संसदेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनावर विरोधी पक्षाने बहिष्कार टाकला आहे. यात शिवसेनेचाही ( ठाकरे गट ) समावेश आहे. यावरून उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेना ( ठाकरे गट ) पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना टोला लगावला आहे. संसदेच्या नवीन इमारतीच्या उद्घटनाला उद्धव ठाकरेंना कोण घेऊन जातंय, असं फडणवीस म्हणाले आहेत.
राष्ट्रपतींना निमंत्रण न देता केवळ पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या उपस्थितीत २८ मे नव्या संसद भवनाचं उद्घाटन होत आहे. याचा निषेध करत या सोहळ्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय भाजपातेर २१ विरोधी पक्षांनी घेतला आहे.
हेही वाचा : ‘या’ १२ घटनांचा उल्लेख करत देवेंद्र फडणवीसांचं विरोधकांना प्रत्युत्तर; म्हणाले, “हे सगळे…!”
“या सगळ्या लोकांचा लोकशाहीवर विश्वास नाही”
‘नव्या संसद भवनाच्या इमारातीत मी जाणार नाही,’ असं उद्धव ठाकरे यांनी म्हटल्याचं प्रश्न देवेंद्र फडणवीसांना माध्यम प्रतिनिधीने विचारला. त्यावर फडणवीसांनी म्हटलं, “त्यांना कोण घेऊन जातंय. त्यांना जी जागा दिली होती, तिथेच ते जात नाहीत. ते विधानपरिषदेचे सदस्य आहेत, दोन तासांच्या वर तिथे बसत नाहीत. त्यांना कोण लोकसभेत आणि संसद भवनात कोण बोलवतंय? या सगळ्या लोकांचा लोकशाहीवर विश्वास नाही.”
हेही वाचा : “गद्दारांच्या गाड्या चालवण्याची वेळ…” संजय राऊत यांचा देवेंद्र फडणवीसांना टोला
“फडणवीसांना त्यांची जागा कळून चुकेल”
फडणवीसांनी उद्धव ठाकरेंबद्दल केलेल्या विधानावर खासदार विनायक राऊत यांना माध्यम प्रतिनिधीने विचारलं. यावर राऊत म्हणाले, “देवेंद्र फडणवीसांच्या डोक्यात सत्तेची मस्ती खूप गेली आहे. अजून थोडे महिने राहिले आहेत. नंतर त्यांना त्यांची जागा कळून चुकेल,” अशी टीका विनायक राऊतांनी फडणवीसांवर केली आहे.