गेल्या काही दिवसांपासून बीडमधील शिवसेनेचे नेते जयदत्त क्षीरसागर हे भाजपामध्ये सामील होणार असल्याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. खुद्द क्षीरसागर यांनी आपण ठाकरे गट सोडणार असल्याचे कोणतेही सूतोवाच केले नव्हते. मात्र, ते भाजपामध्ये जाण्यास इच्छुक असल्याचं सांगितलं जात होतं. या पार्श्वभूमीवर आज बीडमधील ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना केलेल्या वक्तव्यांमुळे जयदत्त क्षीरसागर यांची शिवसेनेतून रीतसर हकालपट्टी झाल्याचं समोर येत आहे. तसेच, दोन दिवसांपूर्वी झालेल्या महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान कार्यक्रमातील उपस्थिती यासाठी कारणीभूत ठरल्याचं बोललं जात आहे.
जयदत्त क्षीरसागर यांचा राजकीय संभ्रम!
क्षीरसागर यांनी मधल्या काळात उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वाविषयी अनेकदा उघडपणे नाराजी बोलून दाखवली आहे. शिंदे गटाच्या बंडखोरीनंतर क्षीरसागरही त्यांच्यासोबत जातील असा कयास बांधला जात होता. मात्र, तसं झालं नाही. पण गेल्या काही दिवसांपासून क्षीसागर भाजपामध्ये जाण्यास उत्सुक असल्याचं बोललं जात आहे. भाजपा आणि शिंदे गट यांची युती झाल्यामुळे बीडमधून नेमकं कोण आगामी निवडणूक लढवणार? या संभ्रमामुळेच क्षीरसागर यांनी अद्याप भाजपात जाण्याचा निर्णय घेतला नसल्याचं सांगितलं जात आहे.
बीडमध्ये जयदत्त क्षीरसागर भाजपमध्ये जाण्यास इच्छुक पण…
क्षीरसागर यांचे राजकीय विरोधक सुरेश नवले शिंदे गटात दाखल झाले आहेत. युतीमुळे ही जागा शिंदे गटाकडे गेल्यास भाजपात जाऊनही क्षीरसागर यांच्या हाती काहीच लागणार नाही. या पार्श्वभूमीवर त्यांचा राजकीय संभ्रम कायम असताना आता ठाकरे गटाकडूनच त्यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नसल्याचं जाहीर करण्यात आलं आहे.
“त्यांचा शिवसेनेशी काही संबंध नाही”
बीडचे जिल्हाध्यक्ष अनिल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना जयदीप क्षीरसागर यांची पक्षातून हकालपट्टी केल्याचे संकेत दिले आहेत. “क्षीरसागर यांचा शिवसेनेशी काहीही संबंध नाही हे आमच्या तोंडून सांगणं हे आमचं भाग्य आहे. वर्षानुवर्षं आम्ही ज्या क्षीरसागर यांना विरोध करत होतो, त्यांना शिवसेनेतून बाजूला सारल्याचं जाहीर करण्याची वेळ आमच्यावर आली”, असं अनिल जगताप यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं.
नगरोत्थानाच्या कार्यक्रमात नेमकं काय घडलं?
दोनच दिवसापूर्वी नगरोत्थान अभियानांतर्गत बीडमधील सिमेंट रस्ता आणि नालीच्या ७० कोटींच्या विकासकामांचा शुभारंभ मुख्यमंत्री एकनाथ शिंदेच्या हस्ते करण्यात आला. या कार्यक्रमाला उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित होते. यावेळी जयदत्त क्षीरसागर यांनी उपस्थिती लावली होती. तसेच, कार्यक्रमावेळी उद्धव ठाकरेंचा किंवा शिवसेनेचा त्यांनी कुठेही उल्लेख केला नाही. त्यांच्यावरील कारवाईसाठी हे तात्कालिक कारण ठरल्याचं बोललं जात आहे. जयदत्त क्षीरसागर यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवरही शिवसेनेतील ठाकरे गटाशी कोणताही संबंध असल्याचा उल्लेख ठेवलेला नाही.