राज्याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, भाजपाचे माजी खासदार किरीट सोमय्या, भाजपाचे नेते नितेश राणे, भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांच्यासहीत भाजपाची सत्ता असणाऱ्या राज्यांमधील गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या मंत्र्यांचा उल्लेख करत शिवसेनेनं भाजपावर हल्लाबोल केलाय. गुड गव्हर्नसन्सच्या मुद्द्यावरुन फडणवीस यांनी शिर्डीमध्ये केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेनं फडणवीस यांना काही प्रश्न विचारले असून सोमय्यांनी कोकणात जाऊन केलेल्या ‘नौटंकीला’ तुमचा पाठिंबा आहे?, असा प्रश्न शिवसेनेनं विचारलाय. फडणवीस यांनी शिर्डीत केलेल्या वक्तव्यावरुन शिवसेनेनं, “देवाच्या चरणी तरी खरे बोला” असा खोचक टोला फडणवीसांना लगावलाय.
राज्याच्या बदनामीचा आनंदोत्सव चांगला नाही…
“भारतीय जनता पक्षाने काय करावे किंवा करू नये हा सर्वस्वी त्यांचा प्रश्न, पण त्या मंडळींनी निदान महाराष्ट्राच्या प्रतिष्ठेशी तरी खेळू नये. विरोधकांकडून रोजच नवनवीन पद्धतीने आरोप करून सरकारची प्रतिमा मलिन करण्याचे काम सुरू असल्याची खंत गृहमंत्री दिलीप वळसे-पाटील यांनी व्यक्त केली आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक मराठी माणसाची तीच खंत आहे. विरोधी पक्षाच्या बेबंद वृत्तीमुळे राज्य बदनाम व्हावे व त्या बदनामीचा आनंदोत्सव साजरा करावा हे चांगले नाही,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.
युगपुरुष सोमय्या…
“वळसे-पाटलांचे म्हणणे असे की, ‘पेन ड्राईव्ह’ ही आता नवीन पद्धत निघाली आहे. खोटे आरोप करायचे, केंद्रीय यंत्रणेची भीती दाखवायची, भ्रष्टाचाराचे आरोप करीत संबंध नाही त्यांच्याशी संबंध जोडायचे, एकीकडे कायदा-सुव्यवस्था अडचणीत आहे असे म्हणायचे आणि दुसरीकडे छोट्या छोट्या गोष्टीवरून ‘मोर्चे’ काढून कायदा-सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण करायचा असे उपद्व्याप राज्यातील विरोधी पक्ष करीत असल्याचे वळसे-पाटलांचे म्हणणे आहे. ज्यांच्या स्वतःवरच भ्रष्टाचाराचे, जमीन घोटाळ्यांचे आरोप आहेत असे भाजपाचे युगपुरुष किरीट सोमय्या हे हाती कागदी हातोडा घेऊन, मुंबईतून भाडोत्री लोक घेऊन कोकणातील शांतता भंग करायला पोहोचले. काय तर म्हणे, दापोलीतील अनधिकृत रिसॉर्ट तोडणार आहोत,” असा टोला शिवसेनेनं सोमय्या यांनाही लागवला आहे.
राणेंसोबत भ्रष्टाचार संपवायला निघालेत…
“बरं, भ्रष्टाचाराविरुद्ध लढायला हे महाशय निघाले तर त्यांच्यासोबत आणि स्वागताला कोण? तर ‘ईडी’कडे ज्यांच्या ‘मनी लॉण्डरिंग’चे, १०० बोगस कंपन्यांच्या आर्थिक गैरव्यवहाराचे पुरावे दिले व ज्यांना तुरुंगात टाका अशी मागणी केली त्याच नारायण राणे यांच्या मुलास बाजूला बसवून हे महाशय कोकणातील भ्रष्टाचार संपवायला निघाले. हा एक मानसिक घोटाळाच आहे व अशा मनोविकृतांच्या डोक्यावर कितीही हातोडे मारले तरी त्यांचा मेंदू ठिकाणावर येणार नाही. भ्रष्टाचाऱ्यांच्या तसेच घोटाळेबाजांच्या हातात हात घालून ‘युगपुरुष’ सोमय्या अनधिकृत की काय ते रिसॉर्ट तोडायला निघाले यावर देवेंद्र फडणवीस काय बोलणार आहेत?,” असा प्रश्न शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखामधून विचारलाय.
…तेव्हा महाराष्ट्र चुलीत गेलेला चालतो काय?
