राज्याच्या राजकारणामध्ये सध्या हनिमान चालिसाच्या मुद्द्यावरुन सत्ताधारी शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस विरुद्ध भाजपा आणि मनसे असा संघर्ष दिसून येत आहे. त्यातच अमरावतीच्या खासदार नवनीत राणा आणि आमदार रवी राणा यांनी मुख्यमंत्र्याच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानासमोर हनुमान चालिसा पठण करण्याचं आव्हान दिल्याने मुंबईतील राजकारणही चांगलेच तापले. या प्रकरणात सध्या राणा दांपत्याला न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली असतानाच भाजपाने या मुद्द्यावरुन आक्रमक भूमिका घेत कायदा सुव्यवस्थेसंदर्भात प्रश्नचिन्हं उभी केली आहेत. त्यातच भाजपा नेते किरीट सोमय्यांवर खार पोलीस स्थानकाबाहेर हल्ला झाल्याने या प्रकरणात वादाची नवी ठिणगी पडलीय. याच साऱ्याचा समाचार शिवसेनेनं घेतला असून सध्या भाजपाची आणि भाजपा समर्थकांकडून सुरु असणारा प्रकार पाहून दादा कोंडके असते तर त्यांनी नवा सोंगाड्या चित्रपट काढला असता, असा खोचक टोला शिवसेनेनं लागवलाय. या शिवाय ‘किरीट सोमय्या हे भाजपाचे नाच्या असून त्यांचे सुत्रधार फडणवीस आहेत,’ अशी टीकाही शिवसेनेनं केलीय.
भाजपा ज्या मानसिक संक्रमणावस्थेतून जात आहे ते…
“महाराष्ट्रात अराजकतेसारखी परिस्थिती निर्माण झाली असून केंद्र सरकारने कठोर कारवाई करावी, अशी मागणी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी केंद्रीय गृहसचिवांना याबाबत एक सविस्तर पत्र लिहिले याबद्दल आश्चर्य वाटावे असे काहीच नाही. फडणवीस यांच्यासह संपूर्ण महाराष्ट्र भाजपा ज्या मानसिक संक्रमणावस्थेतून जात आहे ते पाहता त्यांच्याकडून दुसरी अपेक्षा करता येणार नाही,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
दादा कोंडके हयात असते तर…
“२०१९ सालात सत्ता गमावल्यापासून फडणवीस वगैरे लोकांना हे राज्य आपले वाटेनासे झाले आहे. महाराष्ट्राचे मीठ त्यांना बेचव लागू लागले आहे. महाराष्ट्रावर कठोर कारवाई करा म्हणजे काय करायचे? तर या मंडळींना वाटतेय म्हणून राष्ट्रपती राजवट लावून मोकळे व्हायचे. आता महाराष्ट्रात राष्ट्रपती राजवट लावण्यासाठी जी कारणे दिली आहेत त्यावर काय बोलायचे! दादा कोंडके हयात असते तर त्यांनी या बोगस कारणमीमांसेवर दुसरा ‘सोंगाड्या’ चित्रपट काढला असता,” असा उपरोधिक टोलाही शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून लागवलाय.
थिल्लर विधाने फडणवीसांना शोभत नाहीत
“अमरावतीच्या खासदार-आमदार पती-पत्नीवर पोलिसांनी त्यांच्या अतिरेकी वागण्याबद्दल कारवाई केली. महाराष्ट्रात हनुमान चालिसा वाचायची असेल तर ती तुमच्या घरात वाचा. कोणी अडवलंय? पण दुसऱ्यांच्याच घरात जाऊन वाचू हा अट्टहास का, असा प्रश्न मुंबईच्या हायकोर्टानेही विचारला आहे. तरीही राणा दांपत्यावरील कारवाई म्हणजे हिटलरशाही वगैरे असल्याचे फडणवीस बोलतात. श्रीमती राणांचा छळ केला, त्यांना साधे पाणीही दिले नाही. त्या मागासवर्गीय आहेत म्हणून त्यांचा छळ केला, अशी थिल्लर पद्धतीची विधाने करणे फडणवीस यांना तरी शोभत नाही,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.
रोगट मानसिकतेचे लक्षण आहे
“मुंबईचे पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी राणा दांपत्याचा खार पोलीस स्टेशनातील शाही पाहुणचाराचा व्हिडीओच समोर आणला. त्यामुळे राणांपेक्षा फडणवीस यांचीच पोलखोल झाली आहे. दुसरे असे की, श्रीमती नवनीत राणा या कधीपासून मागासवर्गीय झाल्या? त्यांचे जात प्रमाणपत्र खोटे ठरले आहे. त्यांनी देशाची फसवणूक केली. त्याबद्दल मुंबई पोलिसांनी कारवाई केली. त्यावरून महाराष्ट्र सरकार तत्काळ बरखास्त करावे असे फडणवीस म्हणत असतील तर दादा कोंडके यांना या ‘पांडू’गिरीवर ‘भाजपाचे हवालदार’ असाही एक चित्रपट काढावा लागला असता. फडणवीस व त्यांचे पाताल लोक ज्या पद्धतीने वागत आहेत. ते रोगट मानसिकतेचे लक्षण आहे,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.
