Sanjay Raut On Yogesh Kadam : पुणे शहरातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर बलात्कार झाल्याच्या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात खळबळ उडाली आहे. या घटनेतील आरोपी दत्तात्रय गाडे याला आज (२८ फेब्रुवारी) पुणे पोलिसांनी अटक केलं आहे. स्वारगेट बस स्थानकात घडलेल्या या घटनेवरून शिवसेना ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली. तसेच गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी या घटनेबाबत बोलताना केलेल्या एका विधानावरून ठाकरे गट आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे. “राज्याचे गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत”, अशा शब्दांत आता संजय राऊत यांनी योगेश कदम यांच्यावर हल्लाबोल केला आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

संजय राऊत काय म्हणाले?

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेतील आरोपीला पोलिसांनी अटक केलं. यावर खासदार संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, “पुणे पोलिसांनी आणि सरकारने आरोपीला अटक केलं म्हणजे फार उपकार केले नाहीत. स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये बलात्काराची घटना घडते आणि त्या घटनेवर बोलताना गृहराज्यमंत्री काय बोलतात? ते म्हणाले की सर्व घटना शांततेत घडल्यामुळे बाहेर काही कळलं नाही. गृहराज्यमंत्र्यांची ही अशी भूमिका? एका मुलीवर बलात्काराची घटना घडते आणि गृहराज्यमंत्री म्हणतात की तिने फोर्सफुली किंवा स्ट्रगल केलं नाही. अशा पद्धतीचा शब्द त्यांनी वापरला. खरं म्हणजे आपले गृहराज्यमंत्री दिव्यच आहेत”, असं म्हणत खासदार संजय राऊतांनी गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या वक्तव्यावर टीका केली.

“पुण्यात अशा गोष्टी का घडतायेत? कायद्याचा धाक राहिला आहे का? पोलिसांची भिती राहिली आहे असं दिसत नाही. राजकीय वरदहस्त लाभलेले गुन्हेगार मोकाट सुटतात, जे गुन्हेगार असतात त्यांना कोणताही पक्ष नसतो. अशा गुन्हेगारांना कठोर शिक्षा झाली पाहिजे. ठाण्यातील बदलापूर लैंगिक अत्याचाराच्या घटनेत जेव्हा अक्षय शिंदेचा एन्काऊंटर झाला तेव्हा निवडणुका होत्या, आता निवडणुका नाहीत. तो ठाणे जिल्हा होता, आता पुणे जिल्हा आहे”, असं म्हणत खासदार संजय राऊत यांनी राज्य सरकारवर जोरदार टीका केली.

‘एकनाथ शिंदे मोठे साहित्यिक, लेखक, कवी…’

खासदार संजय राऊत यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली. राऊत म्हणाले की, “एकनाथ शिंदे फार मोठे साहित्यिक, फार मोठे लेखक, फार मोठे कवी, फार मोठे संत आहेत. यापेक्षा अजून काही पदवी द्यायची असेल तर देऊ. एकनाथ शिंदे अशा पदव्या विकत घेऊ शकतात. आमदार आणि खासदार जसे विकत घेतले जातात त्या प्रकारे साहित्यिक, लेखक, कवी या पदव्या जर एकनाथ शिंदेंना हव्या असतील तर ते त्या पदव्या विकत घेऊ शकतात. एकनाथ शिंदे यांना अमित शाह अजून पुरस्कार देऊ शकतात. एवढंच नाही तर ते एकनाथ शिंदेंना ज्ञानपीठ पुरस्कार देखील देऊ शकतात”, अशा खोचक शब्दांत संजय राऊत यांनी एकनाथ शिंदेंवर टीका केली.

योगेश कदम यांनी काय म्हटलं होतं?

पुण्यातील स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये एका तरुणीवर झालेल्या बलात्काराच्या घटनेबाबत बोलताना गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी म्हटलं होतं की, “स्वारगेट बस स्थानकातील शिवशाही बसमध्ये जी घटना घडली, ती घटना कुठलीही फोर्सफुली किंवा स्ट्रगल न झाल्यामुळे घडली. ज्यावेळी ही घटना घडली त्यावेळी त्या ठिकाणी जवळ आसपास दहा ते पंधरा लोकं आजू बाजूला उपस्थित होते. पण कोणालाही शंका आली नाही”, असं योगेश कदम यांनी म्हटलं होतं.