पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांवर भ्रष्टाचाराच्या मुद्द्यावरुन केलेल्या टीकेचा शिवसेनेनं सामाचार घेतला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे निरागस आणि निष्पाप आहेत असं म्हणत शिवसेनेनं भाजपाला लक्ष्य केलं आहे. केंद्रीय यंत्रणांचा वापर हा केवळ विरोधी पक्षांविरोधात केला जात असल्याचं अधोरेखित करताना शिवसेनेनं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासहीत त्यांच्यासोबत असणाऱ्या १० बंडखोर आमदारांविरोधात ईडीची कारवाई सुरु होती अशी आठवण विरोधकांवर भ्रष्टाचाराची टीका करणाऱ्या पंतप्रधान मोदींना करुन दिली आहे. भ्रष्टाचारावरुन विरोधकांवर आरोप करणाऱ्या मोदींना लक्ष्य करत भ्रष्टाचाऱ्यांचे गट बनवून भाजपाच सरकारे पाडत असल्याचा आरोप शिवसेनेनं केला आहे.

“आपले प्रिय पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांचे मन एखाद्या अजाण बालकाप्रमाणे निरागस आणि निष्पाप आहे. बालकाच्या हाती एखादे खेळणे वगैरे दिल्यावर ते आपल्याच धुंदीत, मजेत खेळत बसते. आजूबाजूला काय चालले आहे याच्याशी त्या बालकास घेणेदेणे नसते. आपले पंतप्रधान हे तसेच आहेत. नरेंद्र भाईंनी दोन दिवसांपूर्वी एक निरागस व निष्कपट विधान केले. ते म्हणाले, ‘‘देशात भ्रष्टाचाऱ्यांविरोधातील कारवायांमुळे राजकारणात नवे ध्रुवीकरण सुरू झाले आहे. ज्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत त्यांना वाचविण्यासाठी काही राजकीय गट एकत्र येत आहेत.’’ मोदी यांचे विधान गांभीर्याने घ्यावे की एका निरागस बालकाचे बोल म्हणून सोडून द्यावे हा ज्याचा त्याचा प्रश्न; पण एक मात्र नक्की, बिहारमधून नितीश कुमारांनी बंड करून आव्हान देताच मोदी यांच्या मनात खळबळ माजलेली दिसते,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

“नितीश कुमार हे मोदी यांना पर्याय ठरू शकतील की नाही हे अद्याप ठरायचे आहे, पण नितीश यांनी बिहारातून रणशिंग फुंकले आहे, हा संदेश सर्वदूर पोहोचला आहे. मोदी यांनी आता भ्रष्टाचाराचा मुद्दा काढला आहे. ते म्हणतात की, ‘नितीश, शरद पवार, ममता व आम्ही म्हणजे शिवसेना, तेलंगणाचे के. सी. राव वगैरे एकत्र येत आहेत ते भ्रष्टाचाऱ्यांना वाचविण्यासाठी! ही भ्रष्टाचाराच्या समर्थनार्थ राजकीय गटबाजी आहे.’ वास्तविक दुसऱ्याकडे बोट दाखवताना तीन बोटे स्वतःकडेही वळलेली असतात, हे मोदी यांना कोणीतरी सांगायला हवे. सुरुवात त्यांच्या प्रिय प. बंगालपासून करू. ममता बॅनर्जी यांना आव्हान देण्यास भारतीय जनता पक्षाने तृणमूलचेच सुवेंदु अधिकारी यांना भाजपात आणले. आता ते भाजपाकडून विधानसभेतील विरोधी पक्षनेते आहेत. मोदी यांच्या मनात सुवेंदुंना प. बंगालचे मुख्यमंत्रीच करायचे होते. पण लोकांनी ते होऊ दिले नाही. हे सुवेंदु कोण? तर हे सुवेंदु म्हणजे ‘शारदा चीट फंड’ घोटाळय़ातील ‘मास्टर माईंड’ आहेत व त्यांची जागा तुरुंगात आहे. अशा गर्जना कालपर्यंत भाजपा करीत होती. हे निरागस मोदींना कोणी माहीत करून दिले नाही काय? ममता यांचे उजवे हात मुकुल रॉय हेसुद्धा त्याच प्रकरणातले एक आरोपी. नंतर ते थेट मोदी-शहांच्या व्यासपीठावरच बसले. तेव्हा भ्रष्टाचाऱ्यांचा गट कोण बनवीत आहे?” असा प्रश्न शिवसेनेनं ‘सामना’च्या अग्रलेखातून विचारला आहे.

“नितीशकुमार यांनी बिहारमध्ये भाजपाविरोधात बंड केल्याने मणिपूरमध्ये त्यांच्या ‘जदयू’ पक्षाचे सहापैकी पाच आमदार दोन दिवसांपूर्वी भाजपाने फोडले. दिल्लीतही केजरीवाल सरकारच्या मद्य धोरणावरील कारवाईच्या आडून त्यांच्या ‘आप’चे आमदार फोडण्याचा प्रयत्न झालाच होता. मात्र तो फसला,” असा दावा शिवसेनेनं केला आहे.

