खासदार संजय राऊत यांनी मोदी आणि शाह यांच्यावर पुन्हा एकदा टीका केली आहे. तसंच जिथे ठाकरे तिथेच शिवसेना या वाक्याचा पुनरुच्चारही केला आहे. तसंच शिवसेनेचा वर्धापन दिन हा चांगल्या प्रकारे साजरा होईल असंही त्यांनी म्हटलं आहे.

काय म्हणाले संजय राऊत?

“शिवसेनेचा ५८ वा वर्धापन दिन आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी ५८ वर्षांपूर्वी शिवसेनेची स्थापना केली आहे. मराठी माणूस, भूमिपुत्रांचा लढा त्यांनी उभा केला. उद्धव ठाकरे या सेनेचे नेतृत्व करत आहेत. शिंदे गटाकडे पैसा आहे त्यामुळे पैसा फेक तमाशा देख हे चाललं आहे. त्यांचा पक्षाशी, बाळासाहेबांच्या विचारांशी काय संबंध? महाराष्ट्राचे शत्रू आहेत त्या भाजपाशी शिंदेंनी हातमिळवणी केली आहे. पण जिथे ठाकरे तिथे शिवसेना. लोकसभेतल्या विजयानंतर आम्ही मोठा कार्यक्रम करतो आहोत. विधानसभेची रणनीतीही आम्ही ठरवणार आहोत. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करतील.” असं संजय राऊत म्हणाले.

हे पण वाचा- “शिंदे एलॉन मस्कचा बाप आहे का?” राऊतांचा ‘त्या’ वक्तव्यावर संताप; म्हणाले, “वायकरांना खासदारकीची शपथ देऊ नये”

रवींद्र वायकरांनी आम्हाला शिकवू नये

रवींद्र वायकर शिवसेनेत होते, शिवसेनेत त्यांना विविध पदं मिळाली. आमदारकी मिळाली. उद्धव ठाकरेंचे निकटवर्तीय होते. पण ईडी आणि सीबीआयच्या भीतीने ते पळाले. रवींद्र वायकर डरपोक आहेत म्हणून पळाले. त्यांनी आम्हाला ज्ञान शिकवू नये. आम्ही ईव्हीएमवर आरोप केलेला नाही. आम्ही यंत्रणेवर आरोप केलाय आणि त्याचे पुरावेही दिलेत. रवींद्र वायकर हरले तरीही त्यांना जिंकवण्यात आलं. यात फसवेगिरी झाली आहे. असंही संजय राऊत म्हणाले.

एकनाथ शिंदे वर्धापन दिन साजरा करत असतील तर तो हास्यास्पद प्रकार

एकनाथ शिंदे वर्धापन दिन साजरा करत असतील तर तो हास्यास्पद प्रकार आहे. बाळासाहेब ठाकरेंनी शिवसेनेचा पाया घातला आहे. बाळासाहेबांच्या विचारांचा झेंडा आम्ही आमच्या खांद्यावर घेतला. तो झेंडा शिंदेंच्या खांद्यावर नाही. आम्ही पक्षाशी इमान कायम ठेवलं आहे. बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात जोमाने पुढे जात आहे. आता जे कुणी गट वगैरे आहेत ते म्हणत असतील की आमची शिवसेना खरी आहे, त्यांनी जरा आरसा बघावा. पैशांनी मतं विकत घेण्याला जनाधार म्हणत नाहीत. आपला पक्ष मोदी-शाह यांच्या पायाशी ठेवणं याला विचारधारा म्हणत नाहीत. लांडग्याने वाघाचं कातडं पांघरलं म्हणून तो वाघ होत नाही. शिंदे-मिंधे उपटले कुठून? असाही प्रश्न संजय राऊत यांनी विचारला.

मोदी आणि शाह यांच्यावर टीका

“हिंदूहृदय सम्राटांच्या शिवसेना म्हणजे उद्धव ठाकरेंची शिवसेना. बाकीच्या उपऱ्यांना भाजपाने म्हणजे मराठी माणसाच्या शत्रूने आणलं आहे. अशा पद्धतीने शिवसेना फोडणं हे महाराष्ट्रावरचं सर्वात मोठं आक्रमण आहे. मोगलांनी केलेल्या आक्रमणानंतर मोदी शाह यांचं हे आक्रमण सर्वात मोठं आहे. शिवसेना फोडल्याने मिंधे-शिंदे वगैरे जे गट आहेत त्यांनी काहीही समजलं तरीही विचारधारा आणि शिवसेना त्यांची होत नाही.” असंही संजय राऊत म्हणाले.