गेल्या वर्षभरात करोना काळात राज्यात निर्माण झालेली परिस्थिती, ऑक्सिजनचा तुटवडा, आर्थिक संकट या सगळ्या पार्श्वभूमीवर १ मे या महाराष्ट्र दिनी शिवसेनेने भाजपावर परखड शब्दांमध्ये टीका केली आहे. “महाराष्ट्रात मराठी बाण्याचा मुख्यमंत्री आणि सरकार असल्यामुळे दिल्लीचे आजचे पातशहा महाराष्ट्राची हरतऱ्हेने कोंडी करत आहेत. राज्यातलं लसीकरण दिल्लीच्या आडमुठेपणामुळे थांबलं आहे. ज्या महाराष्ट्रानं देशाला आर्थिक प्राणवायूचा पुरवठा केला, त्या महाराष्ट्राला आज प्राणवायूचा तुटवडा जाणवतो आहे. महाराष्ट्रात काहीही करून राजकीय आणि आर्थिक गोंधळ निर्माण करून राज्य बदनाम करण्याचे कारस्थान सुरू आहे”, अशा शब्दांत शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनामधून भाजपप्रणीत केंद्र सरकारवर निशाणा साधण्यात आला आहे.

दिल्लीतील सरकारे बदलली तरी…

दरम्यान, देशात सध्या महाराष्ट्राची लूट करण्याचं धोरण सुरू असल्याची टीका शिवसेनेनं अग्रलेखातून केली आहे. “दिल्लीतील सरकारे बदलत राहिली, तरी महाराष्ट्राशी वैर काही संपलेले नाही. महाराष्ट्राचे हक्काचे काही मिळूच द्यायचे नाही. महाराष्ट्राला ओरबाडायचे, त्याची लूट करायची हे धोरण मात्र सर्व काळात कायम राहिले. राज्यातल्या अनेक योजना आणि प्रकल्प गुजरातला नेऊन ठेवले मुंबईचं महत्त्व कमी करायचं आणि राज्याची आर्थिक रसद तोडायची हाच त्यामागचा हेतू होता”, अशा शब्दांत टीका करण्यात आली आहे.

एक रकमी १२ कोटी लशी विकत घ्यायची महाराष्ट्राची तयारी – उद्धव ठाकरे

“गुजरात-महाराष्ट्र ही तशी जुळी भावंडे”

“गुजरात राज्यात करोना रुग्ण रस्त्यांवर तडफडून प्राण सोडताना दिसत आहेत. हे विदारक दृष्य आहे. महाराष्ट्र आणि गुजरात ही तशी जुळी भावंडे. सदैव एका नात्याने एकत्र राहिले. पण त्या नात्यात मिठाचा खडा टाकण्याचा प्रयत्न आजही होतच आहे. गुजरात व्यापारी आहे, पण महाराष्ट्र लढणारा आहे”, असं अग्रलेखात म्हटलं आहे.

महाराष्ट्र लढत राहील…

“महाराष्ट्राने दिल्लीची फालतू गुलामी कधीच पत्करली नाही,. महाराष्ट्राला इथिहास आहे, बूड आहे म्हणून तो टिकला आहे. आज महाराष्ट्रावरचं संकट मोठं आहे. करोना विषाणूने मोठं आव्हान उभं केलं आहे. शंभर वादळे, शंभर भूकंपांनी पडझड होणार नाही त्यापेक्षा जास्त पडझड एका विषाणूने केली. महाराष्ट्र लढत आहे, महाराष्ट्र लढत राहील आणि विजयी होईल!”, असं देखील सामनाच्या अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

Story img Loader