हा चमत्कारच म्हणायला हवा
“किरीट सोमय्या हा भाजपाचा एक नाच्या आहे, पण या नाच्याचे सूत्रधार स्वतः फडणवीस आहेत हे आता स्पष्ट झाले. सोमय्या यांनी ‘आयएनएस विक्रांत वाचवा’ या नावाखाली पैसे जमवून अपहार केला. त्यांच्यावर गुन्हा नोंद झाला. हे महाशय सध्या जामिनावर सुटले आहेत. दुसरे असे की, पीएमसी बँक घोटाळ्यातील सोमय्यांचे टेबलाखालचे व्यवहार उघड झाले, त्या प्रकरणाची चौकशी सुरू झाली आहे. या नाच्याने स्वतःच्या गालावर टोमॅटो सॉस फासले व शिवसैनिकांनी हल्ला केला म्हणून बोंब ठोकली. खार पोलीस ठाण्याच्या हद्दीत हे नाटक घडले. सोमय्यांवर दगड मारले त्यामुळे त्यांच्या गाडीची काच फुटली. ती काच त्यांच्या हनुवटीस लागली. त्यामुळे रक्त आले नाही, तर टोमॅटो सॉस बाहेर आला. हा चमत्कारच म्हणायला हवा!,” असा टोला शिवसेनेनं लगावलाय.
फडणवीसांच्याच अध्यक्षतेखाली समिती नेमा
“भाजपाच्या धमन्यांत सच्चेपणाचे, हिंदुत्वाचे रक्त नसून टोमॅटो सॉस आहे हे बाहेर आले व त्याबद्दल महाराष्ट्र सरकारवर कठोरात कठोर कारवाई करावी, म्हणजे ‘प्रेसिडेंट रुल’ लावावा, अशी मागणी फडणवीस साहेबांकडून करण्यात आली आहे. रक्ताऐवजी धमन्यांत टोमॅटो सॉस भरला की, अशा भन्नाट कल्पना एखाद्या राजकीय पक्षाला सुचू शकतात. सोमय्यांच्या गालावरून टोमॅटो सॉस टपकल्याने राज्यात कायदा व सुव्यवस्थेची स्थिती बिघडली आहे काय? यावर गृहमंत्री वळसे-पाटलांनी याचा तपास करण्यासाठी फडणवीसांच्याच अध्यक्षतेखाली एक चौकशी समिती नेमायला हरकत नाही,” असा खोचक टोला शिवसेनेनं लगावला आहे.
फडणवीस या बेताल अर्थमंत्र्यांविरुद्ध…
“देवेंद्र फडणवीस यांच्या मानसिक अवस्थेचे यथार्थ वर्णन शरद पवार यांनी केले आहे. सत्ता गमावल्याची ही अस्वस्थता आहे, पण ती इतक्या खालच्या थराला जाईल, असे वाटले नव्हते. देवेंद्र फडणवीस म्हणतात, ‘आम्ही यापुढे संवाद साधणार नाही, तर संघर्ष करू. कार्यकर्त्यांनो, लढायला सज्ज व्हा.’ हेसुद्धा चांगले आहे, पण कोणत्या मुद्द्यांवर ते लढणार आहेत? देशात महागाईचा आगडोंब उसळला आहे. भाज्या, कडधान्य, पेट्रोल-डिझेल असे सगळेच महागले तरी अर्थमंत्री सीतारामन म्हणतात, ‘छे छे! कोठे आहे महागाई?’ फडणवीस या बेताल अर्थमंत्र्यांविरुद्ध संघर्ष करणार असतील तर चांगलेच आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
ते कोणत्या महाराष्ट्राविषयी बोलतात?
“महागाई, बेरोजगारी, चिनी सैन्याची घुसखोरी असे अनेक ज्वलंत विषय आहेत व त्या विरोधात उभे ठाकले पाहिजे. फडणवीस या विरोधात लढायला तयार असतील तर सांगावे. शिवसेनाही त्यांच्या सोबतीला येईल, नव्हे देशाचा प्रत्येक नागरिक त्या लढ्यात उतरेल, पण दोन थेंब टोमॅटो सॉससाठी लढण्याची त्यांची भाषा महाराष्ट्राच्या लढाऊ बाण्यास काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्रावर कारवाई करावी असे फडणवीस म्हणतात, पण ते कोणत्या महाराष्ट्राविषयी बोलतात? २०१९ पासून त्यांचा महाराष्ट्राशी संबंध तुटला आहे. खरेच, आज दादा कोंडके हवे होते,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.