माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी आपला काँग्रेसमधला कित्येक दशकांचा प्रवास थांबवत थेट भाजपात प्रवेश केला. भाजपा अशोक चव्हाण यांना आता राज्यसभेत पाठवण्याची शक्यता आहे. चव्हाण यांचा भाजपाप्रवेश काँग्रेससाठी तसेच महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का असल्याचे सांगितले जातेय. भाजपाने अशोक चव्हाण यांच्यावर आदर्श इमारत घोटाळ्याचे आरोप केले होते. हे प्रकरण तेव्हा भापजपाने चांगलेच लावून धरले होते. चव्हाण हे लिडर नसून डिलर आहेत, अशी उपहासात्मक टीका विद्यमान उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी तेव्हा केली होती. दरम्यान, सामना या शिवसेनेच्या (ठाकरे गट) मुखपत्रात याच अशोक चव्हाण आणि भाजपाचा समाचार घेण्यात आलाय. शहिदांचा अपमान करणाऱ्यांच्या स्वागताच्या कमानीवर पताका चिकटविण्याचे काम फडणवीस-मोदी यांना करावे लागतेय. भाजपच्या मोठ्या पराभवाची ही गॅरंटी आहे! शहीद भाजपला माफ करणार नाहीत!, अशी खोचक टीका सामनाच्या अग्रलेखात करण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

अशोक चव्हाण भाजप वॉशिंग मशीनमध्ये गेले

‘भ्रष्टाचाऱ्यांचा एकच नारा तुरुंगापेक्षा भाजप बरा’, असे वातावरण महाराष्ट्रातच नाही, तर संपूर्ण देशातच तयार झाले आहे. ‘अब की बार चारसौ पार’ ही मोदी गर्जनाही याच मोहिमेचा एक भाग आहे. अर्थात, भारतीय जनता पक्षाची ४०० जागांची दिल्ली अभी बहोत दूर है. इतर पक्षांतील शक्तिमान भ्रष्टाचाऱ्यांना घेऊनदेखील ते जेमतेम दोनशेचा आकडा पार करू शकतील, असे वातावरण आहे. याच घाबरलेल्या अवस्थेत भाजप रोज इतर पक्षांतील भ्रष्टाचाऱ्यांना आपल्या ‘वॉशिंग मशीन’मध्ये टाकून स्वच्छ करीत आहे. महाराष्ट्रातील काँग्रेसचे नेते, माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला असून ते भाजप वॉशिंग मशीनमध्ये गेले आहेत, असे सामनात म्हणण्यात आले आहे.

‘आदर्श’ इमारतीत अशोक चव्हाण अॅण्ड फॅमिलीचे पाच-सहा फ्लॅट

पाप धुण्यासाठी पूर्वी गंगास्नान करण्याची परंपरा होती. आता भाजप वॉशिंग मशीन हीच गंगोत्री झाली आहे. अशोक चव्हाण यांना व त्यांच्या कुटुंबीयांना काँग्रेसने काय द्यायचे कमी केले होते? त्यांचे पिताश्री शंकरराव चव्हाण हे महाराष्ट्रात तीनेक वेळा मुख्यमंत्री, त्याआधी वर्षानुवर्षे मंत्री होते. केंद्रात अर्थ, संरक्षण, गृह अशी महत्त्वाची खाती सांभाळली. अशोक चव्हाण हेसुद्धा राज्यात प्रदीर्घ काळ मंत्री व मुख्यमंत्री राहिले. त्यांच्या रक्तात काँग्रेस होती. तरीही ते गेले. ज्या व्यक्तींना काही कारणांसाठी असुरक्षित वाटते त्यांना भाजपचे धुलाई यंत्र वैचारिक निष्ठेपेक्षा आकर्षित करते, अशी प्रतिक्रिया जयराम रमेश यांनी दिली आहे. मुंबईतील कफ परेड या श्रीमंत भागात शहीद सैनिकांसाठी राखीव असलेल्या भूखंडावर अशोक चव्हाण यांच्या प्रेरणेने एक उंच टॉवर उभा राहिला. मूळ इमारत पाच-सहा माळ्यांचीच होणार होती. त्यावर अशोक चव्हाण कृपेने ३२ माळे उभे राहिले. कोट्यवधींचा व्यवहार त्यात झाला. हे सर्व प्रकरण ‘सीबीआय’कडे गेले. त्यात अनेक अधिकाऱ्यांना अटका झाल्या. अनेक राजकारण्यांनी त्या इमारतीत गुंतवणूक केली. याच ‘आदर्श’ इमारतीत अशोक चव्हाण अॅण्ड फॅमिलीचे पाच-सहा फ्लॅट असल्याचे उघड झाले. भारतीय सैन्यातील शहिदांच्या विधवा पत्नींचे फ्लॅटस् हडपण्याचे हे प्रकरण तेव्हा भाजपने लावून धरले, अशी टीका सामनात करण्यात आली.

