उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीपदावरून खाली खेचलं, त्यानंतर ज्या काही घडामोडी घडल्या त्यावेळीही आम्ही घाबरलो नाही. तर आता व्हिप बजावला व्हिप बजावला हे सांगून आम्हाला कुणी घाबरवू पाहात असेल तर त्यांना मी सांगू इच्छितो की आम्ही घाबरणारे नाही. मी ग्रामीण भागात राहतो, त्या ठिकाणी असं करणं म्हणजे कोंबडी हूल म्हणतात व्हीप बजावला सांगण्याचं दाखवणं म्हणजे कोंबडी हूलच आहे आम्ही घाबरत नाही असं ठाकरे गटाचे आमदार भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. शिवसेना हे नाव आणि पक्षचिन्ह निवडणूक आयोगाने एकनाथ शिंदेंना दिलं आहे. त्यानंतर अधिवेशनाची सुरूवात झाली आणि अधिवेशनात शिवसेनेच्या ५५ आमदारांना व्हिप बजावण्यात आला. त्यानंतर ही प्रतिक्रिया भास्कर जाधव यांनी दिली आहे.
आणखी काय म्हटलं आहे भास्कर जाधव यांनी?
परिशिष्ट १० चा उल्लेख करण्याचा यांना अधिकार आहे का? हा कायदा तत्कालीन पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयींच्या कालावधीत जो पक्षांतरर्गत बंदी विरोधी कायदा करण्यात आला त्यामध्ये हे परिशिष्ट १० समावेश करण्यात आलं होतं. ज्यांना पक्षातून बाहेर पडायचं असेल त्यांनी खुशाल पक्षातून बाहेर पडावं आणि स्वतःचा पक्ष स्थापन करावा. मूळ पक्ष हा त्यांचा पक्ष राहात नाही. तसंच पक्षाची निशाणी ही देखील त्यांची राहात नाही. वाजपेयींना अशी तोडफोड आणि फूट मान्य होती. त्यामुळेच अटलबिहारी वाजपेयी म्हणाले होते की तोडफोड करून, फोडाफोडी करून कुणी राजकारण करत असेल आणि सत्ता आणत असेल तर अशा सत्तेला मी चिमट्यानेही हात लावणार नाही हे उदाहरणही भास्कर जाधव यांनी दिलं.
राज्यातले शेतकरी आजच्या घडीला हवालदिल
आज राज्यात शेतकरी हवालदिल झाले आहेत. एसटी कर्मचाऱ्यांचं काय झालं? मूळ जुनं पेन्शन योजना होती त्याचं काय झालं? धनगर समाज, लिंगायत समाज यांच्या आरक्षणाचं काय झालं? यांना कुणाशाही काहीही घेणंदेणं नाही. हे फक्त सत्तापिपासू लोक आहेत. येणारी निवडणूक पैशांच्या मार्गाने, जोरजबरदस्तीने जिंकायची आहे. त्यांना जनतेच्या प्रश्नांशी, शेतकऱ्यांशी काहीही घेणं देणं नाही असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे. विधीमंडळाच्या प्रांगणातून भास्कर जाधव यांनी माध्यमांना ही प्रतिक्रिया दिली आहे.
उद्धव ठाकरेंचं मुख्यमंत्रीपद गेलं, आमच्यावर खोट्या केसेस दाखल केल्या गेल्या, आमची सुरक्षा काढली नाही. त्यामुळेही आम्ही घाबरलो नाही. महाराष्ट्रातलं सुसंस्कृत राजकारण जर कुणी संपवलं असेल तर ते देवेंद्र फडणवीस यांनी केलं आहे. देवेंद्र फडणवीस उसनं अवसान आणून वक्तव्य करत आहेत. त्यांच्याकडे महाराष्ट्र गांभीर्याने पाहात नाही असंही भास्कर जाधव यांनी म्हटलं आहे.