“सन्मानाने बोलवा म्हणजे काय?” असा थेट सवाल शिवसेनेनं सध्या सत्तेत असणाऱ्या शिंदे गटातील ४० आमदारांना विचारला आहे. जून महिन्याच्या शेवटच्या आठवड्यातील राजकीय घडामोडींनंतर जुलैच्या पहिल्या आठवड्यात बंडखोर आमदारांचे नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली भाजपा आणि शिंदे गटाचं सरकार स्थापन झाल्यानंतरही शिवसेना आणि बंडखोर आमदारांमध्ये शाब्दिक वाद सुरु आहे. याच पार्श्वभूमीवर शिवसेनेनं आता थेट हिंदुत्वाच्या मुद्द्यापासून ते आघाडीत अडचण असताना आता तिथून निघून या आमदारांना भाजपाच्या तालावरच नाचायचे आहे, असं म्हणत शिंदे गटाला लक्ष्य केलं आहे.
“शिवसेनेत जे काही कथित बंड झाले त्याची पेरणी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होत असतानाच झाली होती, असा गौप्यस्फोट त्यांच्यातल्याच एकाने केला. भारतीय जनता पक्ष सरकार स्थापनेच्या पहिल्या दिवसापासून सरकार पाडायचेच या ईर्षेने कसा कामास लागला होता तेच या आमदारांच्या वक्तव्याने स्पष्ट होते. ‘‘आम्ही तडफडायचो, ज्यांच्या विरोधात लढलो तीच माणसे आपल्यासोबत सत्तेत. आपली कामे कशी होणार?’’ असा प्रश्न या आमदाराने विचारला. २०१४ साली भाजपा-शिवसेना वेगळे लढले. ज्या भाजपाविरोधात शिवसेना लढली त्यांच्याच मांडीला मांडी लावून हे सत्तेत बसले. तेव्हा हा क्रांतिकारी प्रश्न कुणाला का पडू नये की, ‘‘ज्यांच्या विरोधात लढलो त्यांच्या बरोबर सत्तेत कसे बसायचे?’’ हिंदुत्वाचा मुद्दाही तेव्हा उपस्थित केला गेला नाही. भाजपाने तेव्हा हिंदुत्व अजिबात पाळले नाही. तरीही ‘सुरत’फेम अनेक मंत्री नंतर त्या मंत्रिमंडळात सामील झाले. यापैकी आणखी एका सन्माननीय बंडखोर आमदाराने स्पष्ट केले, ‘‘मातोश्रीचे दरवाजे सन्मानाने उघडले तर आम्ही आनंदाने परत येऊ!’’ आता दरवाजे सन्मानाने उघडायचे म्हणजे नक्की कसे काय करायचे?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.
“‘मातोश्री’ची परंपरा व संस्कार असा आहे की तेथे सगळय़ांचाच सन्मान होतो. दरवाजे उघडेच असतात व दाराबाहेरील चपलांचे ढिगारे हेच ‘मातोश्री’चे वैभव आणि श्रीमंती आहे. अलीकडे तर पन्नास ‘मोठे खोके’ भरतील इतक्या चपलांचा ढिगारा मिनिटागणिक ‘मातोश्री’वर होत असतो. हे जे काही कथित बंड वगैरे झाले त्याच्या पहिल्या दिवसापासून उद्धव ठाकरे एका तळमळीने आवाहन करीत आहेत की, ‘‘शिवसेना हे कुटुंब आहे. मातोश्री तुमचे हक्काचे घर आहे. परत फिरा. घरी या!’’ यापेक्षा सन्मानाने बोलविण्याचा दुसरा कोणता मार्ग आहे काय?” असाही सवाल शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारला आहे.
