एकीकडे शिवसेना आणि सत्ताधाऱ्यांमध्ये शिवाजी पार्कवरील दसरा मेळाव्यावरून वाद सुरू असताना आता एका फोटोमुळे दोन्ही बाजूंमध्ये चांगलीच जुंपण्याची शक्यता आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या कार्यालयातला हा फोटो असून या फोटोवरून आता विरोधकांनी सरकारला आणि विशेषत: मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना घेरायला सुरुवात केली आहे. हा फोटो राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते रविकांत वरपे यांनी त्यांच्या ट्विटरवरून शेअर केला होता. त्यानंतर आता हा फोटो व्हायरल होत आहे.
काय आहे या फोटोमध्ये?
हा फोटो मुख्यमंत्र्यांच्या शासकीय निवासस्थानातील कार्यालयातला असल्याचा दावा रविकांत वरपे यांनी केला आहे. या फोटोमध्ये कार्यालयात काही लोक मुख्यमंत्र्यांच्या टेबलासमोर उभे असल्याचं दिसत आहे. हे प्रशासकीय अधिकारी असावेत, असा अंदाज बांधला जात आहे. मात्र, मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर एकनाथ शिंदे यांच्याऐवजी त्यांचे पुत्र श्रीकांत शिंदे बसून काही कागदपत्र तपासत असल्याचं दिसत आहे. त्यामुळे मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर बसून त्यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे राज्याचा कारभार सांभाळत आहेत का? असा सवाल विरोधकांकडून केला जात आहे.
“ती खुर्ची १३ कोटी जनतेचा स्वाभिमान आहे”
“मुख्यमंत्र्यांचं हे शासकीय निवासस्थान आहे. त्याच्या मागे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री असं लिहिलं आहे. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीचा सन्मान त्यांच्या कुटुंबीयांनी आणि सगळ्यांनीच ठेवायचा असतो.तुम्हाला इतर शासकीय भेटीगाठी किंवा अनौपचारिक भेटी घ्यायच्या असतील, तर मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीच्या बाजूला बसून तुम्ही त्या घ्या. ती महाराष्ट्रातील १३ कोटी जनतेच्या स्वाभिमानाची खुर्ची आहे”, अशा शब्दांत रविकांत वरपे यांनी आपला आक्षेप नोंदवला आहे.
“खुर्चीवर बेकायदा माणूस बसला आहे”
दरम्यान, हा फोटो व्हायरल झाल्यानंतर शिवसेनेच्या प्रवक्त्या डॉ. मनीषा कायंदे यांनी त्यावरून एकनाथ शिंदेंना लक्ष्य केलं आहे. “हा फोटो सकाळपासून व्हायरल होतोय. कशा पद्धतीने हे सगळं सुरू आहे ते दिसतंय. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर त्यांचे चिरंजीव बसल्याचं दिसत आहे. उद्धव ठाकरे सरकारमध्ये मंत्री असताना आदित्य ठाकरे किती अदबीनं वागलेत हे आपण पाहिलंय. मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर त्यांच्या मुलाने बसणं हे चुकीचं आहे. एक तर हे सरकारच बेकायदा असून गैरमार्गाने आलं आहे. त्या खुर्चीवर अजून एक बेकायदा माणूस बसला आहे”, असं मनीषा कायंदे म्हणाल्या आहेत.
मुख्यमंत्र्यांच्या खुर्चीवर श्रीकांत शिंदे बसतात? ‘तो’ फोटो ट्वीट करत राष्ट्रवादीचा गंभीर आरोप!
रिपाइंच्या खरात गटाकडूनही सचिन खरात यांनी या फोटोवरून टीका केली आहे. “मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा मुलगा खासदार श्रीकांत शिंदे मुख्यमंत्री पदाच्या खुर्चीवर बसून त्या पदाचा कार्यभार सांभाळत असल्याचं व्हायरल फोटोवरून दिसत आहे. हे चुकीचं आहे. हा भारतीय संविधानाचा अपमान आहे. या कृत्याबद्दल आपण महाराष्ट्राच्या जनतेच दिलगिरी व्यक्त करावी”, अशी मागणी सचिन खरात यांनी केली आहे.
भाजपाचं स्पष्टीकरण; म्हणे, “यात काय चुकलं?”
“अडीच वर्षांत काँग्रेस-राष्ट्रवादीच्या नेत्यांना जनहिताचे काय निर्णय केले, हे सांगण्यासारखं काही राहिलंच नाही. शिवसेनेचा एक नेता राष्ट्रवादीच्या नेत्यासाठी कशा पद्धतीने खुर्ची घेऊन धावत गेला, हेही महाराष्ट्राने पाहिलं आहे. शिवसेनेचे पक्षप्रमुख आणि त्यांचे सुपुत्र सोनिया गांधींच्या समोर किती वाकून अभिवादन करत होते, हेही महाराष्ट्रानं पाहिलं आहे. आता अडीच वर्षांत काय केलं, हे सांगण्यासारखं नसल्यामुळे कोण कुणाच्या खुर्चीवर बसलंय यावर बोलत आहेत. त्या खुर्चीवर कुणी एखादी व्यक्ती बसली, तर त्यात आक्षेपार्ह काहीच नाही. स्टेट वाईल्डलाईफ बोर्डाच्या बैठकीत मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की तुम्ही उपाध्यक्ष म्हणून ही बैठक चालवायची आहे. त्यामुळे त्या खुर्चीवर मी बसलो, तर काहीतरी चुकलंय, असा त्याचा अर्थ होत नाही”, अशी प्रतिक्रिया भाजपा नेते सुधीर मुनगंटीवार यांनी दिली आहे.