“केजरीवाल सरकारच्या मद्य धोरणावर जर टीका किंवा चर्चा होऊ शकते, तर मग गुजरातमधील अवैध दारू कारभाराचे काय? किमान १० हजार कोटींचा हा घोटाळा आहे. महाराष्ट्रात चंद्रकांत बावनकुळे यांना नेमक्या कोणत्या कारणांमुळे विधानसभेची उमेदवारी नाकारली होती? त्यामागची निरागस भावना लोकांसमोर आली पाहिजे. केंद्रीय तपास यंत्रणांचा वापर भाजपाच्या पक्षनिधीत भर टाकण्यासाठी होत आहे व राजकीय विरोधकांची मुस्कटदाबी करण्यासाठी सुरू आहे. त्याविरुद्ध आवाज उठवणे म्हणजे भ्रष्टाचाराचे समर्थन असे आता पंतप्रधान मोदी बोलू लागले आहेत. म्हणजे नितीश कुमार, शरद पवार, ममतांचे बाण योग्य ठिकाणी बसत आहेत. नितीश कुमारांबरोबर आज तेजस्वी यादव आहेत. तेजस्वी यांच्या पक्षाने बिहारात भाजपापेक्षा जास्त आमदार निवडून आणले. हा मोदी-शहांच्या महाशक्तीचा पराभव आहे. हेच तेजस्वी भाजपासोबत गेले असते तर त्यांचे सर्व गुन्हे माफ व लालू यादवही भाजपाचे महात्मा ठरले असते. पण तेजस्वी शिंदे गटाप्रमाणे झुकले नाहीत. त्यामुळे आता त्यांच्या आमदारांविरोधात कारवायांचे सत्र सुरू झाले. नितीश कुमार हे २०२४ ला आव्हान ठरू शकतील असे भय मोदी यांना आतापासून का वाटावे?” असा प्रश्न शिवसेनेनं उपस्थित केला आहे.

“नितीश कुमारांचे नेतृत्व उत्तरेत वरचढ ठरू शकेल व त्याचा फटका भाजपाला बसेल असा लोकांचा अंदाज आहे. मोदी यांनी एक वार केला की नितीश लगेच पलटवार करून उत्तर देतात. त्यावर भक्तांची तोंडे बंद होतात. पंतप्रधान मोदी यांनी आता जे राजकीय गटाचे टुमणे सुरू केले, पण तो वार त्यांच्यावरच उलटला आहे. भ्रष्टाचाऱ्यांवरील कारवाईतून नवा राजकीय गट उदयास येत आहे, हे त्यांचे म्हणणे जर खरे मानले तर महाराष्ट्रातील भाजपाच्या मांडीवर बसलेला ‘शिंदे गट’ हेच त्याचे उत्तर आहे. मोदी भाबडे आहेत. निरागस आहेत. निष्पाप आहेत. त्यांना कोणी तरी सत्य माहिती द्यायला हवी,” असा खोचक चिमटा शिवसेनेनं काढला आहे.

“महाराष्ट्रात तर भ्रष्ट मंडळींना बाजूला घेऊन त्यांनी एक गट केला. (ज्यास आता शिंदे गट किंवा ओरिजनल शिवसेना वगैरे सांगून ढोल बडवले जात आहेत!) स्वतः शिंदे व त्यांच्या लोकांवर ईडी चौकशीचे जोखड होतेच. त्यांच्या बरोबरच्या किमान दहा आमदारांची ईडी चौकशी सुरू होती. म्हणजे भ्रष्टाचार होताच. काहींनी अटकपूर्व जामीन घेतले. या सगळ्यांचा एक राजकीय गट करून त्यांच्या बरोबर भाजपाने महाराष्ट्रात सरकार स्थापन केले. पुन्हा आश्चर्य असे की, या गटाचे आमदार सांगतात, आम्ही भ्रष्ट असलो तरी न्यायालयाचा निकाल आमच्या बाजूने लागेल! निरागस मोदी यांनी या सर्व प्रकरणाचा नीट अभ्यास केला पाहिजे. महाराष्ट्रातील भ्रष्टाचारी गटास ‘शिवसेना’ असे वारंवार संबोधणे हासुद्धा भ्रष्टाचार आहे,” असा टोला शिवसेनेनं लगावला आहे.

“खासदार भावना गवळी यांना तुरुंगात टाकण्याची भाषा भाजपाचे लोक करीत होते, पण भावनाताईंकडून मोदी यांनी प्रेमाने राखी बांधून घेतल्याने ताईंवरचे सगळे आरोप ‘स्वच्छ’ झाले. संजय राठोड या मंत्र्याची एक ‘क्लिप’ आजही पुण्याच्या फॉरेन्सिक लॅबमध्ये आहे. भाजपाच्या रणवाघिणीने ती क्लिप दिल्लीत जाऊन पंतप्रधान मोदी यांना दाखवायला हवी. म्हणजे आपण किती अंधारात आहोत व आजूबाजूचे सत्य आपल्यापर्यंत कसे पोहोचू दिले जात नाही हे त्यांना समजेल. महाराष्ट्र सरकार बेकायदेशीर व भ्रष्ट आहे, पण मोदी विरोधकांवर बाण सोडीत आहेत. ईडी आणि सीबीआयचा वापर विरोधकांची सरकारे पाडण्यासाठी सुरू आहे,” असं शिवसेनेनं म्हटलं आहे.

Story img Loader