Ramdas Kadam On NCP Ajit Pawar Group : विधानसभा निवडणुकीनंतर राज्यात महायुतीचं सरकार स्थापन झालं. त्यानंतर मंत्रिमंडळाचं वाटप, खातेवाटप आणि पालकमंत्री पदाचंही वाटप करण्यात आलं. खातेवाटपानंतर आणि पालकमंत्री पदाच्या वाटपानंतर महायुतीमधील शिवसेना (शिंदे) पक्ष आणि राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षात रस्सीखेच सुरु असल्याचं बोललं जात होतं. यातच अद्यापही रायगडच्या पालकमंत्री पदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरु आहे. या वादानंतर रायगडच्या पालकमंत्री पदाच्या निर्णयाला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्थगिती दिलेली आहे.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

दरम्यान, असं असतानाच आता शिवसेना (शिंदे) नेते रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार) कार्यकर्त्यांवर एक आरोप केला आहे. ‘निवडणुकीत राष्ट्रवादीच्या ९० टक्के कार्यकर्त्यांनी योगेश कदम यांचं काम केलं नाही’, असा आरोप रामदास कदम यांनी केला. एवढंच नाही तर आपण याबाबत सुनील तटकरे यांच्याकडे तक्रार करणार असल्याचंही त्यांनी म्हटलं आहे. त्यामुळे राष्ट्रवादी आणि शिंदे गटात वादाची ठिणगी पडल्याची चर्चा रंगली आहे.

रामदास कदम काय म्हणाले?

“राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाचे प्रदेशाध्यक्ष तथा खासदार सुनील तटकरे यांचा उजवा हात असलेल्या गावांमध्ये देखील योगेश कदम यांना मते मिळालेली नाहीत. याबाबत मी सुनील तटकरे यांची भेट घेऊन सांगणार आहे. मात्र, असं असलं तरी आमचे कुठेही मतभेद नाहीत किंवा नाराजीही नाही. कारण सुनील तटकरे यांच्या मनामध्ये असं कदापि येणार नाही. याची मला कल्पना आहे. मात्र, सुनील तटकरे यांच्या कार्यकर्त्यांनी मग त्यामध्ये मंडणगड तालुका प्रमुख असेल किंवा दापोलीचा तालुका प्रमुख असेल, जवळपास ९० टक्के लोकांनी
योगेश कदम यांचं काम केलं नाही. याचा अनुभव आम्ही निवडणुकीत घेतला. यासंदर्भात मी सुनील तटकरे यांच्याकडे लेखी तक्रार करणार आहे. त्यांनी याची दखल घ्यावी”, असं रामदास कदम यांनी म्हटलं आहे. ते टिव्ही ९ मराठी या वृत्तवाहीनीशी बोलत होते.

सुनील तटकरे काय म्हणाले?

रामदास कदम यांनी राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार) पक्षाच्या कार्यकर्त्यांवर केलेल्या आरोपानंतर खासदार सुनील तटकरे यांनी स्पष्टीकरण दिलं. ते म्हणाले, “शिवसेनेचे (शिंदे) नेते रामदास कदम हे जेव्हा माझ्याकडे तक्रार करतील तेव्हा मी नक्कीच त्यासंदर्भातील माहिती घेईल. कारण दापोली, खेड, मंडणगड, गुहागर हा विभाग माझ्या लोकसभा मतदारसंघात येतो. त्यामुळे रामदास कदम यांनी मला पत्र द्यावं. त्यांच्या पत्राची मी दखल घेईल. लोकसभा निवडणुकीत काय घडलं? विधानसभेच्या निवडणुकीत काय घडलं? याची माहिती मी घेईल”, असं सुनील तटकरे यांनी म्हटलं आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena shinde leader ramdas kadam on ncp ajit pawar group mp sunil tatkare raigad politics gkt