जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचार प्रमुख असलेले शिवसैनिक संतोष परब यांच्यावर १८ डिसेंबर रोजी झालेल्या हल्ला प्रकरणावरुन राज्यातील राजकारण चांगलच तापलं आहे. या हल्ल्यामागे भाजपाचे आमदार नितेश राणे असल्याचा आरोप शिवसेनेकडून केला जातोय. या प्रकरणामधील प्रमुख आरोपी असणाऱ्या सचिन सातपुतेला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीमधून ताब्यात घेतलं असून सातपुते हा स्वत: नितेश राणे समर्थक असल्याचं सांगितलं जातं. या प्रकरणामध्ये राज्याच्या विधानसभेपासून अगदी कणकवलीपर्यंत सत्ताधारी आणि विरोधक भाजपा आमने-सामने आल्याचं चित्र पहायला मिळतंय. शिवसेनेनं या प्रकरणाच्या पार्श्वभूमीवर कणकवली पोलीस स्थानकावर सोमवारी मोर्चा काढला.
या आंदोलनाच्या वेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी नितेश राणेंना संतोष परब यांच्या मारहाण प्रकरणामध्ये अटक करण्यात यावी अशी मागणी केली. यावेळी शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी, ‘कॉक कॉक कॉक कॉक…, बाबा मला वाचव’ यासारख्या घोषणाही दिल्या. शिवसैनिकांच्या या आंदोलनामुळे कणकवलीमधील राजकीय वातावरण तापलंय.
नक्की वाचा >> नारायण राणे मुलासंदर्भातील ‘तो’ प्रश्न ऐकून संतापले अन् म्हणाले, “मुर्ख माणूस समजलात का तुम्ही मला?”
हा मोर्चा आणि एकंदरितच या विषयावरुन कणकवलीमध्ये सत्ताधारी आणि विरोधक पक्षांमध्ये सुरु असणारी धुसपूस या पार्श्वभूमीवर कायदा सुव्यवस्थेचा आढावा घेण्यासाठी बैठक पार पडली. ही बैठक वरिष्ठ पोलीस उपअधीक्षक कार्यालयामध्ये पार पडली. या बैठकीला वरिष्ठ पोलीस अधिकारी उपस्थित होते. या बैठकीला राज्याचे अपर पोलीस महासंचालक संजीवकुमार सिंघल, कोकण परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक संजय मोहिते, पोलीस अधीक्षक राजेंद्र दाभाडे यासारखे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये नक्की काय निर्णय झाला याची माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
जिल्हा बँक अध्यक्ष सतीश सावंत यांचे प्रचारप्रमुख संतोष परब यांना १८ डिसेंबरला कणकवलीत मारहाण झाली. संतोष परब यांच्यावर जीवघेणा हल्ला करणारा मुख्य आरोपी सचिन सातपुते याला सिंधुदुर्ग पोलिसांनी दिल्लीहून अटक केली आहे. त्याने चौकशीदरम्यान नितेश राणे यांचं नाव घेण्यात आलं असल्याची माहिती आहे. नितेश राणे यांची याप्रकरणी कणकवली पोलिसांकडून चौकशीदेखील करण्यात आली. दरम्यान संतोष परब शिवसैनिक असल्याने शिवसेना आक्रमक झाली आहे. “मतदारांवर दबाव आणण्यासाठी १८ तारखेला महाविकास आघाडीच्या प्रचारप्रमुखावर हल्ला झाला. त्या हल्ल्यात फिर्यादीने नितेश राणेंचं नाव घेतलं होतं. पोलीस तपासात नितेश राणे दोषी आढळल्याचं प्राथमिकदृष्ट्या स्पष्ट झालं आहे. त्यामुळे त्यांना अटक झाली पाहिजे. दोषी असतील तर त्यांना अटक होईल. पण केंद्रीय मंत्री नारायण राणे आपल्या मंत्रीपदाचा फायदा घेत दबाव आणण्याचा प्रयत्न करत आहेत,” असा आरोप शिवसेना आमदार वैभव नाईक यांनी केला आहे.