विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी बंडखोर आमदारांच्या अपात्रता प्रकरणाच्या सुनावणीवरून विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्यावर सडकून टीका केली. नार्वेकरांनी मध्यंतरी कुणाचं मार्गदर्शन केलं आणि त्यांना कुणी काय मार्गदर्शन केलं याची माहिती घेतली पाहिजे, असं दानवेंनी म्हटलं. तसेच त्यांच्यावर कुणाचा दबाव आहे असा प्रश्ना उपस्थित केला. ते मंगळवारी (२६ सप्टेंबर) नागपूरमध्ये पत्रकारांनी विचारलेल्या प्रश्नाला उत्तर देताना बोलत होते.
अंबादास दानवे म्हणाले, “विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर म्हणजे प्राधिकरण (ट्रिब्युनल) आहे. त्यामुळे त्यांच्याकडून अपेक्षा आहे की, त्यांनी फक्त अपात्रता कायद्याचा अर्थ लावावा. तुम्हाला जो अर्थ लावायाचा तो लावा. आमच्या बाजूने लावा किंवा आमच्या विरोधात लावा.”
“आमच्याच बाजूने अर्थ लावा असं आमचं म्हणणं नाही”
“आमच्याच बाजूने अर्थ लावा असं आमचं म्हणणं नाही. जो अर्थ लावायाचा तो लावा मात्र कायद्याच्या कसोटीवर घासून लावा. मला वाटतं त्यांना कायद्याच्या कसोटीवरच निर्णय द्यावा लागेल, अशी परिस्थिती निर्माण होत आहे,” असं मत अंबादास दानवे यांनी व्यक्त केलं.
व्हिडीओ पाहा :
“नार्वेकर अद्यापही प्रक्रिया कशी करायची यातच गुंतले”
अंबादास दानवे पुढे म्हणाले, “निकालाच्या तारखा आपल्याला जाहीर करता येत नाही. निकालाच्या तारखा आपल्या हातात नसतात. परंतु सर्वोच्च न्यायालयाचे निर्देश होते की, लवकरात लवकर निकाल द्या. ११ मे २०२३ रोजी हा निकाल लागल्यानंतर आता सप्टेंबर महिना संपत आला आहे, अजूनही या विषयाची सुनावणी सुरू झालेली नाही. अध्यक्ष राहुल नार्वेकर अद्यापही प्रक्रिया कशी करायची यातच गुंतले आहेत. यातच सगळं राजकारण गुंतलं आहे.”
“कुणी काय मार्गदर्शन केलं याची माहिती घेतलीच पाहिजे”
“म्हणून या अध्यक्षांवर कुणाचा दबाव आहे का? राहुल नार्वेकर सुनावणी घेण्याआधी या काळात कुणाकुणाला भेटले, काय मार्गदर्शन घेतलं, कुणी काय मार्गदर्शन केलं याची एकदा माहिती घेतलीच पाहिजे. हे आमच्यावर दबाव टाकतात असं म्हणतात, पण यांच्यावर दबाव कुणाचा आहे. यांच्यावर केंद्रातील भाजपा नेत्यांचा दबाव आहे की, राज्यातील भाजपा नेत्यांचा दबाव आहे का. हे कोणत्या दबावाखाली काम करतात याचीही आगामी काळात माहिती घेतली पाहिजे,” असंही दानवेंनी म्हटलं.