“काहीही बोला, पण खरे बोला. देवेंद्र फडणवीस हे काल शिर्डीत साईचरणी गेले व म्हणाले, ‘‘राजकारण गेले चुलीत, मात्र इथले गव्हर्नन्स ठीक राहिले पाहिजे, पण त्याला बट्टा लागलाय. ही अवस्था महाराष्ट्रात कधीही पाहिली नव्हती.’’ राजकारण जाईल चुलीत, महाराष्ट्र ठीक राहिला पाहिजे असे शहाणपणाचे उद्गार फडणवीस यांनी साईचरणी काढले, पण महाराष्ट्राची इज्जत व गव्हर्नन्स चुलीत घालण्याचे काम ते स्वतःच करीत आहेत व चुलीची शेकोटी घेत बसले आहेत. विरोधी पक्षनेत्यांचे हे गुड गव्हर्नन्स नक्कीच नाही. विरोधी पक्षातले फुटकळ लोक प्रशासनातील अधिकाऱ्यांवर भ्रष्टाचाराचे खोटे आरोप करून गव्हर्नन्सची प्रतिमा मलिन करतात तेव्हा महाराष्ट्र चुलीत गेलेला चालतो काय?,” असा प्रश्न शिवसेनेनं फडणवीस यांना विचारलाय.
पडळकरांवरही साधला निशाणा…
“शरद पवारांसारखा नेता पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकरांच्या सांगलीतील स्मारकाच्या उद्घाटन सोहळ्यास जाण्याआधी विरोधी पक्षनेत्यांचे ‘पंटर्स’ या कार्यक्रमात गोंधळ घालण्याचा प्रयत्न करतात. हे कसले आले गुड गव्हर्नन्स? महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही, असे देवाच्या चरणी जाऊन बोलता हा महाराष्ट्रद्वेष म्हणजेच तुमचा गुड गव्हर्नन्स मानायचा काय? देवाच्या चरणी तरी खरे बोला!,” असा खोचक सल्ला शिवसेनेनं फडणवीस यांना दिलाय.
२२ मंत्र्यांवर गुन्हेगारी प्रकरणे…
“मुळात देशातील भाजपाशासित राज्यांत गुड गव्हर्नन्सचा जो खेळखंडोबा चालला आहे त्याकडे एकदा डोळे उघडून पहा, म्हणजे महाराष्ट्रातील स्थितीविषयी सत्य समजायला मदत होईल. उत्तर प्रदेशात नवनिर्वाचित मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी काल पन्नासेक मंत्र्यांचा शपथविधी करून घेतला. त्यातील २२ मंत्र्यांवर भयंकर गुन्हेगारी स्वरूपाची प्रकरणे नोंदवली आहेत व त्या मंत्र्यांना किमान पाच ते सात वर्षांची शिक्षा होऊ शकते. गोव्यातही वेगळी स्थिती नाहीच. हे असले गुड गव्हर्नन्स तुम्हाला चालत असेल तर तो तुमचा प्रश्न,” असंही शिवसेनेनं म्हटलंय.
सोमय्यांचा मराठी सक्तीला विरोध…
“फडणवीस यांनी २०२४ ची तयारी चालवली आहे. त्यासाठी त्यांना शुभेच्छा, पण तोपर्यंत महाराष्ट्राची प्रतिमा देशात पुरती मलिन करायची, महाराष्ट्राच्या प्रशासनाचा पायाच पोखरून टाकायचा. प्रशासनावर चिखलफेक करून, खोटे आरोप करून प्रशासनाचे मनोधैर्य खच्ची करायचे, हे कसले धोरण? हे असले राजकारण महाराष्ट्रात कधीच घडले नव्हते. दापोलीत परिवहन मंत्री अनिल परब यांचे रिसॉर्ट आहे की नाही, ते कायदेशीर की बेकायदेशीर ते ठरवायला न्यायालय व शासकीय यंत्रणा आहेत, पण हातात हातोडा व सोबत गावगुंडांची फौज घेऊन कोकणात घुसणाऱ्यांना फडणवीस कसे काय समर्थन देऊ शकतात? हिंमत होती तर धडक जायचे. प्रसिद्धीसाठी इतका गाजावाजा करीत, बोंबा मारत जायची गरज नव्हती. यांना फक्त सरकारची बदनामी करायची आहे व वातावरण खराब करायचे आहे. हेच ते सोमय्या ज्यांनी मुंबईतील शाळांत मराठी भाषा सक्तीची असण्याला विरोध केला होता. त्यांच्या हातातला हातोडा महाराष्ट्राला, मराठी माणसाला विरोध करण्यासाठीच आहे,” अशी टीका शिवसेनेनं केलीय.
२०२४ बरोबर २०२९ चीही तयारी करा…
“भारतीय जनता पक्षाच्या असंख्य भ्रष्टाचारांबाबत हाच हातोडा शांत का? नारायण राण्यांपासून इतर अनेक नेत्यांनी मुंबईसह महाराष्ट्रात अनधिकृत इमले उभारून कायदे धाब्यावर बसवले आहेत. मारताय त्यावर तुमचे नौटंकी छाप हातोडे? त्यामुळे फडणवीसांची वक्तव्ये व अशा हातोडय़ांना गांभीर्याने घेण्याची गरज नाही. २०२४ बरोबरच त्यांना २०२९ चीही तयारी करावी लागेल. समझनेवाले को इशारा काफी है!,” असं शिवसेनेनं म्हटलंय.