Kiran Samant On Rajan Salvi : आगामी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर शिवसेना ठाकरे गटाला मोठा धक्का बसणार असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात आहे. माजी आमदार राजन साळवी हे ठाकरे गट सोडणार असल्याचं बोललं जात आहे. याबाबत राजन साळवी यांनी काही दिवसांपूर्वी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची भेट घेतली होती. त्या भेटीनंतर त्यांनी सूचक भाष्य देखील केलं होतं. दरम्यान, राजन साळवी यांच्याबाबत आता आमदार किरण सामंत यांनी मोठं विधान केलं आहे. ‘लोकसभेनंतर राजन साळवी हे शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार होते. मात्र, त्यांना वाटलं की राज्यात महाविकास आघाडीचं सरकार येईल आणि आपल्याला मंत्रिपद मिळेल, त्यामुळे त्यांनी शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश केला नाही’, असा गौप्यस्फोट किरण सामंत यांनी केला आहे.

किरण सामंत काय म्हणाले?

राजन साळवींबाबत विचारलेल्या प्रश्नांबाबत बोलताना किरण सामंत म्हणाले, “मला निवडणुकीच्या पूर्वीच विश्वास होता की मी ही निवडणूक जिंकेल. सध्या माध्यमांमधून मी पाहत आहे की ते भाजपा, शिवसेना शिंदे गटात प्रवेश करणार अशा चर्चा सुरु आहेत. मात्र, त्यांच्यासाठी ठाकरे गटाचेही दार बंद झाले आहेत असं मी ऐकलं आहे. त्यांच्या या अस्थिरपणाच्या भूमिकेमुळे काही माजी लोकप्रतिनिधी आमच्या पक्षात प्रवेश करत आहेत. तसेच काही प्रमुख पदाधिकारी देखील आमच्याकडे प्रवेश करणार आहेत. तसेच जर त्यांनी दुसऱ्या कोणत्या पक्षात प्रवेश केला तर त्या पक्षातील लोक देखील आमच्या संपर्कात आहेत. त्यामुळे त्या पक्षातून देखील अनेक जण आमच्याकडे प्रवेश करतील”, असं किरण सामंत यांनी म्हटलं आहे.

‘साळवींच्या कोणत्याही भूमिकेचा फायदाच…’

“राजन साळवींनी कोणतीही राजकीय भूमिका घेतली तरी त्यांच्या भूमिकेचा आम्हाला फायदा होईल. तसेच राजन साळवी यांच्याबरोबर दुसऱ्या पक्षात कोणीही जाण्यास तयार नाही. त्यांच्या पक्षातील अनेकजण आमच्या संपर्कात आहेत. ते ज्या पक्षात जातील त्या पक्षातील लोक आमच्या पक्षात येतील म्हणून त्यांचा पक्षप्रवेश रखडला आहे असं मला वाटतं”, असा मोठा दावा किरण सामंत यांनी केला.

साळवींना शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑफर आहे का?

राजन साळवी यांना शिंदेंच्या शिवसेनेकडून ऑफर असल्याची चर्चा आहे, याबाबत प्रतिक्रिया विचारली असता किरण सामंत म्हणाले, “राजन साळवींना लोकसभेच्या निवडणुकीनंतर देखील शिवसेनेची (शिंदे) ऑफर होती. ते देखील येतो म्हणून सांगत होते. मात्र, त्यांना असं वाटत होतं की, महाविकास आघाडीची सत्ता येणार आणि मी मंत्री होणार, त्यामुळे ते ठाकरे गटात राहिले. मात्र, त्यांना पराभवाला सामोरं जावं लागलं. पण राज्यात महायुतीची सत्ता आली. मात्र, त्यांनी अनेकदा प्रयत्न केले असं मी ऐकलंय. पण यात किती तथ्य आहे मला माहिती नाही”, असं किरण सामंत यांनी म्हटलं आहे.

Story img Loader