आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर राजकीय आणि सामाजिक क्षेत्रातून शुभेच्छांचा वर्षाव केला जात आहे. मात्र, त्याचवेळी नुकत्याच जाहीर झालेल्या केंद्रीय आरोग्य व कुटुंबकल्याण विभागाच्या स्थायी समितीने जाहीर केलेल्या एका अहवालावरून मोदी सरकारला लक्ष्य देखील केलं जात आहे. हा अहवाल करोना काळात देशात निर्माण झालेल्या भयंकर ऑक्सिजन तुटवड्यासंदर्भात आहे. या अहवालामध्ये मोदी सरकारकडून या समस्येकडे झालेल्या दुर्लक्षावर ठपका ठेवण्यात आला आहे. केंद्रीय विभागाच्या स्थायी समितीनंच हा अहवाल तयार केल्यामुळे आता मोदी सरकार टीकेच्या केंद्रस्थानी आलं आहे. या पार्श्वभूमीवर ‘सामना’मधील आग्रलेखातून शिवसेनेनं मोदी सरकारला परखड सवाल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काय आहे या अहवालात?

देशातील ऑक्सिजन तुटवड्याकडे केंद्र सरकारनं दुर्लक्ष केल्याचा ठपका अहवालात ठेवण्यात आल्याचं अग्रलेखात म्हटलं आहे. तसेच, ऑक्सिजनच्या तुटवड्यामुळे झालेल्या मृतांच्या आकडेवारीचं ऑडिट करून मृतांच्या वारसांना नुकसानभरपाई द्यावी, अशी शिफारसही मोदी सरकारला केली आहे.

‘सरकारचे हात समितीनं खाली आणले’

करोना काळात ऑक्सिजनअभावी एकही मृत्यू झाला नसल्याचा दावा केंद्रानं केला होता. मात्र त्यासंदर्भात केंद्रीय आरोग्य व कुटुंब कल्याण विभागाच्या समितीनंच सादर केलेल्या अहवालानं केंद्र सरकारच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह निर्माण झालं आहे. ‘करोनाच्या दुसऱ्या लाटेत मृत्यूनं थैमान घातलं होतं. सगळीकडे ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला होता. हजारो रुग्णांना ऑक्सिजनअभावी तडफडून प्राण सोजावे लागले होते. केंद्रावर सर्व बाजूंनी टीका होत होती. पण नेहमीप्रमाणे सरकारनं हात वर केले. हे वर केलेले हात केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण विभागाच्याच स्थायी समितीनं खाली आणले आहेत’, असं अग्रलेखात नमूद करण्यात आलं आहे.

“गुजरात म्हणजे पाकिस्तान नाही; पण पुढील दोन वर्षांत…”; देवेंद्र फडणवीसाचं विधान!

‘भाजपावाल्यांचे यावर काय म्हणणे आहे?’

‘हा अहवाल केंद्र सरकारच्या करोना व्यवस्थापनाला अपयशाच्या पिंजऱ्यात उभा करणारा आहे. करोनाच्या दुसऱ्या लाटेची तीव्रता समजून घेण्यात आणि त्या काळात वाढलेल्या ऑक्सिजनच्या मागणीचे आकलन करण्यात केंद्र सरकार कमी पडले असाच त्याचा दुसरा अर्थ आहे. महाराष्ट्रातल्या तत्कालीन ठाकरे सरकारकडे करोनावरून बोट दाखवणाऱ्या भाजपावाल्यांचे यावर काय म्हणणे आहे?’ असा प्रश्न अग्रलेखात विचारण्यात आला आहे.

व्यग्र मुख्यमंत्री, ३२ वर्षांचा तरुण आणि निळा शर्ट! रत्नागिरीत आदित्य ठाकरेंची तुफान टोलेबाजी!

‘ते गोठलेले अश्रू सरकारला दिसतील का?’

‘ऑक्सिजनअभावी झालेल्या कोरोना मृत्यूंबाबत डोळेझाक करणाऱ्या मोदी सरकारच्या डोळ्यांत समितीने झणझणीत अंजनच घातले आहे. त्याने तरी मोदी सरकारचे डोळे उघडतील का? ऑक्सिजनअभावी तडफडून मरण पावलेल्या हजारो कोरोना रुग्णांच्या वारसांच्या डोळ्यांत गोठलेले अश्रू सरकारला दिसतील का? कोरोनाचे ‘ऑक्सिजन’ बळी हे वास्तव सरकार मान्य करेल का? आता सरकार म्हणून तुम्ही काय प्रायश्चित्त घेणार आहात?’ असा परखड सवाल शिवसेनेकडून उपस्थित करण्यात आला आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena targets pm narendra modi government on oxygen shortage corona second wave pmw