सिंधुदुर्ग जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या स्वीकृत संचालकपदी भाजपा आमदार नितेश राणे यांची बिनविरोध निवड करण्यात आली आहे. दरम्यान नितेश राणे यांची सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या तज्ञ स्विकृत संचालकपदावर नियुक्ती करण्यात आल्यानंतर शिवसेनेने प्रतिक्रिया दिली असून येत्या काळात जिल्हा बँक राणे समर्थकांचा अड्डा बनू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या निर्देशानुसार ही निवड करण्यात आली आहे. जिल्हा बँकेची सर्वसाधारण सभा अध्यक्ष मनिष दळवी यांच्या अध्यक्षतेखाली झाली. यावेळी ही निवड करण्यात आली. दरम्यान दुसरे स्वीकृत संचालक म्हणून कुडळाचे प्रकाश मोरे यांची निवड करण्यात आली.

शिवसेनेची टीका –

शिवसेना महाविकास आघाडी पुरस्कृत पॅनलचे जिल्हा बँक संचालक सुशांत नाईक यांनी येत्या काळात जिल्हा बँक राणे समर्थकांचा अड्डा बनू नये अशी अपेक्षा व्यक्त केली आहे.

सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड झाल्यानंतर नितेश राणेंची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…

“सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचा आर्थिक दर्जा उंचवावा व यातून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील शेतकऱ्यांची, बँक ग्राहकांची प्रगती व्हावी या दृष्टीने जिल्हा बँकेत तज्ञ व्यक्तीची स्वीकृत संचालकपदी निवड केली जाते. मात्र आज जिल्हा बँकेच्या बैठकीत झालेल्या स्वीकृत संचालक या निवडीकरिता तज्ज्ञ स्वीकृत संचालक निवडीचे निकष बाजूला ठेवत सत्ताधारी संचालक पॅनलकडून आमदार नितेश राणे यांना स्वीकृत संचालक म्हणून घेण्यात आले. आमदार नितेश राणे हे बँकेचे थकबाकीदार असल्याने त्यांना जिल्हा बॅंक निवडणुकीत मतदानाचा देखील अधिकार नव्हता. थकबाकीदार असलेल्या व मतदानाचा अधिकार नसलेल्या व्यक्तीला स्वीकृत संचालक बनवणे हे बँकेच्या हिताच्या दृष्टीने योग्य नाही,” अशी टीका सिंधुदुर्ग जिल्हा बँकेचे संचालक सुशांत नाईक यांनी केली आहे.

“महाराष्ट्र सहकारी संस्था (सुधारणा) अधिनियम (घ) खंड ११ नंतर पुढील खंड समाविष्ट करण्यात येईल त्याप्रमाणे ११ – अ, तज्ज्ञ संचालक याचा अर्थ बँकिंग, व्यवस्थापन, सहकार व वित्त व्यवस्था या क्षेत्रामधील अनुभव असलेली व्यक्ती असा आहे. त्यामध्ये संबंधित संस्थेने हाती घेतलेली उद्दिष्टे व कार्य यांच्याशी संबंधित अन्य कोणत्याही क्षेत्रातील विशेषज्ञता धारण करणाऱ्या व्यक्तींचा समावेश होतो,” असेही नाईक यांनी म्हटले आहे.

मोठी बातमी! नितेश राणेंना मोठा दिलासा; सिंधुदुर्ग जिल्हा बँकेवर बिनविरोध निवड

“सिंधुदुर्ग जिल्हा बँकेच्या निवडणुकीत जरी राणे समर्थक प्रणित पॅनलला बहुमत मिळाले, तरी निवडीनंतर जिल्हा बँकेत राजकारण असू नये हे आमचे मत आहे. मात्र ज्या पद्धतीने आमदार नितेश राणे यांची स्वीकृत संचालक म्हणून नियुक्ती केली गेली. ती पाहता येत्या काळात सिंधुदुर्ग जिल्हा बँक ही राणे समर्थकांच्या राजकारणाचा अड्डा बनवू नये अशी अपेक्षा आहे,” असा टोला देखील नाईक यांनी लगावला.

कायदेशीर प्रक्रियेनुसार आमची निवड – नितेश राणे

“जिल्हा बँकेत तज्ज्ञ संचालक म्हणून माझी आणि माझे सहकारी प्रकाश मोरे यांची निवड जिल्हा बँकेच्या संचालक मंडळाने केली आहे. कायद्यानुसार जो त्या चौकटीत बसतो त्याचं व्यक्तीला ती जबाबदारी देऊ शकतात. आम्ही आणि आमचे सहकारी त्या चौकटीत बसत असल्यानेच आमच्या खांद्यावर पक्षाने ही जबाबदारी दिली आहे,” अशी प्रतिक्रिया नितेश राणे यांनी दिली आहे.

बंगल्याच्या नोटीशीला कायदेशीर उत्तर देणार –

मुंबईतील बंगल्याला देण्यात आलेल्या नोटीशीवर बोलताना ते म्हणाले की, “नोटीस पाठवली आहे तर कायदेशीर गोष्टीला कायदेशीर पद्धतीने उत्तर देणार. प्रसारमाध्यमांसमोर उत्तर देणं चौकटीत बसत नाही”.

“शेंबड्या मुलासारखं आमच्याशी लढतात”

“जे या सरकारविरोधात बोलत आहेत त्यांच्याविरोधात मैदानात लढायला घाबरत आहेत. मैदानात हारायचं आणि शेंबड्या मुलासारखं आमच्याशी लढायचं याला काही अर्थ नाही. आम्ही त्यांना अंगावर येण्यापासून थांबवत नाही, पण आम्ही कायदेशीर पद्धतीने उत्तर देऊ,” असा इशारा यावेळी त्यांनी दिला.

संजय राऊतांचा पत्रकार परिषदेत घाम पुसतानाचा व्हिडीओ ट्वीट केल्यासंबंधी विचारलं असता ते म्हणाले की, “घाबरलेला माणूस कसा दिसतो आणि कितीही आव दाखवत असले तरी घाम पुसत असताना चेहऱ्याचे हावभाव महाराष्ट्राला दिसले पाहिजेत. शिवसेनेत असल्यानंतर प्रत्येकजण वाघ होत नाही. आजूबाजूला मांजरी पण असतात. जनतेला मांजर दिसावी म्हणून तो व्हिडीओ टाकला”.