लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रात भाजपाचं पानिपत झालं आहे. २०१९ मध्ये भाजपाला २३ जागा मिळाल्या होत्या, आता भाजपाला ९ जागांवर समाधान मानावं लागलं आहे. याबाबत संजय राऊत यांनी प्रतिक्रिया दिली आहे. तसंच विधानसभा निवडणुकीत १८० ते १८५ जागा निवडून येऊ असाही विश्वास व्यक्त केला आहे.

अनैतिक सरकार पाडून सत्तेवर येण्यात मजा आहे

एनडीएची दारं चंद्राबाबू नायडूंसाठी बंद आहेत हे अमित शाह यांनी जाहीर केलं होतं. २०१९ मध्ये चंद्राबाबू म्हणाले होते की नरेंद्र मोदी लोकशाहीचा गळा घोटत आहेत. आता त्याच चंद्राबाबूंना यांनी बरोबर घेतलं आहे. त्यामुळे हे सरकार आलं तर ते टिकणार नाही. अनैतिक सरकार स्थापन झाल्यानंतर ते पाडून येण्यात मजा आहे ते आत्ता बनवण्यात नाही असा टोला संजय राऊत यांनी लगावला.

महाविकास आघाडी महाराष्ट्र विधानसभेत १८५ जागा जिंकणार

महाविकास आघाडीला चांगलं यश मिळालं आहे. विधानसभेला याहून मोठं यश मिळेल. आमच्या जागा चोरण्याचा, विजय चोरण्याचा प्रयत्न झाला. अमोल किर्तीकरांच्या जागेसाठी जो प्रयत्न झाला ते अनेक ठिकाणी झालं. विधानसभा निवडणुकीत ते होणार नाही. आम्ही १८० ते १८५ जागा सहज निवडून येऊ असंही संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

हे पण वाचा- “देवेंद्र फडणवीस महाराष्ट्रातल्या राजकारणातले खलनायक, पेशवाईतल्या आनंदीबाईप्रमाणे..”, संजय राऊत यांची टीका

देवेंद्र फडणवीसांनी फक्त सूडाचं राजकारण केलं

महाराष्ट्र स्वाभिमानी आहे. आधी महाराष्ट्र आणि नंतर पक्ष ही बाळासाहेबांची भूमिका आहे. महाराष्ट्राच्या मुळावर कुणी येत असेल तो आपला असेल तरी त्याला सोडू नका ही त्यांची शिकवण आहे. देवेंद्र फडणवीसांनी बाळासाहेब ठाकरेंचं नाव घेऊन महाराष्ट्र संपवण्याचा प्रयत्न केला. इथले उद्योग, रोजगार गुजरात खेचून नेत असताना हेच फडणवीस तोंडाला कुलूप लावून बसले. राजकीय विरोधकांवर सूडाच्या कारवाया करण्यात ते आघाडीवर होते. यांनी खोटे पुरावे निर्माण करण्यासाठी पोलिसांवर दबाव आणला असाही गंभीर आरोप संजय राऊत यांनी म्हटलं आहे. अशा प्रकारची व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात असावी असं आम्हाला वाटत नाही. लोकशाही संपवण्याची व्यवस्था त्यांनी केली होती. न्यायमूर्तींना धमक्या दाखवून किंवा आमिषं दाखवून तुम्हाला राज्य करता येणार नाही असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.

अमोल किर्तीकरांच्या प्रकरणात शिंदेंनी कुणाला धमकावलं?

अमोल किर्तीकरांच्या प्रकरणात एकनाथ शिंदेंनी कुणाला धमकावलं? हे त्यांनी सांगावं. कुणाकडून निकाल बदलून घेतला हे सांगावं मग मी त्यांच्या आरोपांचं उत्तर देईन. काँग्रेसच्या जागा वाढल्या आहेत त्यात शिवसेनेचंही योगदान आहे. आम्ही त्याबाबत वेळ आली चर्चा करु असंही संजय राऊत म्हणाले आहेत.