राज्यात महाविकास आघाडीचं सरकार कोसळल्यानंतर एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीसांच्या नेतृत्वाखाली नवीन सरकार अस्तित्वात आलं. तेव्हापासून हे सरकार बेकायदेशीर असल्याचा दावा विरोधकांकडून केला जात आहे. शिवसेनेत फूट पडल्यानंतर ४० आमदार आणि १३ खासदार शिंदे गटात दाखल झाले. त्यामुळे नेमकी शिवसेना कुणाची? पक्षनाव आणि चिन्ह कुणाला मिळावं? असा प्रश्न उपस्थित झाला आहे. यासंदर्भात कायदेशीर लढा सुरू असून हे प्रकरण थेट निवडणूक आयोगासमोर सुनावणीसाठी आलं आहे. याबाबत लवकरच निकाल येण्याची शक्यता आहे. त्या पार्श्वभूमीवर शिंदे गट आणि ठाकरे गट यांच्यात कलगीतुरा रंगताना पाहायला मिळत आहे. शिवसेना उपनेत्या सुषमा अंधारे यांनी यावरून शिंदे गटाला खोचक टोला लगावला आहे.
महाप्रबोधन यात्रेचा समारोप मुंबईत!
सुषमा अंधारे सध्या महाप्रबोधन यात्रेच्या निमित्ताने महाराष्ट्राच्या विविध भागात सभा घेत आहेत. या यात्रेचा समारोप मुंबईत होईल, असं त्या म्हणाल्या आहेत. बीडमध्ये कार्यकर्त्यांशी बोलताना त्यांनी ही माहिती दिली. “समारोपाची मोठी सभा मुंबईला होईल. त्यासाठी उद्धव ठाकरे, राज्यातील पदाधिकारी, लोकप्रतिनिधी, मविआतील सगळे नेते उपस्थित असतील. ठाकरे गटाच्या मोठ्या ८ सभा होतील”, असं त्या म्हणाल्या.
संजय शिरसाटांना टोला!
दरम्यान, यावेळी बोलताना त्यांनी शिंदे गटावर तोंडसुख घेतलं. उद्धव ठाकरेंचं पक्षाध्यक्षपदच बेकायदेशीर असल्याचा दावा शिंदे गटाकडून केला जात आहे. त्याचा समाचार घेताना अंधारेंनी आगपाखड केली. “काही पेड ट्रोलर्स चुकीची माहिती पोहोचवण्याचा प्रयत्न करत आहेत. काहीजण सांगतात की ‘शिवसेनेचे पक्षप्रमुख, पक्ष बेकायदेशीर आहेत, मान्यता आम्हालाच मिळणार आहे’. संजय शिरसाटसारखा माणूस असं सांगत असेल तर मग निवडणूक आयोगाने तुमच्या कानात येऊन हे सांगितलंय का? निवडणूक आयोग तुमच्या घरचं आहे का? तुम्ही इतक्या ठामपणे सांगताय, तर मग तुमची आणि आयोगाची साठगाठ झाली आहे का? नसेल झाली, तर तुमच्यावर खटला दाखल करावा का?” असे सवाल सुषमा अंधारेंनी उपस्थित केले आहेत.
“शिंदे गटाकडे मतांची टक्केवारी आहे कुठे?”
“वस्तुस्थिती ही आहे की कुठल्याही राजकीय पक्षाचे आमदार किंवा खासदार किती आहेत, यावर पक्षाची मान्यता ठरत नसते. जेवढा माझा कायद्याचा अभ्यास आहे, त्यानुसार हे मी सांगते. एखादा पक्ष प्रादेशिक आहे की राष्ट्रीय किंवा त्या पक्षाला निवडणूक चिन्ह काय द्यायचं हे त्या पक्षाला मिळालेली मतांची टक्केवारी किती आहे, यावर ठरतं. ही मतांची टक्केवारी शिवसेनेने सिद्ध केलेली आहे. अंधेरी पूर्वच्याही निवडणुकीला आपण सामोरे गेलो आहोत. शिंदे गटात गेलेल्या आमदारांचीही मतांची टक्केवारी आपलीच आहे. ते निवडणुकीलाच कधी सामोरे गेलेले नाहीत, तर मतांची टक्केवारी कुठे आहे त्यांच्याकडे? हा कायद्याचा पेच आहे”, असं सुषमा अंधारे यावेळी म्हणाल्या.
शिंदे गटाचे भरत गोगावले यांची राष्ट्रवादीकडून कोंडी
“ते म्हणतात पक्षप्रमुख बेकायदेशीर आहेत कारण ज्या लोकांनी पक्षप्रमुखांना निवडून दिलं, त्यांना आम्ही मानत नाही. शिवसेनेच्या घटनेनुसार घटनात्मक पदावरील पदाधिकाऱ्यांनी मिळून आपला पक्षप्रमुख निवडला. त्यावेळी आत्ता जे तोंड वर करून बोलत आहेत, तेही निवडून देणाऱ्यांमध्ये होते. त्यावेळी एकनाथ शिंदेंसह सगळेच होते. सुभाष देसाई, अनिल परब, अनिल देसाई, संजय राऊत, रवींद्र वायकर, सुनील प्रभू, नीलम गोऱ्हे ही माणसं बेकायदेशीर असतील, तर जे ४० वांड तिकडे गेले आहेत, ज्यांना आपण निवडून दिलं, त्यांच्या एबी फॉर्मवर यांच्यापैकीच पदाधिकाऱ्यांच्या सह्या आहेत सूचक आणि अनुमोदक म्हणून”, असंही सुषमा अंधारे म्हणाल्या.