Ambadas Danve : विधानसभेच्या निवडणुकीत महाविकास आघाडीला मोठ्या पराभवाला सामोरं जावं लागलं. महाविकास आघाडीतील प्रमुख तीन पक्षांपैकी एकाही पक्षाला विरोधी पक्षनेतेपद मिळवण्याएवढ्या जागा जिंकता आलेल्या नाहीत. मात्र, तरीही विधानसभा अध्यक्षांनी ठरवलं तर विरोधकांना विरोधी पक्षनेतेपद मिळू शकतं अशी चर्चा आहे. यातच आता ३ मार्चपासून अर्थसंकल्पीय अधिवेशन आहे. या अर्थसंकल्पीय अधिवेशनात शिवसेना ठाकरे गट विधानसभेच्या विरोधी पक्षनेतेपदासाठी दावा करणार असल्याची चर्चा आहे. आता या चर्चांवर शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवे यांनी एक मोठं विधान केलं आहे. ठाकरे गटाने विरोधी पक्षनेतेपदावर दावा करावा अशी भूमिका आमच्या आमदारांची असल्याची माहिती अंबादास दानवे यांनी माध्यमांशी बोलताना दिली आहे.
अंबादास दानवे काय म्हणाले?
विरोधी पक्षनेते पदाबाबतीत काय नेमकं काय चर्चा झाली? असा प्रश्न विचारण्यात आला असता अंबादास दानवे यांनी म्हटलं की, “शिवसेना ठाकरे गट नक्कीच विरोधी पक्षनेते पदावर दावा करणार आहे. याबाबत पक्षाचे प्रमुख तथा माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे लवकरच सविस्तर भूमिका जाहीर करतील. मात्र, आमच्या झालेल्या बैठकीत शिवसेना ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदासाठी दावा करावा अशी भूमिका पक्षाच्या विधानसभा सदस्यांनी मांडली आहे”, अशी माहिती अंबादास दानवे यांनी दिली.
काँग्रेस आणि राष्ट्रवादीचं (शरद पवार) समर्थन मिळेल का?
ठाकरे गटाने विरोधी पक्षनेते पदाबाबत दावा केला तर काँग्रेस आणि राष्ट्रवादी (शरद पवार) चे समर्थन मिळेल का? असा प्रश्न विचारला असता अंबादास दानवे म्हणाले, “आता समर्थनाचा प्रश्न नाही. येथे संख्येचा प्रश्न आहे. ज्या पक्षाची संख्या जास्त त्या पक्षाचा विरोधी पक्षनेता होतो. मात्र, याबाबतची पुढची भूमिका विधानसभेच्या अध्यक्षांनी घ्यायची आहे. पण त्यासाठी शिवसेना ठाकरे गटाने त्या पदावर दावा करावा अशी भूमिका आमच्या पक्षाच्या सदस्यांनी मांडली. पण उद्धव ठाकरे यांनी याबाबतची अधिकृत भूमिका अद्याप स्पष्ट केलेली नाही”, असं अंबादास दानवे यांनी म्हटलं.
विरोधी पक्षनेते पदासाठी कोणाची नावे चर्चेत?
भास्कर जाधव, सुनील प्रभु, आदित्य ठाकरे यांची नावं विरोधी पक्षनेते पदासाठी चर्चेत आहेत का? असं विचारलं असता अंबादास दानवे म्हणाले, “आता हे नावं तुमच्याकडे चर्चेत आहेत. आमच्याकडे अशा पद्धतीची चर्चा नाही. तसेच पक्षाच्या प्रमुखांना सर्व अधिकार आहेत. त्यामुळे ते योग्य तो निर्णय घेतील. तसेच या पदाबाबत सरकारची किंवा विरोधी पक्षाची भूमिका काय? याचा संभ्रम असल्यामुळे आम्ही आतापर्यंत कोणाचंही नाव दिलेलं नाही”, असंही अंबादास दानवे यांनी स्पष्ट केलं.