्यूच्या दाढेत असताना मला बोलता येत नव्हतं तरीही मी एकनाथ शिंदे यांना सांगितलं की माझी तेवढी उजनीची एक फाईल करा. मला माहिती होतं की एकदा निवडणूक लागल्यानंतर हे पुन्हा लांबणीवर पडेल. मग त्या फाईलवर सही देखील आणली. देवेंद्र फडणवीस यांनी त्याचं टेंडर केलं, अतिशय वेगात वर्क ऑर्डर देखील झाली आणि आज त्या ठिकाणी पाईप देखील आले आहेत”, असं शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं.
हेही वाचा : महाराष्ट्रातील सत्तास्थापनेवर अजित पवारांचं मोठं विधान; म्हणाले, “एक मुख्यमंत्री, दोन उपमुख्यमंत्री…”
“जर मी तेव्हा माझ्या जिवंत राहण्याचा विचार करत बसलो असतो तर आज १४ गावांचा प्रश्न सुटला नसता. पण आज १४ गावांचा वनवास संपणार आहे. पुढच्या सहा महिन्यांत तुमच्या शेतात पाणी नाही आणलं तर राजकारणातून निवृत्ती जाहीर करेन. सहा महिन्यांत सर्व हिरवंगार होईन. मात्र, ज्यावेळी एखादं वैभव प्राप्त होत असतं तेव्हा तुमचा असंख्य लोक द्वेश करत असतात”, असंही शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं.
“गुवाहाटीला गेल्यानंतर आणि परत आल्यानंतर तुमच्या सर्वांच्या आशीर्वादाने आणि एकनाथ शिंदे यांच्या प्रेमामुळे एक प्रसिद्धीचं वलय मला मिळालं. मात्र, यामुळे विरोधकांच्या काळजात अशी धडकी भरली की काहीही झालं तरी माझा पराभव करायचा असं ठरवलं असेल. कारण मी स्पष्ट वक्ता आहे, टीव्हीच्या समोर गेलो, तेव्हा मी काहीही खोटं बोललो नाही आणि बोलणारही नाही. एवढंच नाही तर याचा माझ्या राजकारणात काय परिणाम होईल याचा मी विचार केला नाही. मी जनतेला जे सत्य सांगायचं ते सत्य मी सांगत गेलो. त्याचा परिणाम काय होईल याचा विचार मी केला नाही. मी एवढं स्पष्ट बोलू नये, म्हणून मला अनेकजण सल्ले देत होते. मृत्यूलाही मी अडचण समजत नाही, तसं मी राजकारणालाही अडचण समजत नाही”, असंही शहाजी बापू पाटील यांनी म्हटलं.