शिवरायांच्या भगव्याला ज्यांनी कलंक लावला आहे आणि ज्यांना वाटतंय की त्यांचं फडकं म्हणजे राष्ट्रध्वज तसं नाही. आम्ही आमच्या शिवरायांचा भगवा लाल किल्ल्यावर फडकवणार आहोत ही आमची प्रतिज्ञा आहे असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी भाजपावर टीका केली. तसंच राहुल नार्वेकर यांच्यावरही टीका केली. उद्धव ठाकरे यांनी अलिबागच्या चौलमध्ये सभा घेतली त्यावेळी त्यांनी भाजापवर आणि राहुल नार्वेकर यांच्यावर टीका केली. राहुल नार्वेकर म्हणजे कोकणच्या मातीला लागलेला कलंक आहे असंही त्यांनी म्हटलं आहे.
काय म्हणाले उद्धव ठाकरे?
“अलिबाग आणि रायगड म्हणजे दोन मतदारसंघ एक लोकसभेचा आणि विधानसभेचा. तुम्हाला दोनदा गद्दारांना गाडायचं आहे. इथे डबल गद्दारी झाली आहे. नुसतीच गद्दारी नाही. १५ दिवसांनी एका लवादाने म्हणजेच लबाडाने एक निर्णय दिलाय. ते तुमचे इथलेच कुठले तरी आहेत मला वाटतं रेवसचे वगैरे. हा या मातीला लागलेला कलंक आहे. मी कलंक शब्द मागे एकदा बोललो तर खूप झोंबला होता. कुणाला बोललो होतो तुम्हाला माहीत आहे. त्यांना खूप झोंबला होता शब्द. आता त्यांना बोलत नाहीये, आत्ता जे बोललो ते दहाव्या परिशिष्टाची चिरफाड करुन जो उरफाटा आणि विक्षिप्त निर्णय दिला त्याच्याबद्दल बोलतो आहे. तुम्हाला जास्त माहीत आहे. काय म्हणालात? दलाल? जमिनीचे दलाल? नाही मला माहीत नाही. त्याने एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी होती की एक मोठी जबाबदारी त्यांच्यावर होती. अध्यक्षांची परंपरा आहे. त्या परंपरेला साजेसं त्यांनी वर्तन करायला हवं होतं. एखाद्या व्यक्तीचं वैशिष्ट्यं असतं. आजही न्यायमूर्ती म्हटलं की रामशास्त्री प्रभुणे आठवतात. पण असे लाचार, दलाल ते समोर येणारा कागद वाचून दाखवतात.”
सत्तेचं दूध पिणारे बोके
“आजच वृत्तपत्रात चंदीगढचा महापौर कसा जिंकला तुम्ही वाचलंत ना? मांजर डोळे मिटून दूध पिते पण तिला वाटतं की जगाचं आपल्याकडे लक्ष नाही. हे जे काही सत्तेचं दूध पिणारे बोके आहेत जगाचं लक्ष आहे तुमच्याकडे. लोकशाहीचा आणि कायद्याचा मुडदा पाडून तुम्ही त्या मढ्यावर सत्तेची खुर्ची ठेवता आहात. आव काय आणत आहेत? तर मोठा आव आणतात. आपल्या देशाचा अर्थसंकल्प यांनी सादर झाला. त्यांनी शेवटचा अर्थसंकल्प मांडला म्हणून मी त्यांचं कौतुक केलं. कारण त्यांना माहीत आहे की पुढच्या वेळी बजेट मांडणारं सरकार त्यांचं नसणार. या सरकारचा शेवटचा अर्थसंकल्प म्हणून निर्मला सीतारमण यांची नोंद झाली.” असा टोलाही उद्धव ठाकरेंनी लगावला आहे.
हे पण वाचा- “कारसेवकांनी बाबरीचा कलंक पाडला तेव्हा मी उपस्थित, बाकीचे घरात लपून…”, देवेंद्र फडणवीस यांचं वक्तव्य
नितीश कुमारला यांनी बरोबर घेतलं आहे. फोडाफोडी करायची, मतं मिळेपर्यंत सगळ्यांना जवळ करायचं. नंतर फक्त सुटाबुटातल्या लोकांना मदत करायची. दहा वर्षे निघून गेली आहेत. दहा वर्षे लागली यांना राम मंदिर बांधायला. राम मंदिर यांच्या नाही कोर्टाच्या आदेशाने झालं आहे. मी राम मंदिराला विरोध केला नाही. असंही उद्धव ठाकरे म्हणाले.