शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजपा सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा आहे, असं म्हणत शिवसेनेनं सत्ताधारी भारतीय जनता पार्टी आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील सरकारवर टीकाकेली आहे. भगतसिंह कोश्यारी यांनी मराठावाडा विद्यापीठातील कार्यक्रमामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांची तुलना केंद्रीय मंत्री नितीन गडकरींशी केल्याच्या मुद्द्यावरुन माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे संपादक असलेल्या ‘सामना’मधून राज्यपालांना माफी मागावीच लागेल असं म्हटलं आहे. तसेच राहुल गांधींनी सावरकरांसंदर्भात केलेल्या विधानावरुन जोडे मारो आंदोलन करणाऱ्यांनी तेच जोडे स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ आल्याचा टोलाही लगावला आहे.

“वीर सावरकर यांचा राहुल गांधी यांच्याकडून ‘माफीवीर’ असा उल्लेख झाला. महाराष्ट्रात पोहोचलेल्या ‘भारत जोडो’ यात्रेतील एका पत्रकार परिषदेत गांधी यांनी सावरकरांच्या दया याचिकेची कागदपत्रे दाखवून वादळ ओढवून घेतले तेव्हा महाराष्ट्रातील भाजपा व त्यांच्या सोबतचा मिंधे गट स्वाभिमान, अपमान वगैरेंच्या नावाने वळवळू लागला, त्यातले काही वळू रस्त्यावर उतरले. त्यांनी ‘‘शिवसेना आता काय करणार?’’ असे विचारून राहुल गांधी यांना जोडे मारण्याचा उपक्रम सुरू केला. आता हे सर्व जोडे स्वत:च्याच हाताने स्वत:च्याच कानाखाली मारण्याची वेळ या जोडेबाजांवर आली आहे,” असा टोला शिवसेनेनं महाराष्ट्रातील सत्ताधाऱ्यांना लगावला आहे.

Anyone embezzling in Anand Dighe's ashram should be thoroughly investigated
आनंद दिघेंच्या आश्रमात ज्यांनी चुकीचे कृत्य केले त्यांना……शिंदे सेनेच्या मंत्र्याने थेटच सांगितले…
What Sharad Pawar Said About Ladki Bahin Yojana
Sharad Pawar : “लाडकी बहीण योजनेमुळे महायुतीचं राज्य…
Small child seriously injured in attack by dog in Pune
पुण्यात कुत्र्याच्या टोळक्यांच्या हल्ल्यात चिमुकला गंभीर जखमी; चाकणमधील घटना
gujrat bjp corporator allegation of misbehave
Gujarat : भाजपाच्या नगरसेविकाचा पक्षातील नेत्यावरच गंभीर आरोप; म्हणाल्या, “त्यांनी माझा हात पकडला अन् व्यासपीठावरून…”
bjp bihar pattern in Maharashtra
‘बिहार पॅटर्न’ला बगल? संघ सक्रिय झाल्यामुळे भाजप श्रेष्ठींच्या मनसुब्यांवर प्रश्नचिन्ह
jammu Kashmir polls
विश्लेषण: निष्ठावंतांची नाराजी भाजपला जम्मू व काश्मीरमध्ये भोवणार? नव्या चेहऱ्यांना संधी?
shivsena thackaray
“पंतप्रधान मोदी ज्याला हात लावतात, ती वास्तू…”; शिवरायांचा पुतळा कोसळण्यावरून ठाकरे गटाचं टीकास्र; मुख्यमंत्र्यांनाही केलं लक्ष्य!
Ajit Pawar in trouble again due to controversial statement
वादग्रस्त विधानाने अजित पवार पुन्हा अडचणीत

“महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी पुन्हा एकदा माती खाल्ली व छत्रपती शिवरायांचा अपमान केला. मराठवाडा विद्यापीठातील एका ‘राजकीय’ सोहळ्यात राज्यपालांनी शिवरायांची तुलना नितीन गडकरी यांच्याशी केली. हा विषय तूर्त बाजूला ठेवू, पण ‘‘शिवाजी महाराज हे जुनेपुराणे, कालबाह्य झाले आहेत, छत्रपती हे जुन्या जमान्यातील ‘हीरो’ आहेत’’ असे विधान करून महाराष्ट्राच्या अस्मितेवर व स्वाभिमानावर पाय ठेवला. हे भयंकरच आहे. महाराष्ट्रात वीर सावरकरांच्या अवमानाचा मुद्दा गाजत असतानाच भाजपा व मिंधे गटाचा पाय त्यांच्याच राज्यपालांच्या धोतरात अडकून कपाळमोक्ष झाला आहे,” असं ‘सामना’च्या अग्रलेखामध्ये म्हटलं आहे.

“राज्यपालांनी शिवरायांचा अपमान केला त्याच वेळी भारतीय जनता पक्षाचे अधिकृत राष्ट्रीय प्रवक्ते सुधांशू त्रिवेदी यांनी महाराष्ट्राचे आराध्य दैवत शिवाजी महाराज यांची ‘माफीवीर’ म्हणून टवाळी केली. शिवाजी महाराजांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठविल्याचा भलताच इतिहास उकरून काढला व महाराष्ट्राच्या स्वाभिमानावर हल्ला केला. वीर सावरकरांचा बचाव करताना त्यांनी शिवरायांना ‘माफीवीर’ म्हणून देशातील समस्त शिवराय भक्तांच्या अस्मितेचा पाचोळा करून टाकला. आश्चर्य असे की, वीर सावरकरांच्या निमित्ताने हातात जोडे घेऊन रस्त्यावर उतरणारे भाजपाचे शूरवीर व मिंधे गटाचे नरवीर आता कोणत्या बिळात लपून बसले आहेत? ‘‘शिवरायांनी औरंगजेबास पाच माफीची पत्रे पाठवली’’ या विधानाबद्दल भाजपच्या राष्ट्रीय अध्यक्षांनी, महाराष्ट्रातील भाजपा पुढार्‍यांनी शिवतीर्थावर येऊन महाराष्ट्राची माफी मागावी व अशी मागणी राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी करावी, तरच त्यांचा स्वाभिमान की काय तो महाराष्ट्राला दिसेल,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

