ग्रामपंचायत निवडणूक निकालांमध्ये भाजपाला आणि महायुतीला घवघवीत यश मिळालं आहे. भाजपा, शिवसेना (शिंदे गट) आणि अजित पवार गट यांची २३५९ पैकी १३७२ ग्रामपंचायतींवर सत्ता आली आहे. भाजपाकडून जल्लोष सुरु आहे. अशात संजय राऊत यांनी अनाडी लोकांच्या हाती राज्य गेलं आहे अशा शब्दांत टीका केली आहे.
काय आहे संजय राऊत यांची X पोस्ट?
काळ मोठा कठीण आला आहे.
राज्य अनाडी लोकांच्या हाती गेले आहे. ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा दावा बरेच गटतट करीत आहेत.या निवडणुका पॅनल पद्धतीने लढवल्या जातात. पक्ष आणि चिन्हावर लढवल्या जात नाहीत. त्यामुळे आम्हीच जिंकलो हा दावा पोकळ आहे. जे लोक विद्यापीठाच्या सेनेट निवडणुका घेण्यास घाबरतात. मुंबईसह १४ महानगर पालिकांच्या निवडणुका घ्यायला यांची हातभर फाटते.ते ग्राम पंचायत निवडणुका आम्हीच जिंकल्याचा गुलाल उधळत आहेत. याला काय म्हणावं? हास्य जत्राच!
असं म्हणत संजय राऊत यांनी भाजपावर आणि महायुतीवर टीका केली आहे. या निवडणुका पॅनल पद्धतीने होतात. गावाच्या विकासासाठी या निवडणुका होतात. अडाणी घोडे सध्या उधळले आहेत. आम्हीच जिंकलो असं म्हणत आहेत. मात्र मुख्यमंत्री एकच टेप वाजवत आहेत. मात्र त्यामुळे जनमत त्यांच्या बाजूने होणार नाही असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे. सरकारला आकडा लावायची सवय आहे. ४० खोके, ५० खोके. त्यांनी काहीही आकडा लावला तरीही काही फरक पडत नाही. ग्रामपंचायत निवडणुका चिन्ह आणि पक्षांवर लढवल्या जात नाहीत. हे सरकार सिनेट निवडणूक घ्यायला घाबरतं आहे. त्यांनी हा दावा करणं हास्यास्पद आहे असंही राऊत म्हणाले आहेत.