Shahajibapu Patil On Majhi Ladki Bahin Yojana : विधानसभेची निवडणूक जवळ आली आहे. त्यामुळे राज्यात अनेक राजकीय घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे महायुती तर दुसरीकडे महाविकास आघाडीने राज्यभरात सभांचा धडाका लावला आहे. विविध मतदारसंघात जाऊन मेळावे घेत निवडणुकीची रणनीती आखली जात आहे. यातच महायुती सरकारने काही दिवसांपूर्वी सुरु केलेल्या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेची राज्यात मोठी चर्चा सुरु आहे. या योजनेच्या माध्यमातून लाभार्थी महिलांना दर महिन्याला १५०० रुपये देण्यास सुरुवात झाली आहे. मात्र, विरोधकांकडून मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेवरून महायुतीवर टीका करण्यात येत आहे. अशातच शिवसेना शिंदे गटाचे आमदार शहाजीबापू पाटील यांनी लाडकी बहीण योजनेबाबत एक विधान केलं आहे. “आम्ही गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहि‍णींना दर महिन्यांना १५०० रुपये मिळाले नसते”, असं आमदार शहाजीबापू पाटील यांनी आज एका सभेत बोलत म्हटलं आहे.

शहाजीबापू पाटील काय म्हणाले?

“राज्यातील तळागाळातील लोकांच्या कामाचे अनेक प्रश्न महायुती सरकार सोडत आहे. राज्य सरकार अनेक जीआर काढत आहे, अनेक निर्णय घेत आहे. आता भाषणात काय सांगू आणि काय नको असं होतं. मात्र, आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर लाडक्या बहि‍णींना महिन्याला १५०० रुपये मिळाले असते का? आम्ही जर गुवाहाटीला गेलो नसतो तर शेतकऱ्यांचे वीज बिल कायमचे माफ झाले असते का?”, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं आहे.

हेही वाचा : Politics : “देवेंद्र फडणवीसांनी उद्धव ठाकरेंची मातोश्रीवर जाऊन भेट घेतली आणि..”, वंचित बहुजन आघाडीचा दावा

शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांवर शिवसेना ठाकरे गटाकडून अनेकदा ५० खोक्याचा उल्लेख करत टीका करण्यात येते. मात्र, आता यावर आमदार शहाजीबापू पाटील यांनी उद्धव ठाकरे यांना आव्हान देत महाविकास आघाडीवर हल्लाबोल केला आहे. शहाजीबापू पाटील म्हणाले, “हिंमत असेल तर उद्धव ठाकरे यांनी त्यांचा मुलगा आदित्य ठाकरे यांच्या डोक्यावर हात ठेवायचा आणि सांगायचं की आम्हाला ५० खोके दिले म्हणून सांगावं. अन्यथा मी माझ्या मुलाच्या डोक्यावर हात ठेवून सांगतो की आम्हाला ५० खोके मिळाले नाहीत”, असं शहाजीबापू पाटील यांनी म्हटलं.

दरम्यान, शहाजीबापू पाटील यांनी यावेळी महाविकास आघाडीच्या नेत्यांवरही हल्लाबोल केला. ते म्हणाले, “कोणी सोन्याचं दुकान टाकतंय, कोणी मॉल टकतंय, कोणी शालेय साहित्याचं दुकान टाकतंय. मात्र, महाविकास आघाडीने आता भंगार विकायला सुरुवात केली आहे”, अशी खोचक टीका शहाजीबापू पाटील यांनी केली.