लोकसभा निवडणुकीत एनडीएला बहुमत मिळालं. तर इंडिया आघाडीला २३२ जागा मिळल्या आहेत. भारतीय जनता पार्टीने ४०० पारचा नारा दिला होता. मात्र, ४०० पारचं भाजपाचं स्वप्न भंगलं. महाराष्ट्रात महायुतीला मोठा धक्का बसला. लोकसभा निवडणुकीच्या प्रचारावेळी महायुतीला ४५ जागा मिळतील असा दावा भाजपाच्या अनेक नेत्यांनी केला होता. मात्र, महाराष्ट्रातील जनतेने महायुतीच्या पदरात फक्त १७ जागा टाकल्या. तर महाविकास आघाडीने ३० जागा जिंकल्या. लोकसभेच्या निवडणुकीत छत्रपती संभाजीनगर मतदारसंघही चांगलाच चर्चेत होता.
या मतदारसंघातून शिवसेना शिंदे गट विरुद्ध शिवेसना ठाकरे गट अशी प्रमुख लढत झाली. यामध्ये शिवसेना शिंदे गटाचे उमेदवार संदिपान भुमरे यांचा विजय झाला. तर ठाकरे गटाचे चंद्रकांत खैरे यांचा पराभव झाला. या पराभवानंतर चंद्रकांत खैरे यांनी आपल्याच पक्षाचे नेते आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते थेट अंबादास दानवे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधत आपल्याच पक्षावर पराभवाचं खापर फोडलं आहे. “मला काही लोकांवर संशय असून आपण उद्धव ठाकरेंकडे तक्रार करणार आहे”, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं आहे.
चंद्रकांत खैरे नेमकं काय म्हणाले?
“मला काही लोकांवर संशय आहे. शिवसेना ठाकरे गटाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेण्यासाठी मी एक-दोन दिवसांत जाणार आहे. तेव्हा त्यांना याबाबत सर्व सांगणार आहे. जर उद्धव ठाकरे यांना हे सांगितलं नाही तर पुढे विधानसभेच्या निवडणुकीत असाच धोका होईल. त्यासाठी आतापासून काहीतरी करावं लागेल. छत्रपती संभाजीनगरमध्ये पक्षाचे दोन जिल्हाप्रमुख आहेत. त्यामध्ये एक जिल्हाप्रमुख आजारी होते. ते उठलेही नाहीत. त्यानंतर दुसरे जिल्हाप्रमुख हे विरोधी पक्षनेते आहेत. तेही या ठिकाणी यायचे, १० मिनिटं बसायचे आणि जायचे त्यामुळे मी एकटा पडलो”, असं चंद्रकांत खैरे यांनी म्हटलं.
खैरे पुढे म्हणाले, “पाच आमदार फुटले, मी एकटाच काम करत होतो. हेही लक्षात आलं पाहिजे. विरोधी पक्षनेते मोठे झाले आहेत. ते आणखी मोठे व्हावेत. पण त्यांनीही लक्ष द्यायला पाहिजे होतं. ते जिल्हाप्रमुख आहेत. जिल्हाप्रमुखपद त्यांनी सोडलं नाही. मग काम तरी करायला पाहिजे होतं. हे सर्व उद्धव ठाकरे यांच्या कानावर घालणार आहे. यात मोठा रोल हा धन शक्तीचा आहे. पण ज्याची जबाबदारी त्यांनी पार पाडायला हवी होती, असं खैरे यांनी म्हटलं. दरम्यान, त्यांच्या या विधानाचा रोख कोणाकडे होता? यावर आता तर्कवितर्क लावले जात आहेत.