तामीळनाडूचे मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माबाबत वादग्रस्त वक्तव्य केलं. यानंतर त्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून भाजपाच्या अनेक मंत्र्यांनी प्रतिक्रिया दिल्या. तसेच स्टॅलिन यांच्या या वक्तव्यावरून ‘इंडिया’ आघाडीची कोंडी करण्याचा प्रयत्न केला. आता यावर शिवसेनेच्या ठाकरे गटाने प्रतिक्रिया दिली आहे. शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या ‘सामना’च्या अग्रलेखात स्टॅलिन यांच्या वक्तव्यावर भूमिका स्पष्ट करताना ठाकरे गटाने गुरुवारी (७ सप्टेंबर) भाजपाचाही समाचार घेतला.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाकरे गटाने म्हटलं, “हिंदू धर्म हा एक पृथ्वीतलावरील सगळ्यात जुना धर्म आहे. ५ हजार वर्षांपूर्वी हा धर्म स्थापन झाला. अनेक संकटे, वादळे, घाव अंगावर झेलून या धर्माची पताका फडकत आहे. त्यासाठी महाभारत काळापासून अगणित लोकांनी बलिदाने दिली आहेत. तलवारीच्या आणि तागडीच्या जोरावर हा सनातन धर्म विकलांग करण्याचा प्रयत्न झाला, पण धर्माची पताका डकत आहे. त्यामुळे तामीळनाडूचे एक मंत्री उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माविषयी तोडलेले तारे अज्ञानाच्या अंधारात लुप्त झाले आहेत.”

“उदयनिधी यांचे विधान देशातील ८०-९० कोटी हिंदूंच्या भावना दुखावणारे”

“उदयनिधी काय म्हणाले? “सनातन धर्म सामाजिक न्याय आणि समानतेच्या विरोधात आहे. काही गोष्टींचा विरोध करता येत नाही, त्यांना संपवूनच टाकावे लागते. आपण डेंग्यू, डास, मलेरिया किंवा करोनाचा विरोध करू शकत नाही. ते आपल्याला संपवायचे आहेत. अशाच पद्धतीने आपल्याला सनातन धर्मालाही संपवायचे आहे.” उदयनिधी यांचे हे विधान त्यांच्या ‘द्रविडी’ भूमिकेशी तर्कसंगत असले तरी देशातील ८०-९० कोटी हिंदूंच्या भावनांना ठेच पोहोचवणारे आहे,” असं ठाकरे गटाने म्हटलं.

“दोष तर सर्वच धर्मांमध्ये आहेत, पण हिंदू धर्माने…”

ठाकरे गटाने पुढे म्हटलं, “भारतीय जनता पक्ष व त्यांच्या बजरंगी बगलबच्च्यांना तर उदयनिधींच्या वक्तव्याने उकळ्याच फुटल्या. उदयनिधींना उत्तर त्याच भाषेत द्यायला हवे. ते देण्याचे सोडून ‘इंडिया’ आघाडी आता उदयनिधींवर काय भूमिका घेणार? शिवसेनेचे यावर काय धोरण आहे? वगैरे प्रश्न विचारले गेले. शिवसेनेची भूमिका ही जुनीजाणती म्हणजे ‘गर्व से कहो हम हिंदू है’ हीच आहे व राहणार. ममता बॅनर्जीपासून केजरीवाल, काँग्रेस वगैरे लोकांनीही उदयनिधींच्या वक्तव्यावर नाराजी व्यक्त केली आहे. दोष तर सर्वच धर्मांमध्ये आहेत, पण हिंदू धर्माने हे दोष दूर करण्यासाठी सतत प्रयत्न केले. सतीची चाल, अस्पृश्यता, विषमता, स्त्री शिक्षण अशा अनेक विषयांवर हिंदू धर्माने प्रगतशील भूमिका घेतली.”

“आंबेडकरांनी लाखो बांधवांसह हिंदू धर्माचा त्याग केला”

“डॉ. आंबेडकरांनी त्यांच्या लाखो बांधवांसह हिंदू धर्माचा त्याग केला. धर्मातील स्पृश्य अस्पृश्यता आणि रूढी-परंपरेच्या विरोधात त्यांनी बंड केले. या बंडापासून सनातन धर्माने धडा घेतला आणि सामाजिक न्यायाचे तत्त्व स्वीकारले. धर्म जागच्या जागीच आहे; पण अस्पृश्यता, रूढी-परंपरांना मलेरिया, डेंग्यूप्रमाणे आपण खतम केले. उदयनिधी स्टॅलिन यांनी सनातन धर्माचा हा इतिहास समजून घेतला पाहिजे,” असं ठाकरे गटाने सांगितलं.

हेही वाचा : ‘सनातन’ वाद; ‘द्रमुक’ पक्षाचा इतिहास काय? पेरियार यांनीही केली होती हिंदू धर्मावर टीका

“तामीळनाडूत ‘पौर्णिमे’ ऐवजी अमावास्येला मंगल कार्ये”

“दुसरे असे की, द्रविड विरुद्ध सनातन हा संघर्षाचा इतिहासही जुनाच आहे. त्याच संघर्षातून दक्षिणी लोकांचा हिंदी विरोध वाढला. ते हिंदू धर्म, त्यांचे देव, परंपरा मानायला तयार नाहीत. ‘द्रविडी’ पक्षाचा पायाच ब्राह्मणवादाच्या विरोधाचे प्रतीक म्हणून घालण्यात आला. द्रविडी लोकांचे अंत्यसंस्कार हे दहन नव्हे, तर दफन पद्धतीने होतात. जयललिता, उदयनिधी स्टॅलिनचे आजोबा करुणानिधी यांचेही दफन करण्यात आले. तामीळनाडूत सनातन विरोध इतका टोकाचा आहे की, तेथे ‘पौर्णिमे’ ऐवजी अमावास्येला मंगल कार्ये, उद्घाटने, शुभारंभ केले जातात. अशा द्रविडी स्थानातून सनातन धर्मास विरोध होणे ही बाब आश्चर्यकारक नाही,” असंही ठाकरे गटाने नमूद केलं.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena thackeray faction criticize bjp udaynidhi stalin statement sanatan dharma pbs
Show comments