अशोक चव्हाण ‘चौकीदार’ कसे होऊ शकतील?

अशोक चव्हाण यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. स्वतः पंतप्रधान मोदी हे तेव्हा नांदेडला आले होते आणि अशोक चव्हाण यांनी ‘आदर्श’ घोटाळ्यात शहिदांचा अपमान केला, असे भावपूर्ण शब्दांत सांगितले होते. शहिदांचा अपमान झाला हे सांगताना त्यांच्या डोळ्यांच्या कडा ओलावल्या होत्या. शहिदांचा अपमान करणाऱ्यांना माफ करू नका, असे त्यांनी सांगितले. एवढेच नव्हे, तर ‘‘मुंबईतील आदर्श गृहनिर्माण सोसायटीमधील कारगील शहिदांच्या विधवा पत्नींच्या फ्लॅटस्ची ज्यांनी चोरी केली, हे फ्लॅटस् ज्यांनी आपली सासू, मेव्हणी यांच्या नावाने करून घेतले ते अशोक चव्हाण ‘चौकीदार’ कसे होऊ शकतील? तुम्ही कोणत्या चौकीदारांच्या हाती देश सोपविणार आहात? देशाला या प्रश्नांचे उत्तर हवे आहे,’’ असे मोदींनी काँग्रेस श्रेष्ठींना त्या वेळी सुनावले होते. मग आता काय झाले? शहीद जवानांच्या विधवा पत्नींच्या फ्लॅटस्ची चोरी करणारा ‘भ्रष्ट चौकीदार’ आज भाजपच्या वॉशिंग मशीनमध्ये आल्याने एकदम ‘स्वच्छ चौकीदार’ झाला का? असा सवाल सामनात करण्यात आला.

अजित पवार सिंचन घोटाळ्यासह भाजपसोबत सत्तेचे भागीदार

कालच्या संसदेच्या अधिवेशनात ‘यूपीए’ काळातील आर्थिक घोटाळ्यांवर मोदी सरकारने एक श्वेतपत्रिका काढली. त्या श्वेतपत्रिकेत अशोक चव्हाण यांच्या ‘आदर्श’ घोटाळ्याचा खास उल्लेख आहे. दोन दिवसांपूर्वी श्वेतपत्रिका प्रसिद्ध झाली, काल अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा त्याग केला आणि मंगळवारी त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केला. आता बहुधा ते भाजपचे राज्यसभेचे उमेदवार असतील, पण ‘आदर्श’ घोटाळ्यात जो शहिदांचा अपमान झाला त्याचे काय? मग ज्या शहिदांसाठी भाजपने अपमान झाल्याची बोंब ठोकली ती खोटी होती? की शहिदांनाच भाजपने आपल्या वॉशिंग मशीनमध्ये टाकून त्यांच्यावरील हौतात्म्याचे रंग पुसून टाकले? ते शहीद नव्हतेच असे आता भाजप जाहीर करणार असेल तर प्रश्नच संपला. अजित पवार यांच्या ७० हजार कोटींच्या सिंचन घोटाळ्याची तुतारी स्वतः मोदी यांनी फुंकली व पुढच्या चोवीस तासांत ‘काकां’च्या पाठीत खंजीर खुपसून अजित पवार सिंचन घोटाळ्यासह भाजपसोबत सत्तेचे भागीदार बनले. आता अशोक चव्हाण गेले. अशा तऱहेने भाजपची काँगेस झाली असून एक विचारधारा असलेला भारतीय जनता पक्ष मोदी-शहांनी मोडून संपवून टाकला. देशातून काँगेस संपविण्याचा नारा मोदी देत होते. मात्र त्यांनी भाजपचीच ‘काँग्रेस’ केली आणि काँग्रेसला अमर करून ठेवले. काँगेसशिवाय भाजप व देश चालू शकत नाही हे मोदींनी सिद्ध केले, असा टोला सामनात लगावण्यात आला.

