दसरा हा मंगलमय सण, पण महाराष्ट्राचे अमंगल करणारे एक बेकायदेशीर, घटनाबाह्य सरकार शिवरायांच्या महाराष्ट्रावर मोदी–शहांनी लादले आहे. सत्तेचा माज व अहंकार अशाच पद्धतीने रावणाच्या नसानसांत उसळत होता. त्या अहंकाराचा नाश शेवटी दसऱ्याच्या दिवशी झाला. तेव्हापासून विजयादशमीचा उत्सव साजरा होत आहे. घटनाबाह्य, अहंकारी रावणाचा नाश होईल या जिद्दीने मराठी जनतेची मने व मनगटे तापली आहेत. शिवतीर्थावर ‘राम–लीला’ साजरी होईल. अहंकारी रावणाचे दहन होईल, महाराष्ट्र भ्रष्टाचारमुक्त होईल व भारत देश सूडाच्या फासातून मुक्त होईल. महाराष्ट्राच्या जनतेने अहंकाराचा कोथळा काढण्यासाठी ‘वाघनखे’ चढवली आहेत, असा हल्लाबोल शिवसेनेनं ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून शिंदे गट आणि भाजपावर केला आहे.
“‘दसरा सण मोठा’ असे गर्वाने म्हटले जाते तो दसरा आज साजरा होत आहे. श्रीरामाने रावणावर विजय मिळवला तोच हा दिवस. भगवान रामाने रावणाचा वध करण्यासाठी चंडी देवीची पूजा केली. ती चंडी म्हणजे दुर्गा. रामाने युद्ध जिंकले म्हणजेच रावणाच्या अहंकाराचा नाश केला, त्याचा अभिमान मोडला. रावणाकडे सोन्याच्या विटा म्हणजे सोन्याचे खोके होते. ते खोकेही त्याला वाचवू शकले नाहीत,” असा टोला ठाकरे गटानं शिंदे गटाला लगावला आहे.
“अमली पदार्थांचा ‘रावण’ या तरुणांचा नाश करीत आहे”
“महाराष्ट्रात दसरा साजरा होत असताना राज्याची स्थिती काय आहे? श्रीराम नाशकातील पंचवटीत वास्तव्यास होते. रामस्पर्शाने ती भूमी पवित्र झाली, पण त्या पंचवटीत आज राजकीय आशीर्वादाने ‘ड्रग्ज’ म्हणजे अमली पदार्थांचा मोठा व्यापार चालतो. गेल्या काही महिन्यांपासून ‘पंचवटी’ या नशेच्या व्यापाराने बदनाम झाली. शेकडो कोटींचे अमली पदार्थ जप्त झाले. हे अमली पदार्थ रामाच्या पंचवटीत आले कोठून? राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस हे नवरात्रीच्या उत्सवांना गेले व म्हणाले, ‘या देशातील बच्चा बच्चा श्रीराम म्हणेल!’’ देवेंद्रजी, या देशातील बच्चा बच्चा श्रीरामाचा गजर करीलच, त्यासाठी तुमची गरज नाही, पण अमली पदार्थांचा ‘रावण’ या तरुणांचा नाश करीत आहे. त्या रावणाचा वध तुम्ही का करीत नाही?” असा सवाल ठाकरे गटानं फडणवीसांना विचारला आहे.
हेही वाचा : “नारायण राणे, रामदास कदम मराठा अन् कुणबी समाजात…”, ठाकरे गटातील नेत्याचा आरोप
“राज्यात नशेचा बाजार सुरू आहे”
“वाढीव उत्पादन शुल्कामुळे म्हणे बीअरचा खप घटला आहे आणि सरकारचा महसूल बुडत आहे. त्यामुळे उत्पादन शुल्कात कपात करून बीअर कशी स्वस्त करता येईल आणि बीअरचा खप कसा वाढवता येईल, याचा अभ्यास करण्यासाठी थेट एक अभ्यास गटच मिंधे सरकारने स्थापन केला आहे. तरुणांच्या हातात रोजगाराऐवजी बीअरची बाटली सोपविणारे हे सरकार आहे. एकीकडे श्रीरामाचा गजर करा सांगायचे आणि दुसरीकडे बीअरचे ‘सरकारी प्रमोशन’ करायचे. श्रीरामाचा गजर करा हे सांगणाऱ्यांच्या राज्यात हा असा नशेचा बाजार सुरू आहे,” अशी टीका ठाकरे गटानं केली आहे.
हेही वाचा : “१३ वा बॉम्बस्फोट मुस्लीम वस्तीत…”, भाजपाचा शरद पवारांवर गंभीर आरोप
“शिवरायांच्या महाराष्ट्रास ‘लाचार’ बनवायचे धोरण आणलं आहे”
“महाराष्ट्राची एकजूट तोडण्याचे काम २०१४ पासून सुरू झाले. त्याच कारस्थानाचा भाग म्हणून शिवसेना तोडली गेली, शरद पवारांचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही फोडला गेला व मिंध्या-लाचार बुळचटांच्या हाती महाराष्ट्र सोपवून भाजपाने नवी फडणविशी सुरू केली. महाराष्ट्राचे शौर्य, मर्दानगी, स्वाभिमान मारून शिवरायांच्या महाराष्ट्रास ‘लाचार’ बनवायचे हे धोरण अमलात आणले आहे,” असं टीकास्र ठाकरे गटानं डागलं आहे.