मराठा आरक्षणासाठी गेल्या दोन महिन्यांपासून सातत्याने सरकारला इशारा देणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांनी १५ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा राज्यव्यापी दौरा सुरु केला आहे. सरकारला २७ डिसेंबपर्यंतची मुदत त्यांनी यावेळी दिली आहे. मराठा समाजाला सरसकट आरक्षण द्या अन्यथा आम्ही शांततेत आंदोलन सुरु करु आणि तुम्हाला ते झेपणार नाही असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी वारंवार दिला आहे. अशात मनोज जरांगे पाटील यांची आज कल्याणमध्ये सभा होणार आहे. या सभेच्या बॅनरने लक्ष वेधून घेतलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे कल्याणच्या बॅनरवर?

मनोज जरांगे पाटील यांच्या कल्याणमधल्या सभेचा जो बॅनर कल्याण पूर्व भागात लावला आहे त्यावर खासदार श्रीकांत शिंदे यांचा फोटो आहे. तसंच शिंदे गटाच्या इतरही नेत्यांचे फोटो आहेत. त्यामुळे या सभेला आणि मनोज जरांगे पाटील यांना शिंदे गटाने पाठिंबा दिला आहे का? अशी चर्चा आता रंगली आहे.

मुख्यमंत्र्यांचा बालेकिल्ला असणाऱ्या ठाणे जिल्ह्यात ही पहिली सभा असल्याने मराठा क्रांती मोर्चाकडून सभेसाठी जोरदार तयारी सुरू करण्यात आली आहे. कल्याणमध्ये झेंडे आणि बॅनर लावण्यात आले असून हा बॅनर चर्चेचा विषय ठरला आहे. कारण कल्याण पूर्वेत मनोज जरांगे पाटील यांच्या सभेचे काही बॅनर लागले आहेत. यावर चक्क मुख्यमंत्री यांचे सुपुत्र खा.डॉ.श्रीकांत शिंदे,शिवसेना शहरप्रमुख महेश गायकवाड यांच्यासह माजी नगरसेवक यांचे फोटो आहेत. त्यामुळे मनोज जरांगे पाटील सभेला शिवसेना शिंदे गटाचा पाठिंबा आहे का? असा सवाल आता उपस्थिती केला जात आहे. त्यामुळे जरांगे यांची मुख्यमंत्र्यांच्या बालेकिल्ल्यात सभा होत असल्याने या सभेकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मनोज जरांगे पाटील मराठा आंदोलनामुळे प्रचंड चर्चेत

मराठा आंदोलनाच्या निमित्ताने मनोज जरांगे पाटील प्रचंड चर्चेत आले आहेत. मराठा समाजाला आरक्षण मिळत नाही तोवर उपोषण मागे घेणार नसल्याची ठाम भूमिका त्यांनी घेतली होती. दोनवेळा उपोषण झाल्यानंतर आता त्यांनी सरकारला २७ डिसेंबपर्यंतचा अल्टिमेटम दिला आहे. जालना जिल्ह्यातून सुरू झालेल्या मराठा आंदोलनातील केंद्रस्थानी असणारे मनोज जरांगे हे मूळचे बीड जिल्ह्यातील. गेवराई तालुक्यातील माथोरी हे त्यांचे मूळ गाव. शहागड ही त्यांची सासुरवाडी. गेल्या १२ -१५ वर्षापासून ते शहागडमध्ये राहतात. माथोरी गावातील हे अल्पभूधारक शेतकरी आहेत.

मराठा आंदोलने सुरू झाली तेव्हापासून छोट्या- मोठ्या आंदोलनात सहभागी होणारे, प्रसंगी पुढारपण करता आले तर एखादे भाषण करणाऱ्या जरांगे यांच्या मागे माेठे पाठबळ उभे राहील, अशी शक्यता आंतरवलीच्या आंदोनापूर्वी नव्हती. २०१५ पासून गावागावात आंदोलन करण्यासाठी बारावीपर्यंत शिकलेल्या जरांगे यांनी विविध आंदोलने केली. अगदी गेल्या काही महिन्यात अनेक गावात उपोषण केले. त्या- त्या गावातील लोक त्यांच्या आंदोलनात सहभागी होते. आता मनोज जरांगे पाटील यांनी मराठा आरक्षणासाठी मोठा लढा उभा केला आहे. मराठा आरक्षणासाठी ते १५ नोव्हेंबरपासून पुन्हा एकदा महाराष्ट्राचा दौरा करत आहेत. मात्र कल्याणमध्ये लागलेल्या या बॅनरची चर्चा चांगलीच रंगली आहे.