आज धुळवड आहे आणि लोकशाहीचाच रंग उधळला जाईल. अहंकार, मस्तवालपणातून काही प्रयत्न सुरु आहेत. पण लोक लोकशाहीचा रंग उधळतील आम्हाला खात्री आहे. हेमंत सोरेन आणि अरविंद केजरीवाल यांना जशी अटक करण्यात आली आहे तो प्रकार लोक सहन करणार नाही असं संजय राऊत म्हणाले आहेत. केजरीवाल यांना अटक होताच लोक दिल्लीसह देशात रस्त्यावर उतरले आहेत. हुकूमशाही लादली गेली तर लोक रस्त्यावर उतरतात. हुकूमशहांना लोक हाकलून देतात, असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध

जम्मू काश्मीरमध्ये ओमर अब्दुल्लांनी महाराष्ट्र सदनाला का विरोध केला आहे ते बघावं लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. तसंच आम्ही अरविंद केजरीवाल यांच्या अटकेचा निषेध करणार आहोत. त्यावेळी उद्धव ठाकरेही दिल्लीत जाण्याचा विचार करत आहेत. अरविंद केजरीवाल यांना मोदी घाबरतात. त्यामुळे त्यांना तुरुंगात मोदींनी डांबण्यात आलं आहे. ते तुरुंगातून काम करत आहेत त्यामुळे लोक त्यांचं नक्की ऐकतील. तुरुंगातून बाहेर आल्यावर ते आणखी बळकट होतात. भाजपाचे लोक भांग पिऊन विरोधातल्या नेत्यांना गँगस्टर म्हणत आहेत. ते शुद्धीत नाहीत. छगन भुजबळ, नवाब मलिक तुरुंगात जाऊन आलेत ते गँगस्टर आहेत का? अजित पवारांना तुरुंगात धाडणार होतात ते गँगस्टर आहेत का? असा सवाल संजय राऊत यांनी केला आहे.

कंगनाच्या उमेदवारीवर काय म्हणाले राऊत?

“कंगनाला भाजपाने तिकीट का दिलं माहीत नाही. पण तिची विचारधारा भाजपाशी जुळत असेल तर तिने निवडणूक लढावी. कंगनाला निवडून द्यावं की नाही हे मंडीतले लोक ठरवतील. त्यांना बक्षीस मिळालं आहे का? वगैरे त्याबद्दल मला माहीत नाही.” असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

भाजपाची कृत्यं दरोडेखोरांप्रणाणे

एखादा दरोडोखोर चोऱ्या माऱ्या करुन, फोडाफोडी करुन आली तिजोरी भरतो आणि म्हणतो मी श्रीमंत आहे. भाजपाची अवस्था तशीच आहे. सगळ्या पक्षांमध्ये फोडाफोडी करायची, लहानसहान पक्ष बरोबर घ्यायचे आणि सांगायचं आम्ही मोठा पक्ष आहोत. पण भाजपा मोठा पक्ष वगैरे काहीही नाही. दुसऱ्याच्या तिजोरीवर दरोडा टाकायचा आणि आपली श्रीमंत वाढवायची याला श्रीमंती म्हणत नाही असंही राऊत म्हणाले.

हे पण वाचा- वंचितने ठाकरे गटाबरोबरची युती तोडली, संजय राऊत म्हणाले; “बाळासाहेब ठाकरे नेहमी सांगायचे…”

प्रकाश आंबेडकर येतील अशी आशा आहे

शिवसेनेची लोकसभेची पहिली यादी उद्या जाहीर होईल. १५ ते १६ जागा आम्ही जाहीर करु. प्रकाश आंबेडकर वंचितचे नेते आहेत. ते आमच्यासह रहावेत हा आमचा प्रयत्न आहे. आम्ही चार जागांचा प्रस्ताव त्यांना दिला आहे. त्यांना प्रस्ताव मान्य आहे की नाही हे त्यांच्यावर आहे. प्रकाश आंबेडकर आमच्यासह नसले तरीही आम्ही निवडून येऊ. प्रकाश आंबेडकर बरोबर असते तर मताधिक्य वाढलं असतं. मात्र आम्ही परावलंबी नाही. जनता आमच्या बरोबर आहे असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. आम्ही त्यांना विनंती केली आहे. त्यांनी प्रस्ताव मान्य करायला पाहिजे होता असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. संजय राऊत यांनी आपल्या वक्तव्यातून एकप्रकारे युती तुटल्याचेच संकेत दिले आहेत.

Story img Loader