Sanjay Raut On Maharashtra Government Formation : विधानसभेच्या निवडणुकीत महायुतीला बहुमत मिळालं, तर महाविकास आघाडीचा मोठा पराभव झाला. बहुमत मिळाल्यानंतर महायुतीच्या नेत्यांनी राज्यात सरकार स्थापनेसाठी हालचाली सुरु केल्या आहेत. विधानसभेचा निकाल लागून आज आठ दिवस होऊन गेले. मात्र, अद्यापही महायुतीचं सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. यासाठी महायुतीच्या नेत्यांमध्ये बैठकांवर बैठका सुरु आहेत. यातच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांची दिल्लीत गृहमंत्री अमित शाह यांच्याबरोबर बैठक देखील झाली. मात्र, या बैठकीनंतरही अद्याप सरकार स्थापन होऊ शकलेलं नाही. त्यामुळे सरकार स्थापन का झालं नाही? यावरून विरोधकांनी टीकेची झोड उठवली आहे. मात्र, गृहमंत्री पदावरून शिंदेंची शिवसेना आणि भाजपामध्ये रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जातंय.
या सर्व घडामोडींवर शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी मोठं विधान केलं आहे. “एका गृहमंत्री पदावरून हे सरकार अडलेलं नाही, तर यामागे वेगळी कारणं आहेत”, असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या विधानामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं आहे. तसेच महायुतीचं सरकार अद्याप का स्थापन होऊ शकलं नाही? याबाबत आता अनेकांनी तर्कवितर्क लावण्यास सुरुवात केली आहे.
हेही वाचा : “…अन् शिंदे म्हणाले, मी सत्तेबाहेर राहून काम करेन”, गोगावलेंनी सांगितल्या शिवसेनेच्या अंतर्गत घडामोडी
संजय राऊत काय म्हणाले?
“मला एक कळत नाही. भारतीय जनता पक्ष हा जगातला एक नंबरचा पक्ष आहे. त्यांच्या पक्षात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासारखा मजबूत नेता आहे. महाराष्ट्रात देवेंद्र फडणवीस आहेत. मग एका गृहमंत्री पदावरून या राज्याचं सरकार अधांतरी लटकून पडलेलं आहे. मग हे कसले मजबूत नेते? तुमच्याकडे बहुमत आहे, तुमच्याकडे स्वत:चा बहुमताचा आकडा आहे. तुमच्याबरोबर ४० आमदार घेऊन अजित पवार आहेत. तुमच्याबरोबर शिंदे गटाचे लोक आहेत की नाही हे मला माहिती नाही. ते भविष्यात काय करतील माहिती नाही. बहुमत असताना तुम्ही शपथ घेत नाहीत. राज्याला सरकार देत नाही. राजभवनामध्ये सरकार स्थापनेचा दावा करायला तयार नाहीत. त्यात तुमचे जे समर्थक आमदार आहेत त्यांचे नावे द्यायला तुम्ही तयार नाहीत. राज्यपालांकडून तुम्ही सरकार स्थापनेचं निमंत्रण घेतलेलं नाही आणि तुम्ही मांडव घातला? राजभवन तुम्ही चलवताय का?”, असे अनेक सवाल संजय राऊत यांनी महायुतीला केले.
“हे सरकार एका गृहमंत्री पदावरून अडकलेलं नाही. भाजपाने मनात आणलं तर समोरचे जे मागण्या करत आहेत ना? तर हे एका मिनिटात चिरडून टाकतील. हे सर्व डरपोक लोक आहेत, ईडी आणि सीबीआयला घाबरून पळून गेलेले लोक आहेत. ते स्वबळावर निवडून आलेले नाहीत. ते कसे निवडून आले? हे लोकांना माहिती आहे आणि त्यांनाही माहिती आहे. त्यांना जनमताचा पाठिंबा नाही. पण एका गृहमंत्री पदावरून हे सरकार अडलेलं नाही, तर यामागे काही वेगळी कारणं आहेत का? फक्त एक गृहमंत्री पद हा सरकार स्थापनेचा वादाचा विषय असू शकत नाही. या सर्व गोष्टीचा उलगडा व्हायला हवा. अन्यथा आम्ही आमचं बंद पुस्तक उघडू”, असा इशाराही संजय राऊत यांनी दिला.