“भारतीय जनता पक्षाच्या फडणवीस सरकारात असताना आजच्या मुख्यमंत्र्यांनी ‘शिवसैनिकांवर अत्याचार होत आहेत, शिवसेनेच्या मंत्र्यांना मान-सन्मान मिळत नाही. निधीवाटपात वाटा नाही,’ असा जाहीर त्रागा करून मंत्रीपदाचा राजीनामाच दिला होता. तेव्हा भाजपाला जी दूषणे दिली तीच आता इतरांना दिली जात आहेत. मुळात महाविकास आघाडीचे सरकार स्थापन झाले ते महाराष्ट्र व जनतेच्या कल्याणावर आधारित किमान समान कार्यक्रमाच्या अंमलबजावणीवर. गेल्या अडीच वर्षांत हिंदुत्वाशी शिवसेनेने किंवा नेत्यांनी तडजोड केल्याचे एकतरी उदाहरण दाखवावे. ‘हिंदुत्व’ म्हणजे धर्मांधता किंवा दंगलींचा माहोल निर्माण करून निवडणुका जिंकायच्या असे नसते बाबांनो! पैगंबर साहेबांच्याबाबत अपशब्द उच्चारल्यावर भारतीय जनता पक्षालाही नुपूर शर्मांपासून हात झटकावे लागले. तिला पक्षातून काढावे लागले. येथे भाजपाने हिंदुत्व धोक्यात आल्याची आरोळी ठोकली नाही. राज्य हे अशाच समन्वयाने चालवायचे असते,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
“तिकडे प. बंगालात ‘सेक्युलर’ ममता बॅनर्जी यांनी त्यांच्याच खासदार महुआ मोईत्रांवर कारवाई केली. का? तर महुआ यांनी कालीमातेवर एक टिप्पणी केल्याने हिंदूंच्या भावना भडकल्याची बोंब भाजपाने मारली. ममतांनी श्रीमती मोईत्रांवर कारवाई केली. या कारवाईमुळेही तृणमूल काँग्रेसचा ‘सेक्युलर’वाद धोक्यात आला नाही. देशभक्ती म्हणजे सडकछाप धर्मांधतेचे ओंगळवाणे प्रदर्शन नाही. सगळ्यांना सांभाळून राज्य व देश पुढे न्यायचा असतो व आघाडीचे सरकार चालवताना कसरती कराव्या लागतात,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
“अटलबिहारी वाजपेयींच्या नेतृत्वाखाली ‘एनडीए’चे सरकार असताना राममंदिर, समान नागरी कायदा, ३७० कलम यांसारखे हिंदुत्वाचे विषय काही काळ गुंडाळून ठेवावे लागले होते, पण मोदींचे पूर्ण बहुमताचे सरकार सत्तेवर येताच राममंदिर, ३७० कलमाचे विषय मार्गी लागले. आपल्याला आपल्या मतांप्रमाणे राज्य चालवायचे असेल व निर्णय अमलात आणायचे असतील तर स्वतःचे बहुमताचे सरकार निवडून आणणे हाच एकमेव पर्याय ठरतो. स्वतःस बंडखोर म्हणवून घेणाऱ्या आमदारांनी कधी या पर्यायाचा विचार केला आहे काय? ‘‘चला साहेब, आता पुरे झाले. हे महाविकास आघाडीचे सरकार थांबवा. आपण बाहेर पडू व स्वबळावर हिंदुत्वाचे सरकार आणू. तोपर्यंत वाटल्यास विरोधी पक्षात बसू!’’ अशी भूमिका या तथाकथित हिंदुत्ववादी बंडखोर आमदारांनी घेतली असती तर त्यांना शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकऱ्यांनी ‘व्वा रे माझ्या मर्दांनो!’ असे बोलून पाठच थोपटली असती. पण यापैकी काहीच घडले नाही,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
“उलट सत्तेतून फक्त सत्तेकडे हाच मार्ग त्यांनी निवडला. इकडे त्यांना महाविकास आघाडीचा जाच होता तरी आता या गटास भाजपाच्या तालावरच नाचायचे आहे. भाजपाला शिवसेनेचा पराभव करायचा नसून शिवसेना संपवायची आहे व पाहुण्याच्या चपलेने विंचू मारायचा आहे. पण विंचवाचा डंख व विष जहाल असते. इंगळी डसली की काय होते ते डोंगर-झुडुपातले राजकारण करणाऱ्यांना समजते. ‘मातोश्री’चे दरवाजे सन्मानाने उघडेच असतात व बाहेर चपलांचे ढिगारे वाढतच आहेत. या वैभवाशी कसा सामना करणार?,” असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय.