विधान परिषदेच्या आमदारकीसाठी इच्छुक असलेल्या भाजपा नेत्या पंकजा मुंडे यांना पक्षाने उमेदवारी नाकारल्यावर शिवसेनेनं पहिली प्रतिक्रिया दिली आहे. पंकजा यांना डावलत भाजपाने महिला मोर्चाच्या अध्यक्षा उमा खापरे यांना उमेदवारी दिलीय. याचसंदर्भात सामनाच्या अग्रलेखातून भाष्य करताना शिवसेनेनं राजकीय ईर्षेने मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झाले आहे, असं म्हटलंय. तसेच राज्यसभा आणि विधान परिषद निवडणुकीनंतर राज्यातील महाविकास आघाडी सरकारमधील एकजूट अधिक घट्ट होईल याकडे शिवसेनेनं लक्ष वेधलं आहे.
नक्की वाचा >> Vidhan Parishad: “दोन, तीन दिवस मी जेवणार नाही…”; NCP चे अमोल मिटकरी ‘या’ दोन नेत्यांना उमेदवारी न मिळाल्याने नाराज
निवडणूक लादल्याचा पश्चात्ताप भाजपाला होईल
“महाराष्ट्रात भाजपाच्या कृपेने राज्यसभेच्या सहा जागांसाठी शुक्रवारी मतदान होत आहे. १० तारखेस राज्यसभेसाठी मतदान व लगेच विधान परिषदेच्या १० जागांसाठी २० जूनला मतदान होईल. राज्यसभेच्या निवडणुका बिनविरोध करता आल्या असत्या. कारण राजकीय पक्षांच्या आमदारांचे मतदान गुप्त पद्धतीचे नसते. आपण कोणाला मतदान केले हे पक्षाच्या प्रतोदांना दाखवून मतपत्रिका पेटीत टाकायची असते. त्यामुळे राजकीय पक्षांची मते फुटण्याची शक्यता अजिबात नाही. खुल्या मतदानाचे नियम लागू झाल्यापासून निदान महाराष्ट्रात तरी गेल्या २४ वर्षांत राज्यसभेसाठी निवडणूक झालेली नाही. त्याआधी जेव्हा जेव्हा गुप्त मतदान झाले, तेव्हा ‘क्रॉस व्होटिंग’ झाल्याचे प्रकार घडले. एकदा शरद पवार यांच्या पक्षाकडे फक्त सहा मते असताना त्यांच्या पक्षाचे सुरेश कलमाडी हे राज्यसभा निवडणुकीत सहज विजयी झाले होते. अशा गमती जमती आता होणार नाहीत. कारण राज्यसभा निवडणुकीतला घोडेबाजार रोखण्यासाठीच खुली मतदान पद्धती आणली. हे खरे असले तरी हा नियम अपक्षांना लागू होत नाही. त्यामुळे महाराष्ट्रातील अपक्ष आमदारांना प्रलोभने दाखवून, दाबदबाव टाकून राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी भाजपाने उमेदवार उभा केला. भाजपाकडे मतांचे गणित नसतानाही राज्यसभेची निवडणूक त्यांनी लादली. राज्यसभेच्या जागा सहा व उमेदवार सात. त्यामुळे निवडणूक तर होणारच. अर्थात निवडणूक लादल्याचा पश्चात्ताप भाजपाला होईल, असेच एकंदरीत वातावरण आहे,” असं शिवसेनेनं म्हटलंय.
मतदानाची गुप्त पद्धती संकट समजायचे?
“महाविकास आघाडीत एकजूट आहे व त्या एकजुटीचे दर्शन मंगळवारी संध्याकाळी झाले. अपक्ष व लहान पक्षांची साथसोबत आहेच. त्यामुळे महाविकास आघाडीचे चारही उमेदवार विजयी होतील. भाजपाची मदार ही अपक्षांच्या फोडाफोडीवर आहे. बोक्याचा डोळा लोण्यावर असतो तसाच हा प्रकार आहे, पण बोक्याच्या मिश्यांना लोणी लागणार नाही. महाराष्ट्रात ठाकरे सरकार आहे व ते या निवडणुकीनंतरही कायम राहणार असल्याने अपक्ष व इतर लहान पक्षांना ‘ठाकरे सरकार’चे सहकार्य विकासकामांसाठी लागणार आहे. भाजपाच्या प्रलोभनांना व ‘ईडी’ वगैरेच्या धमक्यांना यापुढे कोणीच बळी पडणार नाही. राज्यसभेचा तिढा सुटला तरी २० जूनला विधान परिषदेच्या निवडणुका गुप्त मतदान पद्धतीने होणार व दोन्ही बाजूंसाठी ही कठोर परीक्षा असल्याचे बोलले जाते. संसदीय लोकशाहीत गुप्त मतदान पद्धतीचे कौतुक करायचे की ही गुप्त पद्धती संकट समजायचे? असा पेच अनेकदा निर्माण होतो,” असंही लेखात म्हटलंय.