“महाराष्ट्राचे राज्यपाल कोश्यारी यांनी एक घटनाबाह्य, बेकायदेशीर सरकार महाराष्ट्राच्या माथी मारले. त्यांनी राजभवनात पाय ठेवल्यापासून भारतीय घटना व शिवरायांचे विचार अरबी समुद्रात बुडवले. त्यांच्याकडून शिवरायांच्या गौरवाची अपेक्षा काय करणार! शिवाजी महाराजांविषयी चुकीची विधाने करण्याचा सपाटाच त्यांनी लावला आहे. ‘‘समर्थ रामदासांशिवाय शिवाजीला विचारतोय कोण?’’ असे एक विधान अलीकडे करून याच राज्यपाल महोदयांनी शिवाजी महाराजांना कमी लेखण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हाही महाराष्ट्रात संतापाचा स्फोट झाला. ‘‘मुंबईतून गुजराती-राजस्थानी निघून गेले तर मुंबई आर्थिक राजधानी राहणार नाही’’ असे आणखी एक विधान करून मुंबईतील कष्टकरी, स्वाभिमानी मराठी माणसांचा अपमान त्यांनी केला. क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीतही राज्यपालांनी असेच घाणेरडे विधान करून गोंधळ घातला तेव्हा त्यांना माफी मागावी लागली. आता तर त्यांनी थेट शिवाजी महाराजांची चेष्टा आणि टवाळी करण्याचे धारिष्ट्य दाखवले. हे बळ त्यांच्यात आले ते महाराष्ट्रात एक मिंधे आणि बेकायदेशीर सरकारला याच राज्यपालांनी सत्तेवर बसवल्यामुळेच,” असा आरोप शिवसेनेनं केला आहे.

“छत्रपती शिवाजी महाराजांचा अपमान होऊनही राज्याचे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री तोंडातून निषेधाचा साधा ‘ब्र’ काढायला तयार नाहीत. शिवरायांचे विचार व मार्गदर्शन कालबाह्य झाले आहे, असे भाजपाचे लोक उघडपणे बोलतात व असे बोलणारे राज्यपाल महाराष्ट्राला लाभतात हे कोणत्या जन्माचे पाप महाराष्ट्राच्या बोकांडी बसवले आहे? शिवरायांनी औरंगजेबाची माफी मागितली, असे भाजपाचे राष्ट्रीय प्रवक्ते म्हणतात. शिवरायांचा विचार जुना झाला, असे आपले राज्यपाल बरळतात. मग पंतप्रधान मोदी यांनी नौदलाचा नवा ध्वज छत्रपती शिवरायांना समर्पित करण्याचे कारण काय? शिवाजी महाराजांनी गुलामगिरीविरुद्ध तलवार उपसली, पहिले स्वतंत्र हिंदवी स्वराज्य स्थापन केले, अफझलखानापासून औरंगजेबापर्यंत आक्रमकांची थडगी महाराष्ट्रात बांधली. त्याच शिवाजी महाराजांच्या नावाने मते मागता आणि गरज संपताच त्याच शिवरायांचा अपमान करता?” असा सवाल शिवसेनेनं सत्ताधाऱ्यांना विचारला आहे.

“भाजपाचे एक आमदार संजय कुटे यांनी आता जाहीर केले, ‘‘राज्यपालांनी शिवरायांबाबत जे घाणेरडे विधान केले ते त्यांचे वैयक्तिक मत आहे.’’ घटनात्मक पदावर बसलेली व्यक्ती व्यक्तिगत मते व्यक्त करू शकत नाही. ती मते राज्याची व राष्ट्राची असतात हे त्या कुटे यांना कोणीतरी सांगायला हवे. स्वत:च्या अंगलट आले की, वैयक्तिक मते. मग राहुल गांधींची मतेही वैयक्तिक ठरवा! अशा शिवरायद्वेषी राज्यपालांकडून ‘मिंधे-फडणवीस’ मंडळाने शपथ घेतली आहे म्हणून अशा राज्यपालांना लगेच हटवा असे सांगण्याचे धाडस तुमच्यात नाही,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

“अशा प्रकारे शिवरायांचा अपमान करण्याच्या पटकथेत महाराष्ट्र भाजपा सहभागी आहे. वीर सावरकरांचा अपमान झाला म्हणून संपूर्ण काँग्रेसला व गांधी परिवारास गुन्हेगार ठरवणारे शिवरायांचा अपमान हा एखाद्याचे वैयक्तिक मत आहे, असे सांगतात. हा पळपुटेपणा आहे. अशा पळपुट्यांना राज्यपालांच्या धोतरात बांधून अरबी समुद्रात बुडवायला हवे असे महाराष्ट्राच्या ११ कोटी जनतेचे वैयक्तिक मत आहे. शिवरायांचा अपमान करणार्‍यांना महाराष्ट्रासमोर नाक घासून माफी मागावीच लागेल,” असा इशारा शिवसेनेनं दिला आहे.