शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बंडखोर आमदारांना हिंमत असेल तर राजीनामा द्या आणि पुन्हा एकदा निवडणुकीला सामोरं जा असं आव्हान दिलं होतं. त्यांच्या या आव्हानाला बंडखोर आमदार सुहास कांदे यांनी उत्तर दिलं आहे. आपण राजीनामा देण्यास तयार आहोत असं सांगताना त्यांनी आदित्य ठाकरेंचा उल्लेख आहे. आदित्य ठाकरेंनी मी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं दिल्यास आपण राजीनामा देऊ असं ते एबीपी माझाशी बोलताना म्हणाले आहेत.
आदित्य ठाकरे आज मनमाड दौऱ्यावर असून यावेळी बंडखोर आमदार सुहास कांदे त्यांची भेट घेणार आहेत. सुहास कांदे चार ते पाच हजार कार्यकर्ते घेऊन मनमाडला जाणार आहेत. जर आपल्याला भेट नाकारली तर रास्ता रोको करणार असल्याचा इशाराही त्यांनी दिला आहे.
“आदित्य ठाकरेंना भेटणार”
“मी आदित्य ठाकरेंना भेटणार म्हणजे भेटणारच आहे. माझ्यावर शिवसेनेचे, हिंदुत्वाचे सरकार असून ते बाळासाहेबांचे वंशज आहेत. त्यामुळे मी आदराने त्यांची भेट घेणार आहे. पण मी रस्त्यावरील, आंदोलनातला शिवसैनिक आहे. त्यामुळे भेटून दिलं नाही तर रस्त्यावर उतरणार आणि रास्ता रोको करणार,” असा इशारा त्यांनी यावेळी दिला.
….तर राजीनामा देणार
“आम्हाला भाजपा-शिवसेना युतीवर आणि हिंदुत्वाच्या मुद्द्यावर लोकांनी निवडून दिलं हे आदित्य ठाकरे विसरले आहेत. आम्ही बाळासाहेबांचे कट्टर शिवसैनिक आणि हिंदुत्ववादी आहोत. उद्धव ठाकरे म्हणतात त्याप्रमाणे मी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येण्यास तयार आहे, पण त्याआधी आदित्य ठाकरेंनी माझ्या प्रश्नाची उत्तरं द्यावीत. मी राजीनामा देऊन पुन्हा निवडून येऊन दाखवतो,” असं सुहास कांदे म्हणाले आहेत. मी दिलेल्या प्रश्नांची उत्तरं दिली की लगेच राजीनामा देणार असंही ते म्हणाले.
आदित्य ठाकरेंना जाहीर आव्हान
“आदित्य ठाकरे आतापर्यंत एकदाच मनमाडला आले आहेत. मनमाडच्या विकासात आदित्य ठाकरेंचं एक टक्कादेखील योगदान नाही, हे मी छातीठोकपणे सांगतो. आदित्य ठाकरेंनी हा प्रकल्प मी दिला आहे आणि त्यासाठी पैसे दिल्याचं सांगून दाखवावं. मनमाड शहरात किंवा नांदगाव मतदारसंघात येऊन तुमच्या पर्यटन खात्याचा एक प्रकल्प दाखवा,” असं आव्हान यावेळी त्यांनी दिलं.
“एकनाथ शिंदेना सुरक्षा न देण्याचा आदेश”
“ज्यावेळी नक्षलवाद्यांकडून एकनाथ शिंदेंना जीवे मारण्याच्या धमक्या आल्या, त्यावेळी दोन्ही गृहमंत्र्यांनी (राज्य आणि कॅबिनेट) त्यांना झेड प्लस दर्जाची सुरक्षा देण्याचा विचार केला होता. पण उद्धव ठाकरेंनी सकाळी ८.३० वाजता शंभूराज देसाई यांना फोन करुन एकनाथ शिंदेंना सुरक्षा देऊ नका असं सांगितलं,” असा दावा सुहास कांदे यांनी केला आहे.
पुढे ते म्हणाले “एक मराठी माणूस नक्षलवाद्यांविरोधात लढत असताना त्याला जीवे मारण्याची धमकी मिळत असूनही सुरक्षा का पुरवण्यात आली नाही? याउलट जे हिंदुत्वाच्या विरोधात होते त्यांना झे़ड प्लस सुरक्षा का देण्यात आली?”.