शिंदे विरुद्ध ठाकरे वादामध्ये निवडणूक आयोगाने शनिवारी मोठा निर्णय देत धनुष्यबाण हे चिन्ह गोठवलं. तसेच, शिवसेना या पक्षनावाचाही वापर करता येणार नाही, असा हंगामी निर्णय निवडणूक आयोगाने दिला. त्यामुळे आगामी अंधेरी विधानसभा पोटनिवडणुकीत दोन्ही गटांना धनुष्यबाण चिन्हाचा आणि शिवसेना या नावाचा वापर करता येणार नाही. हा उद्धव ठाकरेंसाठी मोठा धक्का मानला जात असला, तरी शिवसेनेकडून मात्र या सगळ्यासाठी मानसिक तयारी आधीच केली होती, असा दावा केला जातोय. यासंदर्भात बोलताना शिवसेनेच्या उपनेत्या सुषमा अंधारे यांनी एकनाथ शिंदे गटावर तोंडसुख घेतलं.
“राज ठाकरे, छगन भुजबळ, नारायण राणे असे अनेक लोक आजपर्यंत शिवसेनेतून बाहेर पडले. पण शिवसेनेच्या मुळावर उठणं, शिवसेनेला संपवणं हे काम आजपर्यंत कुणीच केलं नाही. हे वाईट आहे”, असं अंधारे टीव्ही ९ शी बोलताना म्हणाल्या.
“आम्ही मानसिकदृष्ट्या तयारच होतो”
निवडणूक आयोगाचा असा निर्णय येऊ शकतो, यासाठी आम्ही आम्ही मानसिकदृष्ट्या तयारच होतो, असं सुषमा अंधारे म्हणाल्या आहेत. “मुळात आम्ही सगळे मानसिक दृष्ट्या तयारच होतो की हे लोक असं कुटिल राजकारण करतील. हे लोक पाताळयंत्री आहेत आणि इतक्या खालच्या पातळीवर जाऊ शकतात. त्यामुळे शिवसेना प्रमुख आणि नेत्यांची यावर बऱ्यापैकी चर्चा झाली आहे. ते चिन्ह नेमकं काय असावं, नाव काय असावं याबाबत दुपारच्या बैठकीत अनेक मुद्द्यांवर चर्चा होईल”, असं त्या म्हणाल्या.
“जिसकी लाठी, उसकी भैंस”
“आता मला कुठल्याच गोष्टीवर विश्वास राहिलेला नाही. आम्ही कागदपत्रांची पूर्तता केली. तरी आयोगाचं म्हणणं आहे की त्यांचे जास्त फॉर्म आले. मुळात एकनाथ शिंदे स्वत:कडे मुख्य नेता पद आहे असं सांगतात. पण शिवसेनेनं निवडणूक आयोगाकडे नोंद केलेल्या संहितेमध्ये मुख्य नेता असं कोणतं पदच नाहीये. दुसरी गोष्ट म्हणजे शिवसेनेच्या बाबतीत पक्ष म्हणून निर्णय घ्यायचे अधिकार पक्षाच्या कार्यकारी प्रमुखांना आहेत. त्यामुळे ते अधिकार सध्या उद्धव ठाकरे यांच्याकडे आहेत. मग एकनाथ शिंदे गट कोण आहे? ते कसा हा निर्णय घेऊ शकतात? पण जिसकी लाठी उसकी भैंस असते. सत्तेचा गैरवापर ते करत राहतील, पण लोक उफाळून येतील”, असं सुषमा अंधारे म्हणाल्या.
पाहा व्हिडीओ –
ढाल तलवार, रेल्वे इंजिन, मशाल ते धनुष्यबाण…शिवसेनेच्या निवडणूक चिन्हांचा प्रवास
“नवं चिन्ह रातोरात लोकांपर्यंत पोहोचेल”
दरम्यान, धनुष्यबाण हे चिन्ह गोठवल्यामुळे तसं पाहाता फारसा प्रश्न निर्माण होणार नाही, असं अंधारे यावेळी म्हणाल्या. “मला वाटतं चिन्ह, नाव यामुळे एवढी काही अडचण निर्माण होणार नाही. चिन्हासोबत आमचा भावनिक ऋणानुबंध आहे. पण राष्ट्रवादी जेव्हा काँग्रेसमधून बाहेर पडली, त्यांना घड्याळ चिन्ह मिळालं तेव्हा ते रातोरात लोकांपर्यंत पोहोचलं होतं. वंचित आघाडीला कपबशी मिळाली, तेव्हा ती रातोरात लोकांपर्यंत पोहोचली होती. आता तर काळ अजून पुढे गेला आहे. आपण 5G च्या युगात आहोत. या काळात चिन्ह लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी अनेक हायटेक माध्यमं आहेत. उलट आत्ता शिवसैनिक अधिक त्वेषाने ते काम करतील”, असा विश्वास सुषमा अंधारे यांनी व्यक्त केला.