भविष्यात काय घडेल याचा भरवसा नाही
“जनता जनार्दन गुप्त मतदानावर आपला हक्क चोख बजावीत असते, पण जनतेने निवडून दिलेल्या लोकप्रतिनिधींवर जेव्हा गुप्त मतदानाची वेळ येते, तेव्हा त्यांच्यावर जागता पहारा ठेवावा लागतो हे अलीकडे एक संकटच होऊन बसले आहे. त्यामुळे विधान परिषदेच्या निवडणुकादेखील राज्यसभेप्रमाणे खुल्या मतदान पद्धतीनेच व्हाव्यात अशी मागणी जोर धरत आहे. शिवसेनेने विधान परिषदेसाठी सचिन अहिर आणि आमशा पाडवी हे दोन नवे चेहरे दिले आहेत. भाजपाने पुन्हा तेच नर्मदेचे गोटे समोर आणले. दरेकर, लाड, उमा खापरे, श्रीकांत भारतीय, राम शिंदे वगैरे लोक त्यात आहेत. पंकजा मुंडे यांना पुन्हा एकदा डावलण्यात आले. पंकजा मुंडे यांच्यासाठी देवेंद्र फडणवीस यांनी खूप प्रयत्न केले, पण यश आले नाही, असा खुलासा चंद्रकांत पाटील यांना करावा लागला. मुंडे भगिनींवर नक्की कोणाचा राग आहे? हा राग मुंडे भगिनींवर आहे की गोपीनाथ मुंडेंवर? याचा शोध घेणे गरजेचे आहे. महाराष्ट्राच्या भाजपामधून मुंडे-महाजनांचे नामोनिशाण मिटवायचेच या ईर्षेनेच मुंडे भगिनींचे राजकीय पतन सुरू झाले आहे. त्यामुळे भविष्यात काय घडेल याचा भरवसा नाही,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.
नक्की वाचा >> विधान परिषद निवडणूक : “पंकजा मुडेंचा पत्ता कट करणं हे फडणवीसांचं षड्यंत्र”
सोपी निवडणूक कठीण करण्याचा प्रयत्न
“विधान परिषदेच्या दहा जागांसाठीही निवडणूक होईल असे दिसते. २७ मते एका उमेदवारास विजयी होण्यासाठी लागतील. राष्ट्रवादी व शिवसेना त्यानुसार स्वतःचे दोन-दोन उमेदवार सहज जिंकून आणतील. काँग्रेसचा एक उमेदवार जिंकेल व त्यांची साधारण १९ मते शिल्लक राहतात. मात्र काँग्रेसनेही आता चंद्रकांत हंडोरे आणि भाई जगताप या दोघांची उमेदवारी जाहीर केली आहे. त्यामुळे त्यांना आणखी आठ मतांची बेगमी करावी लागेल. पुन्हा त्याच जादा मतांवर डोळा ठेवून भाजपाने त्यांचा पाचवा उमेदवार विधान परिषदेच्या रिंगणात उतरवला आहे व राज्यसभेप्रमाणेच विधान परिषदेची सोपी निवडणूक कठीण करण्याचा प्रयत्न चालविला आहे,” असा टोला लगावण्यात आलाय.
बगलबच्च्यांना धोबीपछाड दिल्याशिवाय
“अहंकार व पैशांच्या अतिरेकी बुस्टर डोसचे हे अजीर्ण आहे. महाराष्ट्रात काहीच सुरळीत घडू द्यायचे नाही असेच त्यांचे प्रयत्न आहेत. सुरळीत चाललेले त्यांना पाहवत नाही. अर्थात महाविकास आघाडीचे नेतृत्वही काही लेचेपेचे नाही व भाजपाचे पेच, डावपेच त्यांच्यावरच उलटविल्याशिवाय ते राहणार नाहीत. राज्यसभा व नंतरच्या विधान परिषद निवडणुकीत भाजपा व त्यांच्या बगलबच्च्यांना धोबीपछाड दिल्याशिवाय ‘ठाकरे सरकार’ स्वस्थ बसणार नाही. घोडा मैदान लांब नाही,” असं लेखाच्या शेवटी म्हटलं आहे.