मुंबईचे माजी महापौर व शिवसेनेचे उपनेते दत्ता दळवी यांना बुधवारी सकाळी पोलिसांनी घरात घुसून अटक केली. ‘मिंध्यांनी स्व. आनंद दिघे यांच्यावर ‘धर्मवीर’ नामक चित्रपट काढला होता. त्या चित्रपटात दिघे हे नालायक गद्दारांना जी ‘इरसाल’ भाषा वापरतात त्याच उपाधीचा उल्लेख दळवींनी गद्दार हृदयसम्राटांच्या बाबतीत केला. त्याबद्दल पोलिसांनी त्यांना अटक केली. मग त्याच ‘भोसऑऑऑ’ या उपाधीचा वापर केल्याबद्दल ‘धर्मवीर’ चित्रपटाचे निर्माते, दिघे यांची भूमिका करणारे नटवर्य, त्या चित्रपटाचे आर्थिक आश्रयदाते यांच्यावरही गुन्हे दाखल करून पोलीस त्यांना अटक करतील काय? असा सवाल शिवसेनेनं ( ठाकरे गट ) ‘सामना’ अग्रलेखातून उपस्थित केला आहे.
“शिवसेना सूडाच्या कारवायांमुळे मागे हटणार नाही. नालायक सरकारला खड्यात गाडून त्यावर भगवा झेंडा फडकवूनच ती पुढे जाईल,” असा निर्धार ठाकरे गटानं व्यक्त केला आहे.
तुका म्हणे ऐशा नरा। मोजुनी माराव्या पैजारा।। – संत तुकाराम….
“तुकारामांनी हे जे सांगितले ते समाजातील नालायक किंवा भुरट्या लोकांविषयी सांगितले, पण तुकाराम महाराज आज असते तर महाराष्ट्रातील ‘मिंधे’ सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल करून त्यांची रवानगी देहू पोलीस स्टेशनच्या कोठडीत केली असती; कारण सत्य आणि परखड बोलणे हा आता दंडनीय अपराध झाला आहे. चोरांना चोर म्हणायचे नाही, गद्दारांना गद्दार म्हणायचे नाही. त्यांना युगपुरुष, महात्मा, धर्मात्मा म्हणा, असे राज्यातील मिंधे सरकारचे फर्मान आहे. यातील काही जणांची स्वत:ला हिंदुहृदयसम्राट म्हणवून घेण्यापर्यंत मजल गेली आहे,” अशी टीकाही ठाकरे गटानं मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंवर केली आहे.
हेही वाचा : “शेतकरी उद्ध्वस्त अन् आधुनिक निरो…”, ‘गद्दार हृदयसम्राट’ म्हणत ठाकरे गटाची मुख्यमंत्र्यांवर टीका
“…असे हे कलियुगातील खेळ चालले आहेत”
“राज्यात अवकाळी पाऊस, गारपिटीने शेतकऱ्यांच्या जीवनात दुखच दुख आले. उभी पिके चिखलात आडवी झाली. प्रचंड नुकसान झालेय. शेतकरी बांधावर बसून धाय मोकलून रडत असताना राज्याचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री, उपमुख्यमंत्री वगैरे राजस्थान, तेलंगणा, मध्य प्रदेशात निवडणूक प्रचारासाठी गेले. या नालायकीस काय म्हणायचे? स्वत:चे घर असे वाऱ्यावर सोडून इतर राज्यांतील भाजपाईंना खोके पोहोचविण्यात धन्यता मानणाऱ्यांना ‘नालायक’ नाही म्हणायचे तर काय म्हणायचे? सरकारच्या नालायकीवर हल्ला केल्याबद्दल ‘गद्दार’ हृदयसम्राटांचे लोक उद्धव ठाकरे यांच्यावर कारवाईची मागणी विनम्रपणे करतात. असे हे कलियुगातील खेळ चालले आहेत,” असा हल्लाबोल ठाकरे गटानं शिंदे गटावर केला आहे.
“सरकार व ते चालवणारे खोकेबाज एकजात नालायक आहेत”
“महाराष्ट्राचे मुख्यमंत्री है अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर सोडून तेलंगणा प्रचारास गेते तेथे ते म्हणतात, ‘आम्हाला घरात बसणाऱ्यांनी शिकवू नये.’ पण लाखो शेतकऱ्यांचा आक्रोश पायदळी तुडवून परराज्यांत प्रचारास जाणाऱ्यांनीदेखील आम्हास शिकवू नये, कर्जाच्या ओझ्याखाली दबलेल्या तेलंगणा राज्याला मुक्त करायचे असेल तर भाजपा हाच पर्याय निवडा, असे महाराष्ट्राचे ‘मिंधे’ मुख्यमंत्री तेलंगणात जाऊन सांगतात, तेव्हा त्यांना कर्जाच्या ओझ्याखाली भुईसपाट झालेला महाराष्ट्रातला ‘मऱ्हाठी’ शेतकरी दिसत नाही. हाच नालायक कारभाराचा नमुना आहे. होय, सरकार व ते चालवणारे खोकेबाज एकजात नालायक आहेत,” असं टीकास्र ठाकरे गटानं एकनाथ शिंदेंवर डागलं आहे.
“महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकारचे नालायक राज्य”
“अब्दुल सत्तार या मंत्र्याने सुप्रिया सुळे यांच्याबाबत अत्यंत नीच पातळीची भाषा वापसूत्रुही त्या सत्तारांवर गुन्हा नाही. गुंड-खुन्यांचे फोटो गद्दार हृदयसम्राटांच्या चिरंजिवांबरोबर जाहीरपणे झळकतात, त्यावर कारवाई नाही. मिरवणुकांत गोळीबार करणाऱ्यांना अभय देऊन त्यांना पुन्हा सिद्धिविनायक चरणी ‘विश्वस्त’ मंडळाचे अध्यक्ष केले जाते. मागठाण्याच्या आमदाराच्या दिवटया चिरंजीवाने हाती पिस्तूल घेऊन एका बिल्डरास किडनॅप करूनही तो मोकळा आहे. असे हे महाराष्ट्रात बेकायदेशीर सरकारचे नालायक राज्य आहे. कोणी एक बागेश्वरबाबा, संत तुकाराम, साईबाबांपासून श्रीरामांपर्यंत सगळ्यांची यथेच्छ बदनामी करतो, त्या ‘बाबा’वर गुन्हा नोंदविण्याचे सोडा, पण येथील नालायक सरकार व भाजपा त्याच्या चरणी लीन होते. हे आश्चर्यच नाही काय?” असा प्रश्न उपस्थित करत ठाकरे गटानं शिंदे सरकारचा समाचार घेतला आहे.