शहरातील खड्डय़ांकडे पालिकेतील सत्ताधाऱ्यांचे लक्ष वेधण्यासाठी शिवसेनेने बुधवारी खड्डय़ांवरून लांब उडी मारण्याची अभिनव स्पर्धा घेतली. विशेष म्हणजे प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या स्पर्धकांना बक्षीस देऊन गौरविण्यात आले.
पोलीस मुख्यालयासमोरील मुख्य रस्त्यावर घेतलेल्या या अनोख्या स्पर्धेमुळे प्रशासनाच्या अब्रूचे आपोआपच धिंडवडे निघाले.
शहरातील प्रमुख रस्त्यांवरील खड्डे बुजविण्यासाठी दरवर्षी पावसाळ्यात आधी लाखो रुपये खर्च केले जातात.
महापालिकेच्या आदर्श रस्त्यावरही अनेक ठिकाणी खड्डे झाले असले तरी ठोस अशी कोणतीही उपाय योजना होत नसल्याने अपघातांचे प्रमाण वाढतेच राहिले आहे. महापालिका व बांधकाम विभागाला या परिस्थितीची जाणीव करून देण्यासाठी शिवसेनेतर्फे बस स्थानकाजवळील मुख्य रस्त्यावर लांब उडी स्पर्धा घेण्यात आली. शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी प्रशासनाकडे रस्त्यांची तत्काळ दुरुस्ती करावी अशी मागणी केली.
खड्डे, अरुंद रस्ते, बंद सिग्नल व्यवस्था, झेब्रा क्रॉसिंगचा अभाव, दुभाजक नसणे अशा सर्व समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी रस्त्यावरील मोठाल्या खड्डय़ांभोवती शिवसेनेच्या वतीने लांब उडीच्या मैदानाची आखणी करण्यात आली. महाविद्यालयातील युवकांना या स्पर्धेत सहभागी करून घेण्यात आले. त्वरित रस्त्यांची दुरुस्ती न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा या वेळी देण्यात आला. शिवसेना जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, उपजिल्हाप्रमुख हिलाल माळी, भूपेंद्र लहामगे, नगरसेवक भगवान गवळी, चुडामण मोरे, नंदुलाल फुलपगारे आदींसह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी उपस्थित होते.
 शहरातील निरनिराळ्या वसाहती आणि मुख्य बाजारपेठेतील रस्त्यांवरील लहान-मोठय़ा खड्डय़ांमुळे रोज लहान-मोठे अपघात घडत आहेत. रिक्षा उलटणे, खड्डे टाळण्याच्या प्रयत्नात एखादे वाहन धडकणे, अशा कारणांमुळे खड्डय़ांचा विषय ऐरणीवर आला आहे.

Story img Loader