ठाकरे गटाचे नेते शिशिर शिंदे यांनी आयुष्यातली चार वर्षे वाया गेली म्हणत उद्धव ठाकरेंची साथ सोडली आहे. माजी आमदार शिशिर शिंदे यांनी पक्षाच्या उपनेतेपदाचा राजीनामा दिला. मातोश्रीवर जाऊन त्यांनी सुपूर्द केला आहे. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राज्यव्यापी शिबीर मुंबईत पार पडण्याच्या एक दिवस आधीच शिशिर शिंदे यांनी पक्ष सोडला आहे. उद्धव ठाकरे भेटीसाठी वेळ देत नसल्याचंही त्यांनी म्हटलं आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

शिवसेनेच्या (उद्धव बाळासाहेब ठाकरे) उपनेता पदाचा राजीनामा देताना शिंदे यांनी काही आरोप केले आहेत. शिंदेंनी म्हटलं आहे की, गेल्या सहा महिन्यांपासून उद्धव ठाकरे यांची भेट घेण्याचा प्रयत्न करतोय, पण उद्धव ठाकरे भेटत नाहीये. अनेक वेळा भेटीसाठी प्रयत्न केले, पण पक्षप्रमुखांची भेटतच नव्हते. त्याचबरोबर शिशिर शिंदेंनी असंही म्हटलं आहे की, त्यांना मनासारखं काम करायलाही मिळत नव्हतं. उद्धव ठाकरेंना लिहिलेल्या पत्रात त्यांनी म्हटलं आहे की, गेल्या चार वर्षांपासून त्यांच्यावर कोणतीही जबाबदारी दिली गेली नाही. त्यानंतर केवळ नावापुरत पद दिलं गेलं. त्यामुळे राजकीय आयुष्यातली चार वर्ष वाया गेली. असंही शिशिर शिंदेंनी म्हटलं आहे.

राज ठाकरे यांचे निकटवर्तीय म्हणून शिशिर शिंदे यांना ओळखले जायचे. राज ठाकरे यांनी शिवसेना सोडून नवीन पक्ष स्थापन करण्याचा निर्णय घेतला त्यावेळी त्यांच्यासोबत शिवसेनेतून बाहेर पडणाऱ्या नेत्यांमध्ये शिशिर शिंदेंचा समावेश होता. ते मनसेचे आमदार म्हणून निवडूनही आले होते. २०१४ मधील विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला होता. २०१८ मध्ये त्यांनी राज ठाकरेंची साथ सोडली. मात्र आता त्यांनी आयुष्यातली चार वर्षे वाया गेली म्हणत उद्धव ठाकरेंचीही साथ सोडली आहे.

२०२२ पर्यंत त्यांच्यावर पक्षाने कोणतीही जबाबदारी दिली नाही. एकनाथ शिंदेंसह ४० आमदारांनी केलेल्या बंडानंतर म्हणजेच जून २०२२ मध्ये शिशिर शिंदे यांना उपनेता करण्यात आलं होते. मात्र, उद्धव ठाकरे भेटत नाहीत, तसंच आपल्याला आपल्या मनासारखे काम करू दिले जात नाही, म्हणून त्यांनी उद्धव ठाकरेंच्या पक्षाला सोडचिठ्ठी दिली आहे.

मराठीतील सर्व महाराष्ट्र बातम्या वाचा. मराठी ताज्या बातम्या (Latest Marathi News) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Shivsena thackeray group leader shishir shinde quits shivsena uddhav balasaheb thackeray due to this reason scj
Show comments