शरण जायचे की हुकूमशाहीसमोर लढायला उभे राहायचे?

‘ईडी’सारख्या तपास यंत्रणांचा गैरवापर करून भाजप इतर पक्षांतील भ्रष्ट नेत्यांना स्वपक्षात घेत आहे. भाजपकडे स्वतःचे असे काहीच उरलेले नाही. त्यामुळे ही उधार-उसनवारी त्यांनी सुरू केली. भ्रष्टाचार संपवून काळा पैसा नष्ट करण्याचे मोदींचे वचन होते, पण देशभरातील सर्वपक्षीय भ्रष्टाचाऱ्यांची ‘टोळी’ म्हणून आता लोक भाजपची चेष्टा करीत आहेत. या सगळ्यांपेक्षा झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन हे तत्त्वाचे पक्के व हिंमतवाले निघाले. दिल्लीचे मुख्यमंत्री केजरीवालही लढत आहेत. सोरेन दबावाला बळी पडले नाहीत व अटकेस सामोरे गेले. तुरुंगात जाताना त्यांनी भाजपला आव्हान दिले. मोदी-शहांच्या दडपशाहीला घाबरून पळायचे, शरण जायचे की त्यांच्या हुकूमशाहीसमोर लढायला उभे राहायचे? हा खरा प्रश्न आहे. इतिहास लढणाऱ्यांची नोंद ठेवतो व पळपुट्यांना विसरून जातो, असे भाष्य शिवसेनेच्या ठाकरे गटाने सामनाच्या माध्यमातून केले.

पताका चिकटवण्याचे काम मोदी-शाहांना करावे लागतेय

मिंधे, अजित पवार, अशोक चव्हाण यांची व त्यांना साथ देणाऱ्यांची नोंद इतिहासात महाराष्ट्राचे भगोडे अशीच होईल. शिवरायांचे नाव यापुढे अशा मंडळींनी घेऊ नये व भाजपने ‘देशभक्ती’, ‘हौतात्म्य’ वगैरे शब्दांना उगाच बदनाम करू नये. देशभक्ती हे भाजपचे ढोंग आहे. ‘पुलवामा’ त्यांनीच घडवले व त्यातील शहिदांच्या नावावर मोदींनी मते मागितली. ‘आदर्श’मध्ये शहिदांचा अपमान झाला म्हणून काँगेसच्या चव्हाणांना घरी पाठवा, आम्ही त्यांना तुरुंगात पाठवू, अशी ‘गॅरंटी’ मोदी यांनी नांदेडला येऊन दिली होती. अशोक चव्हाण हे लीडर नसून डीलर आहेत, असे देवेंद्र फडणवीस गळ्याच्या नसा फाडून बोंबलत होते. आज त्याच डीलरच्या, शहिदांचा अपमान करणाऱ्यांच्या स्वागताच्या कमानीवर पताका चिकटविण्याचे काम फडणवीस-मोदी यांना करावे लागत आहे, असा टोला सामनात लगावण्यात आला.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena thackeray faction samana criticizes bjp over ashok chavan joining bjp mention adarsh building scam prd
Show comments